‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
कंगना: ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेचे निघालेले धिंडवडे पाहून जनतेचा असंतोष उफाळून येत आहे आणि त्यासाठी शासनव्यवस्थेला धारेवर धरले जात आहे. अश्यावेळी सर्व सेलिब्रिटींनीही जनतेचे प्रतिनिधी म्हणून सरकारला जाब विचारावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना यांतील काहींनी मात्र मुलभूत समस्यांकडे डोळेझाक करून सरकारधार्जिणे धोरण स्विकारल्याचाही आरोप जनतेकडून केला जात आहे. या सरकारधार्जिण्या गटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणावतही सामील असल्याने समाजमाध्यमांतून संमिश्र प्रक्रिया उमटत आहेत. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या कंगनाला रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री म्हणून पाहताना मात्र प्रेक्षक भान हरपून जातात. पण, दिवसेंदिवस प्रक्षोभक ट्विट्स करून समाजाचा रोष ओढवून घेणाऱ्या कंगनाकडे आता प्रेक्षक कितपत गांभीर्याने पाहतील, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पद्मश्री सारख्या नागरी भूषणाने सन्मानित केलेल्या कंगनाला यापूर्वी चारवेळा तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘फॅशन’मधील शोनाली गुजराल, ‘क्वीन’मधील राणी मेहरा, ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’मधील तनू त्रिवेदी, ‘मणिकर्णिका’मधील राणी लक्ष्मीबाई आणि ‘पंगा’मधील जया निगम या त्या खास भूमिका! अनुराग बासू दिग्दर्शित ‘गँगस्टर’मधून पदार्पण करणाऱ्या कंगनासाठी या इंडस्ट्रीत येणं कधीच सोपं नव्हतं. आदित्य पंचोली प्रकरणातून सावरून कंगना मोठ्या जिद्दीने उभी राहिली आणि सिनेसृष्टीतील नेपोटीझमवर कडाडून हल्ला चढवत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान मिळवलं. तिला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला तिने योग्य न्याय दिला, मग ती ‘लाईफ इन अ मेट्रो’मधील नेहा असो वा ‘रंगून’ मधली फिअरलेस मिस ज्युलिया!
आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये नाव कमावलेली कंगना (Kangana Ranaut) हळूहळू इंडस्ट्रीतील प्रत्येक खाचखळगे मीडियासमोर उलगडू लागली. बॉलीवूडमधील कंपूशाही आणि घराणेशाहीच्या विरोधात ठामपणे उभी राहून तिने स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक मृत्यूनंतर तिने नेपोटीझमचा पर्दाफाश करून सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी भल्याभल्यांना धारेवर धरलं. बॉलीवूडची विकृती जगासमोर मांडणारी कंगना एका रात्रीत खऱ्या अर्थाने क्वीन ठरली पण यथावकाश तिच्या अविवेकी वागण्याने सर्वच भांबावून गेले. सुशांतच्या मृत्यूचं खापर बॉलीवूडच्या बड्या धेंडांसोबतच राज्य सरकारवर फोडूनही जेव्हा न्यायालयाने तिचा हा आरोप फेटाळला, तेव्हा कंगनाच्या बेताल वक्तव्यांना आणखीनच धार चढली. अश्यातच बीएमसीने कंगनाच्या बांद्र्यातील ऑफिसवर कारवाई केली आणि कंगनाने तिच्या ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. या मुद्द्यावरून कंगनाला अनेक हिंदी-मराठी चित्रकर्मींनी खडे बोल सुनावले.
कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईचा मुद्दा राजकीय वर्तुळातही चांगलाच रंगला आणि कंगनाला एका राजकीय पक्षाचं आपल्याला अप्रत्यक्षरित्या समर्थन असल्याचं वाटू लागलं. याचंच रूपांतर पुढे जाऊन शेतकरी मोर्चाविरोधी केलेल्या ट्विटमध्ये झालं. या ट्विटमध्ये कंगनाने जगप्रसिद्ध गायिका रेहानाला शेतकरी आंदोलनाची बाजू घेतल्याबद्दल सुनावलं आणि शेतकऱ्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली. या मुद्द्यावरून पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांजने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आणि दोघांच्या भांडणात पुन्हा एकदा नेपोटीझमने बरबटलेल्या बॉलीवूडची लक्तरे निघाली. त्यानंतरही मानसिक अनारोग्य आणि नैराश्याशी झुंज देणाऱ्यांची खिल्ली उडवणारे ट्विट्स तिने केले. नुकत्याच झालेल्या बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या दंगलींना भडकावणारे ट्विट तिने केल्याने ट्विटरने तिचं अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्विटमधून थेट देशाच्या पंतप्रधानांवरच ठपका ठेवला जात असल्याने तिच्या मागे अप्रत्यक्षपणे उभे राहिलेल्या पक्षानेही आपला पाठींबा काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.