बी आर चोप्रा यांनी एका डॉक्युमेंटरीला सुपरहिट करून दाखवले
ख्यातनाम चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा (BR Chopra) यांनी पन्नासच्या दशकामध्ये ‘नया दौर’ हा एक चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला होता आणि तो जबरदस्त हिट ठरला होता. या चित्रपटांमध्ये पन्नासच्या दशकातील भारताची परिस्थिती आणि त्यात होणारे बदल खूप काळजीपूर्वकरीत्या दाखवले होते. यात वाढत्या औद्योगिकीकरणाच्या नव्या कन्सेप्टला एका वेगळ्या नजरेतून दाखवलं होतं. यामध्ये चित्रपटातील नायक टांगा चालवणारा असतो आणि त्याच गावांमध्ये बस सेवा सुरू होणार असते. बस आल्यामुळे गावातील टांगेवाल्यांचा रोजगार जाणार असतो. श्रमशक्ती आणि औद्योगिकीकरणाच्या रेट्याने त्यांच्यावर आलेली बेकारीची कुऱ्हाड असा तो विषय यात मांडला होता.
खरंतर हा विषय आर्ट फिल्म वाल्यांचा पण चोप्रा मुरब्बी व्यवसायिक असल्याने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या पुढे आणले होते. या सिनेमाचा नायक होता दिलीप कुमार. त्याने सुरुवातीला या चित्रपटात काम करायला नकार दिला होता. याचे कारण काय होते ? जेव्हा दिलीप कुमारने ही ‘वन लाईन स्टोरी लाईन’ चोप्रा यांच्याकडून ऐकली तेव्हा त्याला तितकीशी आवडली नव्हती. याच विषयावर ज्ञान मुखर्जी देखील एक चित्रपट बनवत होते आणि त्यात दिलीप कुमार सोबत त्यांचे बोलणे झाले होते. त्यामुळे एकाच सब्जेक्टवरील दोन चित्रपटात तो काम करू शकत नव्हता. म्हणून त्याने नकार दिला होता. यानंतर बी आर चोप्रा यांनी हा विषय दिग्दर्शक मेहबूब यांच्यासोबत बोलून दाखवला होता. मेहबूब यांनी हा विषय ऐकल्यानंतर चोप्रा यांना सांगितले,” तुमचा सब्जेक्ट चांगला आहे पण हा एखादा डॉक्युमेंटरीसाठी चांगला आहे. चित्रपटासाठी नाही!” चोप्रा आणखीनच नाराज झाले. एक तर दिलीप कुमारने नकार दिला आणि आता महबूब खान या सब्जेक्टला डॉक्युमेंटरीचा विषय म्हणत होते. काय करावे? त्यांनी हा चित्रपट रद्द करायचे ठरवले.
पण त्याचवेळी एक घटना अशी घडली की, ज्ञान मुखर्जी यांचा प्रोजेक्ट कॅन्सल झाला तेव्हा ते पुन्हा दिलीप कुमारकडे अॅप्रोच झाले. दिलीप कुमार सोबत पुन्हा एकदा बोलताना त्यांनी या चित्रपटात गाणी आणि इतर मसाला टाकायचे ठरवले आणि हा चित्रपट मनोरंजनच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे आणण्याचे ठरवले. दिलीपकुमार यांना ही आयडिया आवडली आणि चित्रपट बनला. या सिनेमाची नायिका आधी मधुबाला होती परंतु तिने नकार दिल्यानंतर यामध्ये वैजयंतीमाला आली. दक्षिणात्य वैजयंतीमालाने पंजाबी ठेक्यावर सुंदर नृत्य केले. ओ पी नय्यर यांचे फडकते संगीत या चित्रपटाला होते. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण होता. कॉमेडीला जॉनी वॉकर होता. मित्राच्या भूमिकेमध्ये अजित आणि व्हिलनच्या भूमिकेमध्ये जीवन. सर्व भट्टी मस्त जुळून आली होती. साहिर लुधियानवी यांनी लिहिलेली गाणी जबरदस्त होती. चित्रपट सुपरहिट ठरला. (BR Chopra)
या चित्रपटाने जेव्हा शंभर दिवस पूर्ण केले. तेव्हा बी आर चोप्रा (BR Chopra) यांनी एक फंक्शन ठेवले. त्यामध्ये मेहबूब यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. मेहबूब यांनी देखील खुल्या मनाने चोप्रा यांचे कौतुक केले आणि आपण सिनेमा बनवण्यापूर्वी कसे ना उमेद केले होते हे खुल्या मनाने देखील सांगितले. त्या काळात लोक आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करत असत. दिग्दर्शक मेहबूब यांच्याप्रमाणेच राजकपूर, सुबोध मुखर्जी यांना देखील हा विषय एका माहितीपटाचा वाटत होता या सिनेमात जेव्हा दिलीप कुमारने काम करायला नकार दिला तेव्हा बी आर चोप्रा (BR Chopra) यांनी अशोक कुमारचा देखील या भूमिकेसाठी विचार केला होता पण दिलीप कुमारने नंतर ही भूमिका एक्सेप्ट केली. या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता ओळीने मिळालेला हा त्यांना तिसरा पुरस्कार होता. या सिनेमाच्या संगीतासाठी ओ पी नय्यर यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर कथानकासाठी अख्तर मिर्झा यांना फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला. २००७ साली ‘नया दौर’ हा चित्रपट रंगीत बनवून पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला
=============
हे देखील वाचा : मनोज कुमारमुळे बदललं प्रेम चोप्रा यांचं आयुष्य
=============
अशा पद्धतीने सिनेमा सुपरहिट झाला. याच वर्षी मेहबूब यांचा मदर इंडिया देखील प्रदर्शित झाला होता. मदर इंडिया त्यावर्षीचा बॉक्स ऑफिस वरचा सर्वाधिक हिट सिनेमा होता तर दुसऱ्या क्रमांकावर होता नया दौर. बी आर चोप्रा (BR Chopra) यांच्यासारख्या मुरब्बी व्यावसायिक दिग्दर्शकाने एका डॉक्युमेंटरी विषयाला देखील मनोरंजनाच्या माध्यमातून पेश करून सुपरहिट करून दाखवले.