‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
मे महिन्यात ओटीटीवर मुव्हीजचा धमाका.
कोरोनाच्या दुस-या लाटेचा सर्वाधिक फटका चित्रपट उद्योगाला बसला आहे. आत्ता अनेक चांगल्या बॅनरचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे याबिगबजेट चित्रपटांना मोठ्या पडद्याऐवजी छोट्या पडद्याची अर्थात ओटीटी माध्यमाची साथ घ्यावी लागत आहे. मे महिन्यात मराठी, हिंदी, दाक्षिणात्य आणि हॉलिवूडचेही बिग बजेट चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होत आहेत. यामुळे काही मान्यवर अभिनेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र घरबसल्या मोठे चित्रपट अल्प दरात सहकुटुंब बघता येणार असल्यामुळे प्रेक्षक खूष आहेत.
ओटीटीवरील चित्रपटांची सुरुवात सात मे पासून होतेय. 7 मे रोजी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला फोटो प्रेम (Photo-Prem) हा मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. आपला चांगला फोटो असावा आणि मृत्यूनंतर त्याच चांगल्या फोटोतील आपल्या चेह-याला लोकांनी लक्षात ठेवावे, हा विचार नीना कुलकर्णीच्या मनात येतो. मग चांगल्या फोटोसाठी त्यांचा प्रयत्न सुरु होतो. हा सर्व मजेशीर पण त्यातून वास्तवाची जाणीव करुन देणारा प्रवास फोटो प्रेममध्ये बघता येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य राठी यांनी केलं आहे. यात नीना कुलकर्णीसह अमिता खोपकर, विकास हांडे, चैत्राली रोडे, समीर धर्माधिकारी, समय संजीव तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गांवकर, निलकंठ सावंत यांच्या भूमिका आहेत.
9 मे रोजी डीज्नी प्लस हॉटस्टारवर हम भी अकेले तुम भी अकेले (Hum Bhi Akele Tum Bhi Akele) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हरीश व्यास दिग्दर्शित या चित्रपटात अंशुमान झा आणि जरीन खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अत्यंत वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे. गे तरुण आणि लेस्बियन तरुणी हे दिल्ली ते हिमाचल प्रदेश अशा रोड ट्रिपवर जातात. या प्रवासात या दोघांना जो अनुभव आलाय तो म्हणजे हम भी अकेले तुम भी अकेले… हा चित्रपट यापूर्वी अनेक चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे. न्युयॉर्क मधील मैनहैटनमध्ये साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय राजस्थान फिल्म फेस्टिवलमध्येही सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचा पुरस्कार हम भी अकेले तुम भी अकेलेनं मिळवला आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून सलमान खानच्या राधे: युअर मोस्ट वॉन्टेडचे (Radhe) नाव घेण्यात येत आहे. हा राधे 13 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यासोबत राधे जीप्लेक्सवरही प्रदर्शित होत आहे. सलमान खानचा फॅनक्लब पहाता ओटीटीवर सर्वाधिक ओपनींग घेणारा चित्रपट म्हणून राधे विक्रम करेल असा विश्वास राधेच्या सर्व टीमला आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित राधे… मध्ये सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. सलमान आणि दिशाचे सिटी मार हे गाणं सध्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांच्या लिस्टमध्ये अव्वल आहे. यावरुनच ओटीटीवर राधेला विक्रमी ओपनिंग मिळेल असा अंदाज आहे.
अमेझॉन प्राईमवर 15 मे रोजी हॉलिवूड चित्रपट वंडर वुमन 1984 (Wonder Woman 1984) प्रदर्शित होत आहे. गैल गैडॉटची प्रमुख भूमिका असलेला वंडर वुमन गेल्या वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित यश त्याला मिळालं नाही. त्यामुळे आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. पॅटी जेनकिन्स दिग्दर्शित या चित्रपटात क्रिस पाइन, क्रिस्टीन विग, पेड्रो पास्कल हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
नेटफ्लिक्सवर 18 मे रोजी सरदार का ग्रैंडसन (Grandson) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत प्रमुख भूमिकेत आहेत. तर नीना गुप्ता, जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आपल्या आजीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा नातू काय काय करतो याचे मजेदार चित्रण सरदार की ग्रैंडसन मध्ये आहे. काश्वी नायर या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहेत.
नेटफ्लिक्सवरच 21 मे रोजी आर्मी ऑफ दि डेड (Army of the Dead) हा दे मार हॉलिवूडपट प्रदर्शित होत आहे. डेव बटिस्टा, एला परनेल, ओमरी हार्डविक हे प्रमुख कलाकर यात आहेत. शिवाय हुमा खान ही अभिनेत्री या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. जैक स्नायडर यांचा हा चित्रपट 2004 मध्ये आलेल्या डॉन ऑफ दि डेड या चित्रपटाचा सिक्वल आहे.
या सर्व चित्रपटांना घरबसल्या बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहेत. मात्र याबरोबरच अन्यही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. मात्र ओटीटीवर त्यांना प्रदर्शित करण्यासाठी अद्याप निर्णय झालेला नाही. यामध्ये जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते 2 चा समावेश आहे. याशिवाय फरहान अख्तरचा तुफानही ओटीटीवर प्रदर्शन होण्याचा मार्गावर आहे. वास्तविक 21 मे रोजी तुफान प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार होता. मात्र फरहान अख्तरनं नंतर कोरोनाचं कारण देत चित्रपट प्रदर्शन थांबवलं आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित तुफानमध्ये फरहान एका बॉक्सरच्या भूमिकेत आहे. तर परेश रावल त्याचे कोच आहेत.
यासोबतच कार्तिक आर्यन, तापसी पन्नू, विक्रांत मैसी, हर्षवर्धन राणे यांचा हसीन दिलरुबा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पण त्याच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप आलेली नाही. तसेच अक्षय कुमारचा बेलबॉटमही ओटीटीच्या रांगेत आहे. 28 मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे हा मुहूर्त चुकणार आहे. त्यामुळे बेलबॉटमही ओटीटीवर येण्याचीच चर्चा आहे. रंजीत तिवारी दिग्दर्शित बेल बॉटम हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता, आदिल हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
एकूण काय बाहेर कोरोनाचा कहर आहे. आणि ओटीटीवर चित्रपटांचा उत्सव… त्यामुळे घरात रहा आणि चित्रपटाचा आनंद घ्या.