Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने
C. Ramchandra : ‘या’ गाण्याची लोकप्रियता ७५ वर्षानंतरही कायम!
संगीतकार अनिल विश्वास (Anil Biswas) भारतीय चित्रपट संगीतातील भीष्माचार्य. त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये बंगाली गोडवा आणला आणि आपल्या देशातील लोकसंगीताला त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या समोर आणले. हिंदी सिनेमाची सुरुवातीची काही दशकं अनिल विश्वास यांच्या संगीताने रसभरीत झाली होती. सुरुवातीच्या काळात अनिल विश्वास यांचे दोन सहाय्यक संगीतकार होते ज्यांनी पुढे खूप मोठी सांगितिक कारकीर्द उभारली. पैकी एक होते संगीतकार वसंत देसाई आणि दुसरे होते संगीतकार सी रामचंद्र (C. Ramchandra). दोघेही मराठी. हे दोघेही त्या काळात संगीतकार कमी आणि पैलवान जास्त वाटत होते. कारण दोघेही चांगलेच धष्टपुष्ट होते.
सी रामचंद्र (C. Ramchandra) तर सहा फूट एक इंच उंचीचे होते. गोरेपान, रुवाबदार आणि तगडे होते. संगीतकार Vasant Desai हे देखील व्यायामाने शरीर कमावलेले होते. त्यामुळे जेव्हा हे स्टुडिओत जात तेव्हा लोकांना हे संगीतकार अनिल विश्वास यांचे सहायक संगीतकार कमी आणि अंगरक्षकच जास्त वाटायचे. या दोघांवरही सुरुवातीला अनिल विश्वास यांच्या संगीताची जबरदस्त छाप होती. परंतु दोघेही यातून लवकरच बाहेर पडेले. सी रामचंद्र यांचे संगीत तर अनिल विश्वास यांच्या संगीताची झेरॉक्स कॉपी आहे असे समजले जायचे. (Bollywood masala)
संगीतकार सी रामचंद्र (C. Ramchandra) यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायचे ठरवले. त्या पद्धतीने त्यांनी बारकाईने अभ्यासाला देखील सुरुवात केली. जर आपल्याला आपली स्वातंत्र ओळख निर्माण करायची असेल तर अनिल विश्वास यांच्या छायेतून आपल्याला बाहेर पडावं लागेल याचे त्यांना पुरते ज्ञान होते. सी रामचंद्र यांचा पिंड हा पहिले पासूनच बंडखोरीचा होता. वेगळं काही करायचे त्यांनी ठरवले. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य संगीताला भारतीय चित्रपट संगीतात आणायचे ठरवले.
साधारणतः १९४६ साली त्यांना एक चित्रपट मिळाला. हा चित्रपट होता ‘शहनाई’ (Shehnai) या चित्रपटाचे दिग्दर्शन पी एल संतोषी यांनी केले होते. चित्रपटातील गाणी देखील त्यांनीच लिहिली होती. या चित्रपटात सी रामचंद्र (C. Ramchandra) यांनी एक वेगळा प्रयोग करायचे ठरवले. त्यांनी एक वेस्टर्न ट्यून बनवली आणि त्यावर P. L. Santoshi यांना शब्द लिहायला सांगितले. या गाण्याचे रफ स्ट्रक्चर घेऊन जेव्हा ते अनिल विश्वास यांच्याकडे गेले. (Entertainment mix masala)
त्यावेळी त्यांनी सुरुवातीला सांगितलं, ”अनिलदा मी जी ही ट्यून बनवली आहे ती ऐकल्यानंतर तुम्ही मला तुमच्या पायातल्या जोड्याने मारणार आहात! कारण तुमचा शिष्य म्हणून घ्यायची लायकी माझी राहणार नाही.” अनिल विश्वास मंदपणे हसले आणि म्हणाले, ”ते नंतर पाहू आपण. आधी ट्यून काय बनवली ते तर सांग.” त्यावर अनिलदा यांना सी रामचंद्र यांनी आपली ट्यून ऐकवली. अनिल विश्वास म्हणाले, ”हा संगीतातील नक्कीच वेगळा प्रयोग आहे. पण भारतीय प्रेक्षक याला कितपत एक्सेप्ट करतील माझ्या मनात शंका आहे. तरीही हा एक वेगळा विचार तू करतो आहेस. गो अहेड.” अनिल विश्वास यांच्या शब्दाने सी रामचंद्र (C. Ramchandra) यांना धीर आला आणि त्यांनी या ट्यूनवर ‘मेरी जान मेरी जान संडे के संडे…’ हे गाणं बनवले.
‘शहनाई’ हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्याच दिवशी म्हणजे शुक्रवार १५ ऑगस्ट १९४७ ला संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला. स्वातंत्र्याचा आनंद आणि हा चित्रपट! यामुळे या चित्रपटाची जबरा हवा निर्माण झाली आणि सिनेमा सुपरहिट झाला. त्यावेळी या गाण्याने भारतभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. संपूर्ण देशात या गाण्याने धुमाकूळ घातला होता. या गाण्यामुळेच हा चित्रपट सुपरहिट झाला.
=============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
=============
संगीतकार सी रामचंद्र (C. Ramchandra) यांना या गाण्यामुळे एक वेगळी आयडेंटिटी मिळाली. नंतर त्यांनी पाश्चात्य ट्यूनवर अनेक गाणी बनवली. अलबेला, आशा, सरगम, समाधी, बारिश… या त्यांच्या चित्रपटातून आपल्याला ही गाणी ऐकायला मिळतात. असं जरी असलं तरी अनिल विश्वास यांचे संस्कार त्यांनी कायम लक्षात ठेवले आणि अभिजात अशी गाणी देखील त्यांनी दिली. अनिल विश्वास यांच्याबद्दल त्यांच्या मनात कायम आदराचे स्थान होतं. ते स्वतःला कायम मी अनिल विश्वास यांचा सहाय्यक होतो हे सांगत.
‘मेरी जान मेरी जान संडे के संडे…’ या गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल पन्नास वर्षानंतर दूरदर्शनवर अंड्याची जाहिरातीत ‘मेरी जान मेरी जान मुर्गी के अंडे….’ वापरले होते. आज ७५ वर्ष उलटून गेली तरी या गाण्याची जादू अबाधित आहे!