द डिसायपल
आंद्रेया देल सार्तो नावाची रॉबर्ट ब्राऊनिंगची कविता आहे. कविता आंद्रेया देल सार्तो या चित्रकाराबद्दल आहे. तो चित्रकार निर्दोष चित्रे काढण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. पण त्याला त्याविषयी खंत आहे. त्याला वाटतं राफाईल किंवा मायकल अँजलोसारखे आपण कलाकार नाही तर फक्त निर्दोष चित्रे काढणारे कुशल कारागीर आहोत. त्यात जीव ओतण्याचं काम तो करू शकत नाही कारण अशा पद्धतीचं काम करण्याची क्षमता त्याच्यात नाही. तो प्रयत्न करूनही ते करू शकत नाही याची खंत त्याला टोचत असते. तसेच यासाठी तो आपल्या सुंदर बायकोला दोष देतो. तिच्यामुळे माझ्यात कलात्मकतेची कमतरता आहे. इतरांमध्ये कलात्मकता आहे कारण त्यांना बायको नाही असं तो म्हणतो. व्यवसायासाठी कला की कलेसाठी कला या संभ्रमात तो आहे. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित द डिसायपलमधील (The Disciple) नायक शरद नेरूळकर व आंद्रेया देल सार्तो मधे काही एक प्रमाणात साम्य आहे पण पूणर्तः नाही.
शरद नेरूळकर (आदित्य मोडक) एका गायन स्पर्धेच्या निकालाकडे उत्सुकतेने पाहत असतो. त्याला पुरस्कार मिळत नाही. तो हिरमुसतो. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसून येतं. कसून रियाज करून सुद्धा त्याने पेश केलेली बंदिश परीक्षकांना प्रभावित करू शकलेली नसते. त्याचे गुरु विनायक प्रधान (अरुण द्रविड) त्याला रियाज वाढवायला सांगतात.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेमा काढण्याचा धाडस चैतन्य ताम्हाणेने (Chaitanya Tamhane) दाखवलं यासाठी त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. विषय मोठा व अत्यंत किचकट असणारा कारण त्यातील खाचाखोचा, संगीताबद्दलचं संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. उगाच एका कलाकाराचं मनस्वी ते बेताल वागणं चित्रीत करणं इतकंच त्याचा उद्देश असेल तर ते हाताळणीमुळे लाऊड होण्याची शक्यता जास्त. ताम्हाणे ते टाळतो ते विषयाचं अभ्यास केल्यामुळे. याची पटकथा अभ्यासण्यासारखी आहे. ती एकाचवेळी एक कलाकार होऊ पाहणाऱ्या कलावंताची कथा सांगते तर
दुसरीकडे शास्त्रीय संगीतामधील मर्म अधेमधे येणारी निवदने व शरदच्या भूतकाळातून दाखवते. हे अवघड काम आहे. यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे असं दिसतं. कारण बऱ्याच कलावंतांबद्दल येणारे किस्से, संगीत मैफिली, त्या क्षेत्राशी निगडीत असणारी माणसे, त्याच्या वडिलांनी लहानपणी केलेले संस्कार, कलावंतांचा वारसा जपून राहावा म्हणून गाणी, मुलाखती व विस्मृतीत गेलेल्या गायकांचे गाणे डिजीटाईझ करण्याचं काम, काळानुरूप झालेला बदल, त्याच्यात होणारे बदल इतकं तपशीलवार शास्त्रीय संगीताशी निगडीत अवकाश तो उभा करतो.
कोर्टमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम दिसलं होतं. न्यायालयाचं कामकाज, वकिलांचे युक्तिवाद, त्यांची पार्श्वभूमी, ब्रिटीशकालीन कायदे जे आजच्या काळात सुद्धा दलितांवर अन्यायी आरोप ठेवण्यासाठी वापरले जातात असा तपशील ताम्हाणेने मेहनतीने पटकथेत वापरलेला दिसला होता. त्यासाठी त्याने न्यायालयाचं कामकाज कसं चालतं हे काही न्यायालयात उपस्थित राहून शिकून घेतलं होतं म्हणे. त्यामुळेच दोन्ही सिनेमात आशयात मुरलेला त्या त्या विषयाचा अभ्यास दिसून येतो. ताम्हाणेची ही मोडस ऑपरेंडी पटकथाकार-दिग्दर्शकांनी शिकण्यासारखी. एखाद्या विषयाचा अभ्यास म्हणजे नुसते पुस्तकांचे संदर्भ तपासणे नव्हे तर त्या विषयातील लहानसहान गोष्टींचा विचार करून त्या क्षेत्रातील व्यक्तींचा तपशील पात्र उभारण्यासाठी करणे म्हणजे अभ्यास होय.
वर उल्लेख केल्याप्रमाणे शरद नेरूळकर हे पात्र आंद्रेया देल सार्तो या चित्रकारासारखं आहे. आंद्रेया पैसे कमवायचे म्हणून चित्र काढत असतो. त्याला राफाईल किंवा मायकल अँजलोसारखं चित्रकार व्हायचंय पण व्यावहारिकतेमुळे व बायकोच्या आग्रहामुळे त्याला फक्त पैशांसाठी काम करावं लागतं. त्याच्या चित्रात जिवंतपणा नसतो कारण तो फक्त कुशल कारागीर झालेला असतो. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातली मंडळी म्हणतात गायन सर्वांनाच जमत नाही. त्याची दोन कारणे आहेत.
पहिलं एक तर तुमच्याकडे दैवी आवाज असणं आवश्यक आहे. दुसरं कारण तो नसेल तर तुम्ही रियाज करून स्वतःचं स्थान निर्माण करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत करणं क्रमप्राप्त आहे. सर्वांनाच ते शक्य आहे असं नाही. अनंत अडचणी असतात. त्यावर मात करावी लागते. त्यात सातत्य ठेवावं लागतं. सिनेमात माई म्हणतात तसं भारतीय शास्त्रीय संगीत ही तपस्या आहे. दुर्दैवाने शरदला हे उमजायला खूप वेळ लागतो. सिनेमात तीन लक्षवेधी प्रसंग आहेत. पहिला वर उल्लेखलेला गायन स्पर्धेतील. तर दुसरा त्याला जेव्हा एका मैफिलीत गुरुजी साथ करताना गाऊ नको म्हणतात.
तिसऱ्यांदा एका कार्यक्रमात स्वतंत्रपणे गायला बसला असताना तो उठून निघून जातो. टप्याटप्याने त्याला हे कळायला लागतं की माई म्हणतात ते बरोबरच आहे. तपस्या करताना ती खडतरपणेच करावी लागते. इतर गोष्टींचा आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नसतो तरच इप्सित गोष्ट साध्य होते. आंद्रेया देल सार्तोला हे उमगून ही ते करता येत नाही तर शरदला खूप उशीर झालेला असतो.
चैतन्य ताम्हाणेच्या दिग्दर्शन शैलीत काही साम्य दिसून येतं. दोन्ही सिनेमात उगाच कॅमेरा किंवा संकलनातून काही विशिष्ठ प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यापेक्षा तो कॅमेरा हलवत नाही किंवा झटपट कट्स करून प्रसंग उठावदार होईल असं करत नाही. उदाहरणार्थ शरद व त्याची आज्जी डायनिंग टेबलावर बोलत बसलेले असतात. तेव्हा कॅमेरा त्यांच्यावर स्थिर आहे. तसेच दोन तृतीयांश फ्रेम रिकामी आहे. आपल्याला त्यांचं किचन स्पष्ट दिसतं. त्यांच्यात त्याच्या नोकरीवरून बोलणं होतं. शरद उठून फ्रेममधून निघून जातो. त्यावेळी सुद्धा कॅमेरा हलत नाही किंवा सीन कट करून आज्जीचा क्लोज अप दाखवला जात नाही.
शरद फ्रेममध्ये परत येतो तेव्हा सुद्धा कॅमेरा हलत नाही. तो येतो, बोलतो व निघून जातो. अशा पद्धतीची दिग्दर्शन शैली वापरल्यामुळे प्रेक्षकांना प्रसंग संपेपर्यंत त्याचा मध्यमवर्गीय अवकाश कसा आहे हे जाणून घेता येतं. ताम्हाणेला क्लोज अपचं वावडं असावं बहुदा तो ते कधीच वापरताना दिसत नाही. यात तर वाईड अँगल शॉट्सचा अतिशय सुंदर वापर केला आहे. वाईड अँगल शॉट्सचा वापर कसा करावा हे दिग्दर्शक होऊ पाहणाऱ्यांनी शिकण्यासारखं. किंवा सिनेमा कसा दिग्दर्शित करावा याचा वस्तुपाठ म्हणजे त्याचे दोन्ही सिनेमे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये.
लेखाच्या शीर्षकाचा हवाला देऊन म्हणावसं वाटतं चैतन्य ताम्हाणेचा तिसरा सिनेमा कोणता असेल. अर्थात या प्रश्नाचं उत्तर तोच देऊ शकेल. हा ऱ्हेटोरिअल प्रश्न आहे. दोन्ही सिनेमे सलग बघितले तर एक गोष्ट दिसते ताम्हाणेला नेहमीच्या शैलीत कथानके मांडायला आवडत नाही. त्याला पटकथेनुसार आपली शैली तयार करायची असते. त्यासाठी तो आधी उत्तम, निर्दोष पटकथा तयार करतो. सर्वसामान्य दिग्दर्शक हाताळायचा विचार ही करणार नाहीत असे अवघड विषय तो निवडतो.
त्याच्या खोलात जाऊन, त्याचा अभ्यास करून पटकथा लिहितो. मग त्यानंतर त्याचं दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, अभिनेत्यांची निवड, साऊंड व प्रोडक्शन डिझाईन वगैरे टप्याटप्याने काम करतो. अभिनेते सुद्धा ज्यांनी पूर्वी कधीच काम केलं नसेल असे निवडतो. कोर्टमधील वीरा साथीदार व इथे आदित्य मोडक ही उत्तम उदाहरणे. आपल्या कथानकांसाठी अननुभवी व अनोळखी अभिनेते निवडणं ही मंजुळेंसारखी मानसिकता. यामुळे कथानक वास्तव वाटते. त्यात जिवंतपणा येतो. तसेच प्रेक्षक त्यांच्याशी रिलेट करू शकतो. ओळखीच्या अभिनेत्यांमुळे प्रेक्षकांकडून अभिनयाच्या अवास्तव अपेक्षा वाढतात जर काम पसंत पडलं नाही तर दिग्दर्शक व अभिनेते दोषी ठरण्याची शक्यता वाढते.
इथे ते होत नाही कारण दिग्दर्शक मुळातच अनोळखी अभिनेते निवडतो व त्यांच्याकडून त्याला हवं तेवढं काम काढून घेऊ शकतो. मळलेल्या वाटेपेक्षा नवीन वाट चोखाळायची, रिस्क घेण्याची ही पद्धत ताम्हाणेला इतरांपेक्षा वेगळा करते. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे त्याचा तिसरा सिनेमा कोणत्या विषयावरील असेल याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. तो निराश करणार नाही याची खात्री आहेच.
– विवेक कुलकर्णी
=====
हे देखील वाचा: चैतन्य ताम्हाणे तरुण, तडफदार मराठी दिग्दर्शकाचा ‘हा’ सिनेमा पोहोचलाय आंतरराष्ट्रीय स्तरावर..
=====