
Chandani Bar :चित्रपट ब्लॉकबस्टर ठरूनही महेश भट्ट का चिडले होते भांडारकरांवर?
फिमेल सेंट्रिक अर्थात महिला प्रधान चित्रपट करण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा हातखंडा आहे. २००१ साली आलेल्या चांदनी बार या चित्रपटापासून त्यांनी स्त्री प्रधान चित्रपटांनी सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक हिट चित्रपट त्यांनी दिले. विशेष म्हणजे भांडारकर यांच्या चित्रपटांनी स्त्रियांच्या अडचणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचं जीवन चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच यश मिळवलं नाही तर प्रेक्षकांच्या मनात आजन्म प्रत्येक चित्रपटाने जागा निर्माण केली. पण तुम्हाला माहित आहे का ‘चांदनी बार’ (Chandani Bar) या चित्रपटावेळी मधुर भांडारकर यांना दिग्दर्शक महेश भट्ट यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. नेमकं काय झालं होतं? जाणून घेऊयात…(Bollywood news)

मधुर भांडारकर यांच्या ‘चांदनी बार’ चित्रपटाला प्रचंड यश मिळालं होतं. जेव्हा हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यावेळी दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया घेण्याऐवजी घरी आराम करत होते. आणि ज्यावेळी महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना ते समजलं होतं तेव्हा त्यांनी भांडारकर यांना चक्क शिवीगाळ केला होता. मधुर भांडारकर यांनी नुकतीच ‘गेम चेंजर्स’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी चांदनी बार प्रदर्शित झाल्यानंतरचा किस्सा सांगताना ते म्हणाले की, “मला आठवतं मी माझ्या घरात कार्पेटवर झोपलो होतो. फॅन सुरू होता. त्या काळात माझ्याकडे एसी नव्हता. दुपारी २ वाजल्याच्या सुमारास महेश भट्ट साहेबांचा फोन आला. त्याआधी मी त्यांना २-३ वेळेस भेटलो होतो. त्यांनी मला विचारले की तू कुठे आहेस? मी झोपेत होतो. त्यांना म्हणालो की घरी आहे. त्यांनी मला शिवीगाळ केली. ते मला म्हणाले की तू वेडा आणि मूर्ख आहेस. तुझा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतोय आणि तू झोपा काढतोयस? जा आणि थिएटर्सच्या बाहेर असलेली गर्दी बघ. असे क्षण पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाहीत. त्यांच्या शब्दांनी मला ऊर्जा मिळाली. मी त्यांची माफी मागितली आणि पळत गेलो.” (Entertainment news)

पुढे भांडारकर म्हणाले की, “मी मुंबईतील गेटी गॅलक्सी आणि स्टार सिटी थिएटरमध्ये गेलो. मला कोणीही ओळखत नव्हतं. पण, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी महेश भट्ट यांना फोन केला आणि मला परिस्थितीची जाणीव करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मला असे कोणीतरी सांगण्याची गरज होती. महेश सर बरोबर म्हणाले होते. लोकं अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांची वाट बघत असतात. तुम्हाला दररोज असे चित्रपट पाहायला मिळत नाहीत”.(Chandani bar movie untold story)
===============================
हे देखील वाचा: Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
===============================
‘चांदनी बार’ (Chandani Bar) चित्रपटाची कथा बारमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या जीवनाचं मनाला पिळवटून टाकणारं सत्य सांगणारी होती. २००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाचं बजेट १.५ कोटी होतं आणि बॉक्स ऑफिसवर Chandani Bar चित्रपटाने ६.६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटात तब्बू (Tabbu) प्रमुख भूमिकेत होती तर तिच्यासोबत अतुल कुलकर्णी, विनय आपटे, नारायणी शास्त्री, उपेंद्र लिमये, राजपाल यादव असे अनेक मातब्बर कलाकार होते. मधुर भांडारकर यांच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत त्यांनी ‘पेज ३’, ‘कॉर्पोरेट’, ‘फॅशन’ (Fashion), ‘हिरोईन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॅलेन्डर गर्ल्स’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. (Madhur Bhandarkar movies)