चंद्रमुखी चित्रपटानंतर तमाशापटांचा ‘तो काळ’ पुन्हा येणार का?
आजच्या काळात तमाशा, लावणी हे महाराष्ट्रामधील लोकनाट्याचे प्रकार काहीसे दुर्लक्षितच झाले आहेत. जसं इतर नृत्यप्रकारांकडे सन्मानाने बघितलं जातं तसा मान-सन्मान या लोकनाट्य प्रकाराला मिळत नाही. उपटपक्षी याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही आणि दुदैवाने तो आजही बदललेला नाही.
साधारणतः ५० ते ८०च्या दशकात मराठी चित्रपट आणि तमाशा असं एक समीकरणच झालं होतं. त्यावेळच्या कित्येक चित्रपटांमधील ‘लावणी गीते’ आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. त्यावेळच्या तमाशापटांमध्ये लावणीसोबतच सवाल-जवाब हा प्रकारही प्रचंड लोकप्रिय होता. त्यावेळचे सवाल-जवाब बघताना कित्येक प्रेक्षक स्वतः प्रश्नांची उत्तरं शोधत त्यात हरवून जात असत. पण नंतर हळूहळू चित्रपटांचं स्वरूप बदलत गेलं आणि तमाशा, लावणी हे प्रकार मागे पडत गेले. पुढच्या काळात तर ते फक्त चित्रपटातील एखाद्या गाण्यापुरतेच उरले.
आज या साऱ्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे प्रदर्शनाच्या वाटेवरचा बहुचर्चित ‘चंद्रमुखी (Chandramukhi)’ हा चित्रपट. विश्वास पाटील लिखित ‘चंद्रमुखी (Chandramukhi)’ या कादंबरीवर आधारित असणारा हा चित्रपट कादंबरीच्या मूळ नावानेच प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा तमाशा, गावरान भाषा आणि एकूणच तो काळ नव्याने अनुभवयला मिळणार आहे. नटरंग नंतर जवळपास १२ वर्षांनी मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा ढोलकी आणि घुंगरांची जुगलबंदी रंगणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीच्या तमाशा किंवा लावणी नृत्यप्रकाराबद्दल चर्चा होत असताना ‘पिंजरा’ या चित्रपटाला विसरणं कदापि शक्य नाही. खरंतर हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. या चित्रपटाचा उल्लेख नेहमी व्ही शांताराम यांची एक ‘अजरामर कलाकृती’ असाच केला जातो.
‘पिंजरा’नंतरच मराठी चित्रपटसृष्टीचे ‘कलरफुल युग’ सुरू झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याआधीचे चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटच होते.
ब्लॅक अँड व्हाईट काळात १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाने तर, भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवत नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. या चित्रपटाला ‘चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान’ म्हटलं जातं. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अनंत माने. अनंत माने यांनी अनेक तमाशापट बनवले. याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील लोककलेला न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे ‘तमाशापट काढणारे अनंत माने’ असा शिक्काही त्यांच्यावर बसला होता.
उत्कृष्ट कथा, कलाकारांचे सरस अभिनय, गावाकडचं आयुष्य आणि जोडीला लावणी नृत्य असा साजशृंगार लाभलेले तमाशापट ही मराठी चित्रपटसृष्टीची एक ओळख बनली होती. आता इतक्या वर्षांनंतर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टिझर बघून लोकांना आवर्जून तमाशापटांची आठवण येतेय. अर्थात याआधी २००९ साली आलेला ‘नटरंग’ हा चित्रपट अगदीच तमाशापट नसला तरी काहीसा त्याच धर्तीवर आधारित होता. यामध्ये तमाशामधील ‘नाच्या’ची वेदना मांडण्यात आली होती. हा चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांच्या आयुष्यावर आधारित होता.
‘नटरंग’ चित्रपटांमधील लावणी नृत्यांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यावेळच्या महाराष्ट्रामधल्या लग्नाच्या वराती ‘मला जाऊ द्या ना घरी….’ आणि ‘अप्सरा आली….’ या दोन गीतांशिवाय पूर्ण झाल्या नसतील. बघता बघता हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला.
नटरंगनंतर आता तब्बल १२ वर्षांनी ‘चंद्रमुखी (Chandramukhi)’ चित्रपट येतोय. नटरंगमध्ये अमृता खानविलकरने “मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा.…” म्हणत आपल्या लावणीनृत्याची ‘नजाकत’ दाखवली होतीच; त्यानंतर ‘आणि…. डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातही “तुम्हावर केली मी मर्जी बहाल” म्हणत तिने कित्येकांच्या हृदयाचा ठाव घेतला होता. आता अमृता खानविलकर ‘चंद्रमुखी (Chandramukhi)’ चित्रपटामध्ये पुन्हा एकदा लावणीनृत्य करताना दिसणार आहे.
=====
हे देखील वाचा – सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग चुकीचंच!
=====
‘चंद्रमुखी’ची गाणी आता सगळीकडे वाजू लागली आहेत. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा ढोलकी आणि घुंगुरांचा आवाज कानी पडतोय “थांबला का उंबऱ्याशी, या बसा राजीखुशी….” हे गाणं अगदी जुन्या काळातील तमाशापटांची आवर्जून आठवण करून देतंय.
यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये अमृताने केवळ लावणी नृत्य सादर केली आहेत, परंतु आता ‘चंद्रमुखी’ चित्रपटात ती लावणी नृत्यांगनेची प्रमुख भूमिका साकारत आहे. एक मातब्बर राजकारणी आणि एक सुंदर लावणी नृत्यांगना यांची कादंबरीत गुंफण्यात आलेली प्रेमकहाणी पडद्यावर बघताना कशी वाटेल आता लवकर कळेलच. सध्या तरी चित्रपटाचे प्रोमोज बघून चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा मात्र वाढल्या आहेत.