Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Chhaya Kadam : “त्या काळ्या बाहुलीने मला शाहरुख खान दिला….”
अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने आतंरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत आपल्या शिरपेचात फिल्मफेअर पुरस्काराच्या रुपात मानाचा तुरा रोवला… लापता लेडीज या चित्रपटातील मंजू माई चित्रपटासाठी छायाला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेता प्रतिक गांधी याच्या हस्ते जरी छालाला पुरस्कार मिळाला असला तरी शाहरुख खान याने दिलेली मिठी आणि केलेलं कौतुक फार विलक्षणीय ठरलं… या पुरस्कार सोहळ्यानंतर छाया यांनी पहिल्यांदाच त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. (Filmfare Award 2025))

छाया कदम हिने सोशल मिडियावर पोस्ट केली आहे की, “यंदाच्या फिल्म फेअरच्या भरलेल्या आलिशान जत्रेने माझ्यातील कलाकारात असलेल्या एका लहान लेकराला जणू आकाश पाळण्यात बसून, आभाळाला हात लावण्याचा आनंदच दिला. मंजू माई म्हणजे आपल्या माणूसपणाची अशिक्षित का असेना पण स्वाभिमानाच्या स्वातंत्र्याची गोष्ट ठळक करत, केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगावर जिने छाप पाडली ती ‘लापता लेडीज’ या सिनेमातली मी साकारलेली भूमिका”…
पुढे छायाने लिहिलं आहे की, “खरंतर मंजू माई ही मी आज पर्यंत करत आलेल्या सगळ्याच स्त्री भूमिकांच्या जडण घडणीतून उभी राहिलेली एक बलाढ्य अशी भूमिका होती. म्हणजे खरंतर किरण राव सारख्या कसबी दिग्दर्शिकेला माझ्यात दिसलेली मंजू माई आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच कदाचित माझ्या आता पर्यंतच्या मागच्या सगळ्या लहानशा प्रवासाचे प्रतिबिंबच असावे”… (Laapata Ladies Movie)

“यंदाच्या फिल्म फेअरच्या निमित्ताने सहाय्यक अभिनेत्री म्हणून मला मिळालेले अवॉर्ड हे केवळ माझ्या एकटीचे नाही, तर मंजू माई सारख्या बनून स्वतंत्राची वेगळी गोष्ट सांगणाऱ्या प्रत्येकीचे आहे. फिल्म फेअर ! प्रत्येक कलाकाराचे असलेले एक अजरामर असे स्वप्नच. माझेही होतेच. मी ही कलाकार म्हणून त्याच्या भुकेने व्याकुळ झालेच होते. आणि अखेर मंजू माईने माझे बोट धरून मला तिथ पर्यंत आणून सोडलेच. आणि मग त्यानंतर जे काही माझ्या सोबत घडले ते सगळ जादुई होते”, असंही तिने लिहिलं आहे…
“मन्नत घडविणाऱ्या शाहरुख खानच्या हातांनी मला मिठीत घेत – माथ्यावर दिलेले चुंबन म्हणजे माझ्यासाठी त्याने दिलेली दुवाच आहे. हा प्रवासच सगळा थक्क करणारा आहे. किरण रावने मला मंजू माई दिली – मी मंजू माईला छाया कदम दिली – मग मंजू माईने मला फिल्मफेअरची काळी बाहुली दिली – त्या काळ्या बाहुलीने मला शाहरुख खान दिला – आणि शाहरुख खानने मला दुवा दिली. सगळचं कसलं स्वप्नवत पण कमाल. we love you शाहरुख खान जी. ( मनातल्या मनात : I love you & Respect शाहरुख खान जी ) आणि या सगळ्याच सोबत आनंद याही गोष्टीचा झाला की, मला मिळालेला फिल्म फेअर हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तो आपल्यालाच मिळाला आहे याचा होणारा आनंद आणि छायाला शाहरुखने मारलेली मिठी म्हणजे आपल्यालाच त्याने मिठी मारली आहे असे त्यांना वाटावे हे मला अत्यंत भावनिक करून गेले. त्या सगळ्यांना खूप खूप प्रेम”, या शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या… (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Chhaya Kadam : पहिला फिल्मफेअर पुरस्कार आणि शाहरुख खानने मिठी मारत केलेलं कौतुक…
================================
“या सगळ्यात विशेष कौतुक मला त्याही सगळ्यांचे आहे ज्यांनी माझ्या चेहऱ्यावर आपल्या हातांनी मंजू माई रंगवली – माझ्या अंगावर मंजू माई नेसवली – माझ्या केसात मंजू माई माळली. त्या सगळ्यांशिवाय मंजू माई अर्धवटच राहिली असती. त्या सगळ्यांचे खूप खूप आभार”…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi