‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कॉलेज रोमान्स: तरुणाईची झिंगाट दुनिया
बोर्डाचे पेपर संपले की विद्यार्थ्यांना कॉलेज लाईफचे वेध लागतात. आजवर घरट्यात कैद असलेली पाखरं खुल्या आभाळात भरारी घ्यायला तयार होतात. नवा अभ्यासक्रम, नवी मित्रमंडळी आणि इतरही बऱ्याच गोष्टी नव्याने अनुभवायला ही मुलं सज्ज होतात. आयुष्यात कधीही न विसरण्याजोग्या कडू गोड आठवणींची शिदोरी हीच कॉलेज लाईफ त्यांच्या गाठीशी बांधत असते. विशेषतः तरुणाईला आवडतील असे कंटेंट देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘द टाईमलाईनर्स’ या युट्यूब चॅनलने ऑगस्ट २०१८मध्ये अशीच एक वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली, जिचं नाव होतं ‘कॉलेज रोमान्स’ (College Romance).
हे देखील वाचा: क्रिमिनल जस्टीस – बिहाइंड क्लोज्ड डोअर्स: रंगतदार कोर्टरूम ड्रामा
दिल्लीतील एका नामवंत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्रांची ‘फुल टू धमाल’ अशी कॉलेज लाईफ या वेबसिरीजमध्ये दाखवली होती. सिमरनप्रीत सिंग व अपूर्वसिंग करकी यांचं दिग्दर्शन आणि कुणाल अनेजा व अभिषेक श्रीवास्तव यांची लेखणी लाभलेल्या ह्या सिरीजचा नुकताच दुसरा सिझन SonyLIV वर रिलीज झाला आहे. नवा सिझन बघण्यापूर्वी जुना सिझन बघणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून पात्रांची ओळख होईल. नव्या सिझनची पटकथा सिधांत मागोने लिहली असून अपूर्वसिंग करकीने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दुसऱ्या सिझनची कथा ही पहिल्या सिझनमधल्याच दोस्तमंडळीभोवती फिरते. ह्या सिझनमध्ये लाँग डिस्टन्स रिलेशनशिप, लैंगिक शिक्षण, मित्रांमधील अंतर्गत गटबाजी इत्यादी विषयांवर भाष्य केलेलं आहे.
पहिल्याच एपिसोडमध्ये ट्रिप्पी (मनज्योत सिंग) आणि रविना यांचं नातं रविना कॉलेज सोडून गेल्यामुळे संपुष्टात आल्याचं कळून येतं. काही महिन्यांतच नायरा (अपूर्वा अरोरा) अमेरिकेला जायच्या तयारीत असल्याने तिला हा निर्णय तिचा बॉयफ्रेंड बग्गाला (गगन अरोरा) कसा सांगावा याचं कोडं पडलेलं आहे. दीपिका (श्रेया मेहता) अजूनही तितकीच डॉमीनेटिंग असल्याने करण (केशव साधना) आणि तिची केमिस्ट्री अद्याप जुळलेली नाही. ट्रिप्पीच्या उदाहरणावरून आपल्या नात्याच्या भविष्याबाबत साशंक असलेली नायरा बग्गाची विश्वासार्हता पारखून घ्यायचं ठरवते. इकडे ट्रिप्पी रविनापासून मुव्ह ऑन होण्यासाठी वेगवेगळ्या मुलींना इम्प्रेस करायचे अपयशी फंडे चालूच ठेवतो. दीपिकाच्या तुसड्या स्वभावामुळे वारंवार दुखावला गेलेला करण नायरा आणि ट्रिप्पीकडे मदत मागून त्याचं बुडत आलेलं रिलेशनशिप वाचवू पाहतो.
ह्या सगळ्या कोलाहलात नायरा, करण आणि ट्रिप्पी ह्या तिघांच्या एका चॅटगृपबद्दल बग्गा आणि दीपिकाला कळतं. गृपमधील चॅट चेक केल्यावर अर्थातच वातावरणात तणाव निर्माण होतो कारण त्या गृपवर हे तिघे बग्गा आणि दीपिकासंबंधित गंभीर विषयांवर चर्चा करून एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेत असतात. नात्यांमधील ‘ट्रस्ट इश्यूज’ अर्थात विश्वासार्हता हा तरुणाईला भेडसावणारा मुख्य प्रश्न इथंही उभा राहतो. या सगळ्या प्रसंगांना ही दोस्तमंडळी कशाप्रकारे सामोरी जाते, हे ‘कॉलेज रोमान्स’च्या नव्या सिझनमध्ये प्रेक्षकांना कळून येते.
हे वाचलंत का: त्रिभंग: ‘आई’पण तीन पिढ्यांचं
अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांनी उत्तम कामगिरी बजावत आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिलेला आहे. हिप्पीच्या भूमिकेतील ऐश्वर्या चौधरी आणि नुपूर नागपालने साकारलेली धातृप्रिया तसेच टिकटॉक स्टार्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरभी-समृद्धी मेहरा या जोडगोळीचा कॅमिओ आपलं वेगळेपण दाखवून देतात. पहिल्या सिझनमध्ये लक्षवेधी ठरलेला बग्गा ह्या सिझनमध्येही पुरेपूर भाव खाऊन जातो. गगन अरोराने कॉलेजचा डॅशिंग लौंडा आणि सेंटिमेंटल भिडू अशी बग्गाची दोन्ही रूपे अतिशय उत्तमरित्या वठवली असून, कित्येक प्रसंगात तो पडत्या कथानकाला उचलून धरण्यात सिंहाचा वाटा उचलत असल्याचं जाणवतं.
ह्या सिझनमध्ये पहिल्या सिझनसारखी तुफान कॉमेडी नसली तरी बऱ्याच प्रसंगांमध्ये विनोद इतक्या सहजरीत्या खुलवला गेला आहे की ही वेबसिरिज आता अधिकृतरित्या सोनीकडे गेली असली तरी त्यावरील ‘द टाईमलाईनर्स’चा असलेला प्रभाव पुन्हापुन्हा अधोरेखित होत राहतो. जुन्या सिझनमधील पात्रे आता अधिकच प्रगल्भ झालेली जाणवतात आणि विशेषतः काही प्रसंगांसाठी, जिथं इमोशन आणि ड्रामा योग्यप्रकारे वापरले गेलेत, त्यांचं हे नवं प्रगल्भ रूप प्रेक्षकांना जास्त भावतं. तुषार मल्लेकचं संगीत आणि सब सही है, तुझसे महका, चल दिये, क्या करें ही गाणी उत्तम जमून आलेली आहेत.
तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून ही सिरीज बनवली गेलेली असल्याने ह्यात कॉलेजला जाणारे सर्वच रिलेट करू शकतील अश्या घडामोडींचा समावेश केला गेला आहे. यात रोमान्स आहे, ब्रोमान्स आहे, शिव्या आहेत, संवेदनशीलता, कॉमेडी आणि इमोशनल ड्रामा तर आहेच, त्याजोडीला जबरदस्त ॲक्शनही आहे. पहिल्या सिझनप्रमाणेच फक्त पाच एपिसोड्स असलेला हाही सिझन नक्कीच बघण्यासारखा झालाय.