ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून…

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून…
“दार उघड बये, दार उघड…” अशी हाक मारत अवघ्या महाराष्ट्रातील वहिनींना भुरळ घालणारे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या घरात लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडपे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकरच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या रंगत आणली आहे. सोहम बांदेकरने स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अभिनयाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका खास क्षणामुळे तो चर्चेत आला आहे. सोहम लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी मराठी कलाविश्वात उत्सुकता वाढवली आहे.(Soham Bandekar Wedding News)

राजश्री मराठीने दिलेल्या माहितीनुसार, सोहम बांदेकर आपली जीवनसाथी म्हणून अभिनेत्री पूजा बिरारीची निवड करणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणारी पूजा बिरारी आता बांदेकर कुटुंबाची सून होणार, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, या बातमीवर अद्याप आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सोहम किंवा पूजा या कुणाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

पूजा बिरारी ही मराठमोळी अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘साजणा‘ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना तिची ओळख झाली. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून तिने घराघरांत लोकप्रियता मिळवली. सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ती बिग बॉस मराठी विजेता विशाल निकमसोबत काम करत आहे. पूजा २९ वर्षांची असून सोशल मीडियावरही ती सतत सक्रिय असते.(Soham Bandekar Wedding News)
================================
हे देखील वाचा: “Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar चा सरकारला सवाल…
================================
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या घरात लवकरच होणाऱ्या लग्नसोहळ्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी कलाविश्वातील या दोन घराण्यांचा हा सोहळा नक्कीच गाजणार आहे. सोहम आणि पूजाच्या या गाठीने बांदेकर कुटुंबात नव्या आनंदाचा वर्षाव होणार असून, प्रेक्षक या नव्या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.