नौशाद यांना संगीताची पहिली संधी देणारा गीतकार : डि एन मधोक
’आलम आरा’ या बोलपटाच्या प्रदर्शनानंतर गीतकारांची जी पहिली पीढी तयार झाली त्यात तिघांचा प्रामुख्याने केदार शर्मा, कवी प्रदीप आणि डि एन मधोक यांचा समावेश करावा लागेल.या तिघांनीही पुढची ३०-३५ वर्षे गीत लेखन केले. या त्रिमूर्तीतील डि एन मधोक या गीतकाराची बोलपटाच्या पहिल्या दोन दशकातील कामगिरी फार महत्वपूर्ण होती.
तो काळ मोठा संक्रमणाचा होता. एकीकडे सिनेमात गाण्यांची संख्या प्रचंड वाढत होती व त्याचा दर्जा दिवसेंदिवस घटत चालला होता. मधोकांनी गाण्यांना एक दर्जात्मक मूल्य प्राप्त करून दिले. सोपी,अर्थवाही व सामान्यांना सहज गुणगुणता येईल अशी गीतरचना कशी असावी याचा एक आदर्श वस्तुपाठ निर्माण केला.
२२ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन. (ज.१९०२)
(प्रेम नगर-१९४०) सैगलच्या कितीतरी अप्रतिम रचना मधोक यांच्या होत्या. स्वातंत्र्यपूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक संगीतकारांकरीता त्यांनी गीत लेखन केले.त्यांच कर्तृत्व केवळ गीतलेखना पुरते नव्हते तर कथा, पटकथा,संवाद,अभिनय आणि दिग्दर्शन या प्रांतातही त्यांनी वर्चस्व गाजविले. मधोक यांचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा ठरला १९४३ साली आलेला ’रतन’. यातील जोहराबाई अम्बालीवाला यांनी गायलेल्या ’ऑंखिया मिलाके जिया भरमाके चले नही जाना’,’रूमझुम बरसे बादलवा मस्त हवाये आयी पिया घर आजा’, सावन के बादलो उनसे ये जा कहो’तसेच अमीरबाई कर्नाटकीच्या स्वरातील ’मिलके बिछड गयी ऑंखिया हाय रामा’ करण दिवाण चे’जब तुमही चले परदेस लगाके ठेस’ या गाण्यांनी भारतभर धुमाकुळ घातला.
हेही वाचा : डीडीएलजे २५ वर्षांचा झाला !
नौशाद आणि मधोक या जोडीचा हा सर्वोच्य अविष्कार होता. १९४२ साली आलेल्या ’भक्त सूरदास’ मध्ये सैगल पहिल्यांदा मधोक यांची गाणी गायला. ’निस दिन बरसत नैन हमार’,’मधुकर श्याम हमारे चोर’ ’नैनेहीन को राह दिखा प्रभू ’पंछी बावरा’ या गाण्यातील गोडवा,शब्द रचना आजही मोहवून टकते. ’तानसेन’ चित्रपटातील सैगलचे ’सप्त सूरत तीन ग्राम’खूप गाजले.मुकेशचे पहिले गाणे ’दिल जलता है तो जलने दे’(पहली नजर) आणि सुरैय्याचे पहिले गाणे ’पंछी जा पीछे रहा है बचपन मेरा’(शारदा) मधोकनेच लिहिले होते. मलिका -ए-तरन्नूम नूरजहांच्या खानदान मधील गाजलेले ’तू कौनसी बदली मे मेरे चांद है आजा’ आणि लताची सुरूवातीच्या काळात गाजलेली ’बेईमान तोरे नैनवा नींदीया न आये’, ’वो दिन कहॉंगये बता’(तराना) मधोक यांच्याच लेखणीतून उतरलेली होती.
मधोक यांनी एस डी बातीश, शमशाद, रफी, सुरैय्या, मुकेश या सार्या गायकांच्या उमेदवारीच्या काळातील गाजलेली गाणी मधोक यांचीच होती. मधोक यांनी १८ चित्रपटांचे दिग्दर्शन ही केले. त्यांच्या गाण्यात बादल, पंछी, भंवरा, बरसात, हवा, घटा, फूल, पत्ते, नदी, झरना, पानी या शब्दांची रेल चेल असायची.
हे वाचलेत का ? रेखाचा पहिला सिनेमा
चाळीसच्या दशकात ते एवढे बीझी असायचे की संगीतकारांना ते फोनवरच गाणे सांगायचे!
इतकी सुंदर गाणी देणार्या या गीतकाराची प्रतिभा नंतर कशी आटली हे कळत नाही. त्यामुळे उत्तरार्धात मात्र त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.आपली ओळख हरवून मायानगरी पासून दूर हैद्राबादला ते स्थायिक झाले व तिथेच ९ जुलै १९८२ ला देवाघरी गेले.