
Dashavatar Movie Review : माणसातला अवतार दाखवणारा ‘दशावतार’
सध्याच्या काळात, सिनेमांचे विषय व कथानक यांचं स्वरूप बरंच बदललं आहे. पण, तरीही जंगलतोड सारखा सामाजिक विषय व त्याच्या जोडीला लोककलेसारखा पौराणिक गाभा असणाऱ्या कथानकासाठी पुढाकार घेण्याचं काम ‘झी स्टुडिओज्’ने ‘दशावतार’ या सिनेमाच्या रूपातून केलं आहे. (Dashavatar Movie Review)
चित्रपटाची कथा सुरू होते, तीच मिट्ट काळ्या अंधारातल्या कोकणातल्या जंगलात! अनेक वर्ष दशावतार सादर करत कलेची संस्कृती जपत तिच्याशी एकनिष्ठ असणारे बाबूली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) व त्यांचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) एकमेकांच्या साथीने आपलं सरळसाधं आयुष्य जगत असतात. माधवाच्या आयुष्यात वंदना (प्रियदर्शनी इंदलकर) ही गोड मुलगी असते. गावातील स्थानिकांसाठी जंगलातील कातळशिल्प हेच त्यांचं ग्रामदैवत असतं. बाबूलीची या ग्रामदैवतावर भारी श्रद्धा! अचानक, याच ग्रामदैवताच्या साक्षीने आयुष्यातला शेवटचा दशावतार महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याची बाबूली शपथ घेतो. आणि त्यानंतर ख-या अर्थाने सुरू होतो दशावताराचा खेळ! हे सगळं का, कसं घडतं? माधव-वंदनाचं पुढे काय होतं? या प्रश्नांची उत्तरं देणारा आणि “राखणदार तुमच्या डोक्यात आहे, जंगलात फक्त जनावरं असतात” हा भ्रम मोडीत काढणारा गूढ चित्रपट म्हणजे ‘दशावतार’!

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर, दिलीप प्रभावळकर ‘बाबूली मेस्त्री’ हे पात्रं अक्षरशः जगले आहेत. नंदू, गंगाधर टिपरे, तात्या विंचू, भुसनळे, महात्मा गांधी या पात्रांनंतर आता बाबूली मेस्त्री हे आणखी एक नवं पात्रं त्यांच्या भूमिकांच्या खजिन्यात जमा झालं आहे. दशावताराच्या प्रत्येक पात्रात व भावनिक दृश्यांत अभिनेता म्हणून ते किती कसलेले आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं.(Dashavatar Movie Review)
महेश मांजरेकर यांच्या दमदार एंट्रीतूनच त्यांचा दबदबा शेवटपर्यंत जाणवत राहतो. सुनील तावडे, विजय केंकरे व आरती वडगबाळकर यांनीही आपापल्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या आहेत. सिद्धार्थ मेनन व प्रियदर्शनी इंदलकर या फ्रेश जोडीची केमिस्ट्री छान जुळून आली आहे. भरत जाधव व अभिनय बेर्डे यांना नेहमीच्या सकारात्मक भूमिकांविरूद्ध या काहीशा वेगळ्या पात्रांत पाहताना मजा येते. गुरू ठाकूर यांची छोटीशी भूमिका त्यांनी अभिनयातून दाखवलेल्या बारकाव्यांमुळे चांगलीच लक्षात राहते.
============
हे देखील वाचा : Marathi Movie Remakes : मराठी भाषेतील चित्रपटांची बॉलिवूड आणि साऊथला भूरळ!
============
आता वळूया, तांत्रिक गोष्टींकडे! चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक फ्रेम वेगळा विचार करूनच दाखवली आहे. मग ती जंगलातील दृश्ये असोत वा पाण्यातली! प्रत्येक फ्रेममधून कोकणचं निसर्गसौंदर्य सुंदर पद्धतीने दाखवलं आहे. अंधारातले सिन्स, दशावतारासाठी तयार होणं व अशा अनेक गोष्टी सुंदर पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ड्रोन Shots तर कमालच झाले आहेत. VFX मुळे हा सिनेमा आणखी जिवंत वाटतो. या सिनेमातील VFX म्हणजे मराठीत क्वचितच दिसणाऱ्या भव्यतेचं जणू एक उत्तम उदाहरणच! सिनेमातील काजवे पाहताना तुम्हाला याचा अंदाज येईलच.
सिनेमातील संगीतही श्रवणीय आहे. दिलीप प्रभावळकर यांचे दशावतारातील काही सीन Background Score बरोबर पाहताना अक्षरश अंगावर काटा येतो. विशेषत:, ‘रंगपूजा’ हे सुंदर गाणं व त्यानंतरचा एक भावनिक सीन याचा ताळमेळ परफेक्ट बसलाय. स्क्रीनप्ले बद्दल सांगायचं झालं, तर फर्स्ट हाफ काहीसा संथ असला तरी स्टोरी बिल्डींगसाठी तो तितकाच महत्त्वाचा आहे. सेकंड हाफ मात्रं पावरफुल आहे. चित्रपटातील सर्वच संवाद उत्तम आहेत. त्यात कुठेही कृत्रिमपणा, तोचतोचपणा नाही. त्यामुळे संपूर्ण चित्रपटभर मालवणी भाषेची एक सुंदर Vibe क्रिएट होते. वेशभूषा व रंगभूषा हा देखील सिनेमाचा एक Strong Point म्हणावा लागेल. एका गूढ कातळशिल्पाभोवती सिनेमाचं अख्खं कथानक फिरवणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलण्याची लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यशस्वी ठरले आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. (Dashavatar Movie Review)
या सिनेमामुळे ग्रामदैवत, कातळ शिल्प, खेळे, दशावतार अशा लोप पावत चाललेल्या संस्कृतींचा वारसा जपला जाईल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील लोककला, कोकणची संस्कृत पुढील पिढीपर्यंत पोचवण्यासाठी ‘दशावतार’चा सुंदर अनुभव प्रत्येकाने एकदातरी थिएटरमध्ये जाऊन घ्यावाच!
‘कलाकृती मीडिया’ ‘दशावतार’ या सिनेमाला देत आहे ४ स्टार्स!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics