हॅलो इन्स्पेक्टर ते ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर.. डॅशिंग अभिनेता रमेश भाटकर
“हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो…इन्स्पेक्टर….इन्स्पेक्टर….रात्रंदिनी…हो हो हो….संरक्षणी..” ही गाण्याची धून कानी पडायची आणि रुबाबदार अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांची एन्ट्री व्हायची. दूरर्शनच्या दर्जेदार मालिकांच्या काळात गाजलेल्या काही मालिका आजही आठवणीत आहेत. त्यातलीच एक म्हणजे हॅलो इन्स्पेक्टर.
जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या सहजसुंदर अभिनयानं गाजलेली ही मालिका त्यांच्या अभिनय प्रवासातील प्रमुख मालिका ठरली. आपल्या अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर राज्य करणाऱ्या रमेश भाटकर यांचा 3 ऑगस्टला स्मृतीदिन.
रमेश भाटकर प्रसिद्ध भजनसम्राट-संगीतकार स्नेहल (वासुदेव) भाटकर यांचे सुपुत्र. ३ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला. वासुदेव भाटकर हे मोठे भजनसम्राट होते. त्यांच्या कलेचा वारसा या मुलात आला. अभिनयाची लहानपणापासून आवड असलेल्या रमेश भाटकर यांची रुची जलतरण आणि खो-खो सारख्या खेळांमध्येही होती.
रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शन मालिका, रंगभूमी आणि चित्रपटात विविधांगी भूमिका केल्या. पण त्यांचं खरं प्रेम होतं ते रंगभूमीवर. याच माध्यमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यामुळे रंगभूमीबाबत त्यांना विशेष आस्था होती. रंगभूमीला सर्वस्व देणाऱ्या या अभिनेत्यांची आठवण कायम त्यांच्या अभिनयातून मराठी मनात रहाणार आहे.
रंगभूमीवर त्यांची ओळख झाली ती ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या माध्यमातून. अश्रूंची झाली फुले हे नाटक रमेश भाटकर यांच्या कारकिर्दीतील एक सोनेरी पान ठरले. ज्येष्ठ लेखक वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून हे नाटक रंगमंचावर आले आणि रमेश भाटकर यांच्या अभिनयातून मराठी घराघरांत पोहचले. अश्रूंची झाली फुलेमध्ये भाटकर यांनी लाल्याची भूमिका केलेली.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी यापूर्वी या लाल्याला जिवंत केलं. त्यांच्यानंतर कोणीही लाल्या हे पात्र रंगवू शकत नाही, अशीच सर्वांचीच धारणा होती. काशिनाथ घाणेकरांबरोबर कायम तुलना होईल म्हणून कोणीही मातब्बर अभिनेता या भूमिकेसाठी तयारही होत नव्हते. शेवटी नवख्या रमेश भाटकरांकडे ही संधी आली आणि त्यांनी लाल्याला पुन्हा जिवंत केलं.
काशिनाथ घाणेकर यांची छाप पुसून न टाकता, आपला अभिनय, खर्जातला आवाज आणि प्रचंड बोलका चेहरा व डोळे या जोरावर त्यांनी हा लाल्या त्यांनी साकारला; तोही तब्बल 28 वर्ष! नाटकक्षेत्रातील हा एक विक्रमच होता. प्रभाकर पणशीकर, अशोक समेळ, चित्रा साठे, शमा वैद्य, अप्पा गजमल, रमेश भिडे, राजाराम चव्हाण यासारख्या रंगभूमीवर दबदबा असलेल्या कलाकारांसमोर नवख्या रेमश भाटकरनं उभं राहून आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं.
रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांची ‘अश्रूंची झाली फुले’ मधून प्रेक्षकांना ओळख झाली आणि त्यांची मागणी वाढू लागली. याबरोबरच भाटकर यांचीही रंगभूमी, दूरदर्शन मालिका व चित्रपट या तिनही माध्यमात मुशाफिरी चालू झाली. जवळपास तीस वर्षाच्या या प्रवासात भाटकर यांनी 100 हून अधिक चित्रपट, तर 50 हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे.
कमांडर, दामिनी, बंदिनी, युंगधरा, हॅलो इन्स्पेक्टर, खोज, माझे पती सौभाग्यवती यासारख्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये रमेश भाटकर प्रमुख भूमिकेत होते. हॅलो इन्स्पेक्टर आणि दामिनीसारख्या दूरदर्शन मालिकांनी तर रेकॉर्ड केले. पण त्यातही हॅलो इन्स्पेक्टर आणि कमांडर यासारख्या मालिकांमध्ये रुबाबदार भाटकर यांची विशेष छाप पडली. कमांडर मधील त्यांच्या डिटेक्टीव्हनं अनेकांना भूरळ घातली.
1977 मध्ये त्यांनी चांदोबा चांदोबा भागलास का, या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अष्टविनायक, आपली माणसं, चांदोबा चांदोब भागलास का, दुनिया करी सलाम, माहेरची साडी, मराठी बटालियन….ही काही मोजक्या चित्रपटांच्या नावाची यादी आहे. या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यातही माहेरची साडी हा चित्रपट अनेक महिने हाऊसफुल चालत होता. अखेर तू येशीलच, अश्रूंची झाली फुले, केव्हा तरी पहाटे, मुक्ता, राहू केतू या नाटकांतून भाटकर रंगभूमीवर राज्य करीत होते.
छोटा पडदा, मोठा पडदा आणि रंगभूमीवर वावर असलेला राजा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख होतो. अश्रूंची झाली फुले हे नाटक प्रचंड गाजलं. नवोदित कलाकारांसाठी रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) हे एक आधार असायचे. आवाजावरची पकड आणि खणखणीत अभिनय यामुळे भाटकर हे कायम प्रेक्षकांच्या हृदयात राहिले.
=========
हे देखील वाचा – तब्बेत ठीक नसतानाही मोहम्मद रफी यांनी ‘या’ अभिनेत्यासाठी केले पुन्हा रेकॉर्डिंग
=========
‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा भाटकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. डॅशिंग अभिनेते म्हणून ओळख असलेल्या रमेश भाटकर यांचा ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये जीवनगौरवपुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वयाच्या सत्तरीमध्ये या अभिनयाच्या कमांडरला कॅन्सरसारख्या रोगानं घेरलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या गुणी अभिनेत्याचे नाव मात्र मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका आणि मराठी माणसाच्या ह्दयात कायम राहणार.