एक शून्य शून्य: क्राईम थ्रिलर मालिकांचा सुरु झालेला प्रवास
क्राईम थ्रिलर मालिकांचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग असतो. सध्या नाना प्रकारच्या चॅनेल्सवर अनेक प्रकारचे क्राईम शोज चालू असतात. अगदी न्यूज चॅनेल्सही अशा प्रकारचे शो प्रसारित करत असतात. परंतु, पूर्वी असं नव्हतं. त्यावेळी मुळात दूरदर्शन सोडून इतर कोणतंही चॅनेल अस्तित्वात नसल्याने अशा प्रकारचं कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांकडे केवळ चित्रपटांचा पर्याय उपलब्ध होता.
प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करून त्यावेळी दूरदर्शनच्या डीडी नॅशनल आणि सह्याद्री अशा दोन्ही वाहिन्यांवर क्राईम थ्रिलर मालिका सुरू करण्यात आल्या. यापैकीच एक म्हणजे १९८८ साली सह्याद्री वाहिनीवर सुरू झालेली ‘एक शून्य शून्य’ (Ek shunya shunya) ही मालिका.
‘एक शून्य शून्य’ ही मालिका बी. पी. सिंग यांची होती. हो! हे तेच बी. पी. सिंग ज्यांनी सोनी टीव्हीवरच्या लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिकेची निर्मिती केली होती. मालिकेचे लेखक होते विक्रम भागवत.
‘एक शून्य शून्य’ (Ek shunya shunya) आणि ‘सीआयडी’ (CID) या दोन्ही मालिकांची नावं वाचल्यावर किंवा ऐकल्यावर एक नाव हमखास समोर येतं ते म्हणजे शिवाजी साटम. फार कमी लोकांना माहिती असेल की, बी पी सिंग आणि शिवाजी साटम ‘सीआयडी’ मालिकेच्याही आधीपासून एकमेकांसोबत काम करतायत.
‘एक शून्य शून्य’ (Ek shunya shunya) मालिकेमध्ये निर्भीड आणि प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांत पाटकर (शिवाजी साटम), यांच्यासोबत अजय फणसेकर आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये अनंत जोग देखील मुख्य भूमिकेत होते. दर आठवड्याला एक गुन्हा आणि त्याचा तपास मालिकेमध्ये दाखविण्यात येत असे. मध्यंतरी शिवाजी साटम यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून मालिकेच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा देणारं एक ट्विट केलं होतं.
‘पोलीस’ म्हटल्यावर त्यांच्याबद्दल मनात आदरयुक्त भीती निर्माण होण्याचा तो काळ होता. पोलिसांची कार्यपद्धती कशी चालते, तपासाची दिशा कशी ठरवतात, एका छोट्याशा धाग्यांवरून गुन्हेगारांपर्यंत कसं पोचतात; इतकंच काय तर गुन्हा कसा घडतो अशा सर्व गोष्टींबद्दल तेव्हा सर्वसामान्य माणूस अनभिज्ञ होता. ‘एक शून्य शून्य’ मालिकेमधून या सर्व गोष्टी घराघरात पोचल्या त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली.
शिवाजी साटम यांना तर या मालिकेमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. लोक त्यांना खरोखरचेच पोलीस इन्स्पेक्टर समजू लागले आणि पुढेही त्यांनी सीआयडी मालिकेमध्ये एसीपीची भूमिका साकारल्यामुळे त्यांच्यावर जणू पोलीस ऑफिसरच्या भूमिकेचा शिक्काच बसला.
त्या काळात लहान मुलांना अशा प्रकारचे क्राईम शो बघायची परवानगी नव्हती. तसं बघायला गेलं तर, चित्रपट असो किंवा मालिका त्यामधून हिंसा अत्यल्प प्रमाणात दाखवण्यात येत असे. तरीही मुलांना शक्यतो यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. कारण लहान वयात ‘असलं’ काही दृष्टीस पडायला नको, ही त्यामागची भावना होती. त्यामुळे मालिका बनवतानाही कुटुंबातील सर्वजण एकत्रित बसून मालिका बघू शकतील, याची विशेष काळजी घेतली जात असे.
‘एक शून्य शून्य’ (Ek shunya shunya) मालिका बनवतानाही या गोष्टींचे भान ठेवण्यातं आलं होतं. त्यामुळे सुरुवातीचे काही भाग सोडल्यास नंतर मात्र हळूहळू पालकांनी मुलांना ही मालिका बघायची परवानगी दिली. सांगाड्यावरून चेहरा बनवणे, चोरीचा तपास अशा अनेक गोष्टी बघताना प्रेक्षक आपल्या बाबतीत गुन्हा होऊ नये म्हणून काळजी घ्यायलाही शिकत होते. मुळात आजच्या मालिकांमध्ये जसा भडकपणे गुन्हा घडताना दाखवण्यात येतो तसा प्रकार या मालिकेत कधीच बघायला मिळाला नाही.
==========
हे देखील वाचा – सरकारनामा: सिस्टीममध्ये टिकून राहायचं असेल, तर सिस्टीम समजून घेणं आवश्यक आहे
==========
गुन्हेगाराची शोध घ्यायची पद्धतही पूर्ण अभ्यापूर्वक दाखवण्यात आली होती. त्यामुळे काही केसेस अविश्वसनीय वाटत असल्या तरी, त्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसत असे. अर्थात याचे श्रेय दिग्दर्शकासोबत कलाकारांच्या परिणामकारक अभिनयालाही जाते.
नक्की सांगता येणार नाही, परंतु ‘एक शून्य शून्य’ ही मालिका बहुदा मराठीमधील क्राईम शोवर आधारित पहिली मालिका होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता लाभली आणि यामधील कलाकारांनाही. दूरदर्शनचं ८० आणि ९० चं दशक म्हणजे ‘गोल्डन एरा’ होता. सह्याद्री वाहिनीने जुन्या मालिका पुन:प्रसारित कराव्यात किंवा प्रेक्षकांसाठी किमान यू-ट्यूबवर तरी उपलब्ध करून द्याव्यात.