सुनील दत्त: लाडका अभिनेता बनला कार्यक्षम नेता
१७ वर्ष झाली त्यांना आपल्यातून जाऊन… किती आकस्मिक गाठलं त्यांना मृत्युने. कोणाला कल्पना होती की ते इतक्या लवकर अलविदा म्हणतील आपल्याला पण एका साध्या, सरळ, सज्जन, पापभिरू माणसाचा अभिनेत्यापासून खासदार वा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास कुणालाही चकित करणाराच होता यात शंका नाही. ‘परबत परबत, गाता जाये बंजारा ले कर दिल का इक तारा’ असा रेल्वे प्लॅटफॉर्मवरून सुरु केलेल्या वाटचालीची ही कहाणी आहे.
भारत पाकिस्तान फाळणीमुळे ज्या कुटुंबाना अनंत यातना कष्ट व हजारो मैलाची वणवण व निर्वासिताचं जिणं वाट्याला आले त्यापैकी एक सुनील दत्त (Sunil Dutt) होता पण हार न मानता या युवकाने सतत अडचणीवर मात करत, दगडधोंडयातून रस्ता काढत प्रवास केला. रेडिओ सिलोनवर अनाऊंन्सर म्हणून आपल्या भारदस्त आवाजाची जादू पसरवत असतानाच हिंदी सिनेमातील तत्कालीन आघाडीची नायिका नर्गीस (Nargis) यांची मुलाखत घेतली. या लाजाळू युवकाला फिल्मलाईनमध्ये येणार? अशी ऑफर देणारी ती नायिका अन तिला आगीच्या फुफाटयातून वाचवताना आकस्मिक लग्नाची मागणी घालणारा सुनील उर्फ बलराज दत्त दोघही अफलातून, अव्दितीयच म्हणावे लागतील. तिच्या आयुष्याची पूर्वपिठिका माहित असतानाही उमद्या मनाने तिचा स्विकार करणारा बलराज म्हणूनच सिनेमात राहूनही फिल्मी नाही याची खात्री पटते. मदर इंडिया चित्रपटात स्व. सुनिल दत्त यांच्यावर चित्रित एक गाणे आहे. ‘ना मै भगवान हूँ ना मै शैतान हूँ, दुनिया जो चाहे समझे मै तो इन्सान हूँ.’ आज सुनिल दत्तची आठवण झाली की, या ओळी त्याला जशाच्या तशा लागू होतात हे लक्षात येते. अभिनेत्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास खासदारकी व मंत्रीपदापर्यंत गेला तरी तो आतून बाहेरुन एक सच्चा इन्सान होता हेच सिध्द करतात. कष्टसाध्य प्रयत्नांना चिकाटी व दृढनिश्चयाची साथ असली की माणूस कोठून कोठपर्यंत जाऊ शकतो याचे जितेजागते उदाहरण म्हणजे सुनिल दत्त.
सिनेसृष्टीत येण्यापूर्वी तो मुंबईत आला. फाळणीचे दुष्परिणाम भोगतच निर्वासिताच जीण लाभलेल्या त्यावेळच्या सुनील दत्तकडे (Sunil Dutt) काय होतं? काहीही नाही… पण अंगी असलेला प्रचंड आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, चिकाटी व कष्ट करण्याची विजिगेशु महत्वांकांक्षा यावर तो लवकरच स्थिरावला. भरदार घनगंभीर आवाज, देखणे व्यक्तिमत्व यामुळे त्याला तेव्हाच्या रेडिओ सिलोनच्या हिंदी विभागात निवेदक म्हणून संधी मिळाली. इथेच काम करत असताना सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या प्रसंगनिमित्ताने मुलाखती घेत असताना अचानक एकदा त्याला नर्गिसची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्याचे रुबाबदार व्यक्तिमत्व व भारदार आवाज हेरुन अनौपचारिक गप्पात सहज म्हणून नर्गिसने त्याला तू सिनेमात का नाही काम करत असे विचारले. त्यावेळी तो काही बोलला नसला तरी त्याच्या हृदयात ती ठिणगी पडली. अन त्यादृष्टीने प्रयत्नांना त्याने सुरवात केली. निर्माते मोहन सैगल (Mohan Segal) यांच्याशी भेट होताच त्यांनी या तरुण मुलाला त्यांच्या रेल्वे प्लॅटफॉर्म या आगामी सिनेमासाठी करारबध्द केले अन सुनिल दत्तचा बस्ती बस्ती परबत परबत गाता जाये बंजारा लेकर दिलका इक तारा हा प्रवास संपला.
सुनिल दत्त हा मधल्या फळीतला नायक. राजेंद्रकुमार, प्रदिपकुमार, भारत भूषण वा राजकुमार, अजित यांच्या कॅटेगरीतला पण नशिबाने त्याला जे चित्रपट मिळाले ते बहुतेक सामाजिक व नायिकाप्रधान. साधना एकही रास्ता, मै चुप रहूंगी, गुमराह, आज और कल, या त्याच्या चित्रपटांची जातकुळी त्याला यशाच्या मार्गाने घेऊन गेली. मिनाकुमारी, मालासिन्हा, साधना अशा तेंव्हाच्या नायिकांबरोबरचे त्याचे नायिकाप्रधान चित्रपट गाजले. सोबर व्यक्तिमत्व. देहबोलीतून व्यक्त होणारी ऋजुता, सभ्यता, कोमलता व सहृदयीपणा सर्वसामान्य प्रेक्षकांना भावत होता. त्याच्या चित्रपटातील संगीत सदाबहार ठरले. मग त्याचे दिग्दर्शक रवी असो वा एन दत्ता किंवा शंकर जयकिशन किंवा मदन मोहन वा जयदेव किंवा चित्रगुप्त बी आर चोप्रा सारखे बॅनर. चांगल्या सकस, कौटुंबिक, सामाजिक आशय असलेल्या कथा व दर्जेदार संगीत यामुळे सुनिल दत्तची कारकिर्द दिन दूनी रात चौगुनी रंगत गेली.
हे देखील वाचा : ‘मदर इंडिया’ नावाची अनटोल्ड स्टोरी
सुनील दत्तची (Sunil Dutt) कारकिर्द आठवू लागलो की चटकन आठवतात ते मै चूप रहूंगी, गुमराह, पोस्ट बॉस नं. ९९९, इन्सान जाग उठा, ये रास्ते है प्यारके, हम हिंदूस्थानी, एक फूल चार कांटे, बेटीबेटे, मुझे जीने दो सारखे कृष्णधवल चित्रपट व रंगीत जमान्यातील वक्त मेरा साँया, आम्रपाली, प्राण जाय पर वचन ना जाये, मिलन, खानदान, हमराज, जखमी, नागीन ते थेट दर्दका रिश्ता, परंपरा मुन्नाभाई एमबीबीएस पर्यंतचे सर्व चित्रपट. अजंठा आर्टस या त्याच्या निर्मिती संस्थेमार्फत निर्मित त्याचा पहिलाच डाकूच्या जीवनावरील ‘मुझे जीने दो’ हा चित्रपट त्यावेळी जयदेवच्या अजरामर सदाबहार संगीतासह तुफान गाजला. आज और कल, गुमराह, वक्त, सारख्या चित्रपटात सोबर पापभिरु नायकाच्या भूमिका वठवणा-या सुनीलदत्तला मुझे जीने दो सारख्या रफटफ चित्रपटात चंबलच्या खो-यातील निघृण, क्रूर व निष्ठुर दरोडेखोराच्या भूमिकेत बघणे हा एक चमत्कारच होता. त्यानंतर त्याने आपल्या अजंठा आर्टसतर्फे रेश्मा और शेरा, यादेसारखे चाकोरीबाहय चित्रपट काढून मळलेल्या वाटेने जायचे नाकारले.
ज्या नर्गिसने कोणे एकेकाळी १९५४ च्या सुमारास त्यांच्यातील टॅलेन्ट ओळखून त्याला सिनेसृष्टीत येण्याचे निमंत्रण दिले होते त्याच नर्गिसबरोबर झालेला त्याचा प्रेमविवाहसुध्दा तेंव्हा विलक्षण गाजला तो अनेक कारणांनी… एक तर मदर इंडिया (Mother India) या स्व. महबूब यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नर्गिसला आगीच्या ज्वाळेतून वाचवताना त्याने घातलेली लग्नाची मागणी म्हणजे सिनेसृष्टीला व रसिकांना प्रचंड धक्का होता. कारण तेव्हा राजकपूर (Raj Kapoor) नर्गिस ही जोडी हॉट केक प्रकारात मोडत होती. जागते रहो पासून विलग झाले तरी त्यांच्या पडद्याआडच्या गाठीभेटीची व रुपेरी पडद्यावरील केमिस्ट्रीची चर्चा थांबत नव्हती. मदर इंडियादेखील तिने राजकपूरचा रोष पत्करुनच स्विकारला होता. त्यात परत आता मदर इंडिया मध्ये राधाचा चॅलेंजिंग रोल करतानाच आपला जीव वाचवणा-या सुनील दत्तला (Sunil Dutt) पती म्हणून स्विकारण्याचा निर्णयही आगीत तेल ओतणाराच होता. कारण मदर इंडियात ती सुनील दत्तची आई होती. त्यामुळेच स्व.महबूब यांनी त्यांना मदर इंडिया रिलीज होईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता. जो त्यांनी शिरसावंद्य मानला. चित्रपटातील हा सरळमार्गी, सालस, लाजाळू नायक त्याच्या खासगी जीवनात तसाच होता असं नव्हे तर मदतीला त्याच्याकडे येणा-या कोणत्याही माणसाला तो भरभरुन मदत करुन त्यांची दुवा घेत असे.
नर्गिस व त्याने चित्रपटात काम करता करताच समाजाच्या भल्यासाठी जे उपक्रम राबवले तेही दुर्लक्ष करण्यासारखे खचितच नव्हते. जवानांच्या मनोरंजनासाठी उत्तरेकडील सीमेवर जाऊन त्यांचे मनोरंजन करणे असेल वा दुर्धर आजाराने पीडीत माणसांसाठीचे कार्य असेल. त्यांच्या समाजकार्याची पावती प्रथम नर्गिसला खासदारकी नंतर पद्मश्रीच्या रुपाने तर सुनील दत्तलाही (Sunil Dutt) जनतेने एकदा दोनदा नव्हे तर लागोपाठ तीनदा लोकसभेवर पाठवून अधिक लोककल्याणासाठी प्रेरीत केले. क्रीडामंत्री असतानाच त्याचे अचानक झालेले निधन अनेकांना चटका लावून गेले. आंतरबाहय सभ्य, सुसंस्कृत, विचारी विवेकी व संयमशील अशा या समतोल व्यक्तिमत्वाने अभिनेता काय किंवा नेता, किती निष्कलंक व निस्पृह असावा याचा जणू मापदंडच घालून दिला.
- दिलीप कुकडे