आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
अमेरिकेच्या वाद्यांनी सजला “सुखी माणसाचा सदरा”…
२०२० हे वर्ष अनेकांना खडतर गेलं, पण जसजशा गोष्टी अनलॉक होत गेल्या, तशी नवीन कामेही सुरु झाली. टीव्ही वाहिन्यांवर नवीन मालिका सुरु झाल्या. अशीच एक कलर्स मराठीवरील नवीन मालिका म्हणजे “सुखी माणसाचा सदरा”. या मालिकेच्या शीर्षकगीताला संगीत दिले आहे निहार शेंबेकर या तरुण संगीतकाराने आणि हे गीत निहारनेच गायले आहे.
हे नक्की वाचा: केदार शिंदे झाले होते ‘मुख्याध्यापक’
या संदर्भात निहार म्हणाला, “लॉकडाऊन नंतरचे मला मिळालेलं हे पहिलं काम आहे. मी केदार शिंदे यांच्या संपर्कात फेसबुकच्या माध्यमातून होतो. एकदा अचानक त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की एका नवीन मालिकेचं शीर्षकगीत आहे. त्या गीताचं संगीत तू करशील का? पण अजूनही काही जणांना मी ते गीत दिले आहे, पण तू सुद्धा चाल देऊन रेकॉर्डिंग पाठव. मालिका एका कुटुंबाविषयी आहे आणि त्या संगीतात साधेपणा आणि गोडवा हवा, असे केदार शिंदे म्हणाले. गीतकार अश्विनी शेंडे यांचे शब्द होते, “फॅमिली लाखात एक अशी, सोशिक आणि सोशल ही, गुंत्यातून विणला कोणी चेहरा हसरा, ज्याला त्याला हवा सुखी माणसाचा सदरा.”
हे शब्द वाचताना मला पटकन चाल सुचली. ‘दुतारा’ या बंगाली वाद्याचा वापर करून माझ्याच आवाजात स्क्रॅच रेकॉर्डिंग करून मी ते गीत केदार शिंदे यांना पाठवलं. “पुढे काय घडलं, याची कहाणी तर अधिक रंजक आहे. केदारने ते गाणे ऐकले आणि निहारला फक्त “श्री स्वामी समर्थ” असा एक संदेश पाठवला. पण निहारला नेमकं काय ते समजलं नाही आणि मग दोन- तीन दिवसांनी केदार शिंदे यांनी निहारला फोन करून कळवले की तू दिलेली गाण्याची चाल खूप आवडली आहे आणि आता ते गाणे तुझ्याच आवाजात रेकॉर्ड करायचे आहे.
हे वाचलंत का: अभिनय क्षेत्रात चिराग पाटीलने मारले ‘सिक्सर’
निहारला खूप आनंद झाला. स्वतः एक उत्तम गायक असल्याने त्याच्या आवाजातील फ्रेशनेस सर्वांनाच आवडला आणि मग गायक आणि संगीतकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेलण्याची संधी निहारला मिळाली. एक संगीतकार या नात्याने निहारने या गाण्याचा बाज लोकसंगीताचा फील येणारा ठेवला आहे. दुतारा, मेंडोलिन, अमेरिकन बेंजो या वाद्यांचा वापर त्याने या शीर्षकगीतात केला आहे. शिवाय गाण्यात कोरसचा वापर आहे.
या मालिकेतील कुटुंबात महिला जास्त असल्याने फिमेल कोरसचा वापर करायचे ठरले. शिवाय या गाण्याचे संगीतकार या नात्याने अजून एक वैशिष्ट्य निहारने सांगितले, “सुखी माणूस आनंद व्यक्त करताना काय करेल, असा विचार केला आणि मग आनंदाने माणूस शिटी वाजवतो, असा विचार मनात आल्याने, या शीर्षकगीताची सुरुवात शिटीने होते.” एल एम स्टुडिओमध्ये “सुखी माणसाचा सदरा” मालिकेच्या शीर्षकगीताचे ध्वनिमुद्रण झाले आहे.