‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
“मेरे पास माँ है!”
“मै आजभी फेंके हुये पैसे नहीं उठाता” हा डायलॉग कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात डॉक वर काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या पण मनात एक वेगळीच अस्वस्थता घेऊन फिरणारे बच्चन साहेब म्हणजेच सुप्रसिद्ध दिवार चित्रपटातलं विजय हे पात्र.
दिवार हा सिनेमा सगळ्याच लेव्हलवर खूप हटके सिनेमा आहे, आजही तो सिनेमा त्यातली पात्र तुम्ही सध्याच्या काळाशी रिलेट करू शकता. आजही मुंबईसारख्या शहरात गुंडाच्या नावाखाली गरीबांची गळचेपी होत असते, आजही मुंबईत क्राईम तितकाच आहे, किंबहुना वाढलाच आहे, पहिले फक्त बेकायदेशीर वस्तूंचं स्मगलिंग व्हायचं पण आता अंमली पदार्थ म्हणू नका की काय सगळ्याच गोष्टींची तस्करी चालू आहे. आणि आजही तुम्हाला विजय सारखं पात्र कुठे ना कुठे तरी पाहायला मिळेल!
परिस्थितीमुळे नको त्या मार्गावर गेलेलं, ह्या सगळ्या सिस्टीम बद्दल मनात एक अढी निर्माण करून बसलेला विजय आजही तुम्हाला दिसेल आणि म्हणूनच यश चोप्रा दिग्दर्शित दिवार हा फक्त कल्ट क्लासिक सिनेमा नसून तो तितकाच रिलेटवबल आहे.
१९७५ ला जेंव्हा रिलीज झाला तेंव्हा बच्चन साहेब आनंद, जंजिर, नमक हराम अभिमान असे सिनेमे करून यशाच्या शिखरावर विराजमान होते. जंजिर मध्ये त्यांची अँग्री यंग मॅन ही इमेज तयार केली गेली आणि तीच इमेज खुलवली गेली ती १९७५ साली आलेल्या दिवार मधून, लेखक तेच सलीम जावेद. पण जंजिर सारखा ह्या वेळेस दिवार मध्ये मात्र वन मॅन शो नव्हता.
ह्यात आणखीन एक पात्र होतं ते म्हणजे विजय वर्मा ह्याचा सख्खा भाऊ रवी वर्माचं. आणि हीच खरी मेख आहे सलीम जावेद च्या लिखाणाची आणि यश चोप्रा ह्यांच्या दिग्दर्शनाची. संपूर्ण सिनेमाभर तुम्ही विजय वर्मा ह्या पात्रावर खिळून असता पण तुमच्या नकळत रवी वर्मा कधी तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर करून जातो हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. विजय आणि रवी ही दोन टोकं हे अगदी सिनेमाच्या सुरुवातीपासून आपल्या मनावर कोरलं जातं.
रवी वर्मा आणि विजय वर्मा जेंव्हा प्रथम त्यांच्या कामाला जायला निघतात तेंव्हा त्यांचे २ वेगळे मार्ग आपण बघतो. विजय हा पहिले डॉक वर काम करून नंतर बेकायदेशीर वस्तूंच्या स्मगलिंग मध्ये अडकतो, रवी वर्मा शिकून पोलीस ऑफिसरची नोकरी पत्करतो. दोघांची स्वप्नं वेगळी आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेले मार्ग सुद्धा परस्परविरोधी. एक गुन्हेगार तर दुसरा गुन्हेगारीला आळा घालायचा विडा उचलेला ऑफिसर, जेंव्हा त्याच्या समोर त्याच्या भावाच्या गुन्ह्याच्या कच्चाचिठ्ठा समोर येतो तेंव्हा तो काही वेळासाठी डगमगतो पण लगेच त्याला ही जाणीव होते की ह्या समाजात कित्येकांवर अन्याय होतात म्हणून काय प्रत्येकजण गुन्हेगार होत नाही!
तिथून पुढे रवी वर्मा हा विजय वर्मापेक्षा जास्त भावतो. भले त्याच्या गरजा कमी आहेत, पण तो एक सच्चा इमानदार कर्तव्यदक्ष ऑफिसर आहे. तो त्याच्या तत्वांशी प्रामाणिक आहे. जेंव्हा तो फेमस सिन आपल्यासमोर आजही येतो जेंव्हा विजय रवीला त्याची लायकी दाखवतो त्याला त्याच्या गरीबीची जाणीव करून देतो. त्यावर रवीचं ते एक वाक्य “मेरे पास माँ है!” हे आजही आपल्या काळजात रुतून बसलेले आहे.
त्या एका सिन मधून लेखक दिग्दर्शक इतकं काही भन्नाट सांगून गेलेत की त्यापुढे इतर सगळे डायलॉग अगदी फिके वाटतात. स्वतःच्या नीतीमूल्यांशी प्रामाणिक असलेला रवी वर्मा जेंव्हा शेवटी विजय ला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देतो तेंव्हा काही सेकंद त्याच्यातला भाऊ आपल्याला दिसतो, पण तरीही नात्यांच बंधन झुगारून स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यासाठी रवीने उचलेल ते पाऊल प्रत्येकाला उचलता येईल की नाही हे सांगणं कठीणच आहे.
हा सिनेमा फक्त सिनेमा नसून एक खूप मोठा धडा आहे. आयुष्यात अन्यायाला कसं सामोरं जायचं, कुणी आरे केलं की आपण कारे केलंच पाहिजे हे हा सिनेमा शिकवतो, पण त्याचबरोबरीने ते करताना आपण समाजाचं आणि स्वतःच्या कुटुंबीयांच नुकसान करत नाही ना याची खात्री सुद्धा करावी. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गुन्हेगारी हा मार्ग कधीच नसतो.
स्वतःच्या आईने ज्या साईट वर विटा उचलायच काम केलं आहेबती इमारत विकत घेऊन आईला गिफ्ट म्हणून देणारा विजय वर्मा आणि ह्या सगळ्या भौतिक सुखाच्या पलीकडचं आईच्या मनातलं खरं सुख समजून घेणारा रवी वर्मा आपल्याला योग्यच वाटतो आणि कारण तो प्रत्येक बाबतीत योग्यच असतो. दिवार बघताना आजही लोकं विजय वर्माला डोक्यावर घेतात कारण वेगवेगळी असतील पण दिवरचा खरा हिरो हा रवी वर्माच आहे आणि राहील, कारण जोवर विजय सारखी लोकं आहेत तोवर रवीसारख्या माणसांचं असणं अनिवार्य आहे!