Susheela-Sujeet : बाल्कनीमधून ‘सुशीला-सुजीत’ का ओरडत आहेत हे लवकरच कळणार!

देव करीता रफी: मेरा मन तेरा प्यासा….
रूपेरी पडद्यावरील मॅटीनी आयडॉल, आधुनिक ययाती, ’हर फिक्र को धुएं में उडाता चला गया’ हे साहिरचे तत्वज्ञान आपल्या वास्तव जीवनात अंगीकारणारा आणि गोल्डन इरातील सदाबहार त्रिकूटातील एक देव आनंद याचा आज जन्मदिन. आज देव हयात असता तर ९७ वर्षांचा झाला असता (२६ सप्टेंबर १९२३ चा त्याचा जन्म). त्याचावर चित्रित गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. आज कोणत्याही सांगितिक कार्यक्रमाची पूर्तता याच्या गाण्याशिवाय होत नाही. देव साठी किशोरकुमारचा स्वर आपल्याला ठायी ठायी भेटतो, किंबहुना किशोरची सत्तरच्या आधीची बव्हंशी लोकप्रिय गाणी ही देव वर चित्रीत असलेलीच होती. पण काही ठिकाणी मात्र जाणीवपूर्वक देव करीता किशोर सोडून इतर पार्श्वगायकांचा स्वर वापरला गेला. याचा धांडोळा घेतला तर हे कॉम्बिनेशन देखील कमालीचे लोकप्रिय झाल्याचे दिसते. एकाच चित्रपटात देवला दोन भिन्न पार्श्वगायक असला प्रकार देखील केला गेला (गाईड). सचिनदांनी प्रामुख्याने किशोरला देवचा स्वर म्हणून पुढे आणले असले, तरी साठच्या दशकात किशोरच्या बरोबरीने रफी देखील देव करिता वापरला गेला.

देव करिता रफीचे पहिले लोकप्रिय गाणे होते १९५६ सालच्या सी आय डी तील ’ऑंखोही ऑंखोमे इशारा हो गया’. याचे संगीत ओपीचे होते. पुढच्याच वर्षी आलेल्या ’नौ दो ग्यारह’ मध्ये रफीची दोन युगल गीते होती जी देव वर चित्रीत झाली होती. ’कली के रूप मे चली हो धूप मे’ आणि ’सो जा निंदीया की बेला है आजा पंछी अकेला हैं’ राज खोसला दिग्दर्शित ’काला पानी’त ’अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’, ’दिलवाले तेरी गली तक आ पहुंचे’ ही आशा सोबतची दोन गाणी आणि ’हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये’ हे अप्रतिम सोलो होते. सी रामचंद्र चे संगीत असलेल्या ’अमर दीप’ मधील युगल गीत’ देख हमे आवाज न देना ओ बेदर्द जमाने’ चा गोडवा आजही मनाला सुखावतो. एस जेंच्या ’लव्ह मॅरेज’मध्ये देवच्या साथीला माला सिन्हा होती यात ’धीरे धीरे चल चांद गगन में’ हे गाणे खास जमून आलं होतं. गोल्डीच्या ’काला बाजार’(१९५९) मध्ये रफीची दोन अप्रतिम सोलो होती. खोया खोया चांद खुला आसमान आणि अपनी तो हर आह एक तूफान है याच सिनेमात गीतादत्त सोबतचे ’रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे युगल गीत तर रसिकांना आजही जुन्या आठवणीत भिजवून टाकते! सचिनदाच्या ’बंबईका बाबू’ मधील ’दिवाना मस्ताना हुवा दिल’ हे युगल गीत तर त्याच्या अनोख्या सुरावटीने आजही भुलावून जाते. सलील चौधरी यांनी स्वरबध्द केलेल्या ’माया’त रफीची दोन सोलो गाणी होती. ’जिंदगी है क्या सुन मेरी जान प्यार भरा दिल मीठी जुबान’ आणि ’कोई सोने के दिल कोई चांदी के दिलवाला’ यात लता सोबतचे ’तसवीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी हैं’ ची मिठ्ठास काय सांगावी? याच १९६१ साली देवचे आणखी दोन संगीतप्रधान सिनेमे आले. जयदेवने ’ हम दोनो’त वर उल्लेखलेल्या गाण्याशिवाय ’अभी न जाऒ छोडकर’ व ’कभी खुद पे खुद हालात पे रोना आया’ ही गाणी दिली होती, तर एस जेंच्या ’जब प्यार किसीसे होता है’ मध्ये टायटल सॉंग व्यतिरीक्त ’ये आंखे उफ युमां’, ’सौ साल पहले’ ही गाणी होती.
या दशकातली देव-रफीची गाणी पहा. ऐसे तो न देखो के हमको नशा हो जाये, कहीं बेखयाल होकर (तीन देवीयां) तुझे जीवन की डोर से, एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करूंगा, कल की दौलत आज की खुशीयां(असली नकली), दिन ढल जाये, तेरे मेरे सपने अब एक रंग है, क्या से क्या हो गया (गाईड), दिल पुकारे आरे आरे (ज्वेल थीफ), फलसफा प्यार का तुम क्या जानो (दुनिया), मेरा मन तेरा प्यासा (गॅम्बलर)… सत्तरच्या दशकापासून मात्र देवकरिताचा रफीचा स्वर कमी झाला. या दोघांच शेवटचं गाणं १९८० सालच्या ’मनपसंद’ सिनेमात होतं. ’लोगोंका दिल जितना तुमको है तो बस मीठा मीठा बोलो’. देव साठी अन्य पार्श्वगायकांनी देखील स्वर दिला त्या बद्दल पुन्हा कधी तरी, पण आज देवच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देवाच्या अध्यायातील हे रफी पान!