महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
देवेंद्र दोडकेंनी गाजविला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
झाडीपट्टीच्या त्या नाटकाचं सगळं वेळेवरच ठरलं होतं. मात्र, आता उपाय नव्हता. थोडाच वेळात रंगमंचावर उभं राहावं लागणार होतं. देवेंद्र यांनी तयारी केली. जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळात ते सीन्स वाचत होते. ती भूमिका होती, शिदू न्हाव्याची. नाटक सुरू झालं. देवेंद्र यांनी एन्ट्रीतच आपल्या खास शैलीत डायलॉग फेकला, ‘शिदू न्हावी म्हनत्यात मला. मी एक सिधासाधा, सरळ स्वनभावा मनुक्श हाओ… हा हा हा’. या पहिल्याच एन्ट्रीनं त्यांनी रसिकांची मनं जिंकली होती. देवेंद्र जिथं कुठं जात, तिथं रसिक त्यांचा तोच डायलॉग बोलून दाखवायचे, हसायचे, देवेंद्र यांच्याभोवती गराडा घालायचे. ‘स्टार’पण तिथूनच सुरू झालं होतं.
देवेंद्र दोडके(Devendra Dodke)… रंगभूमी, मालिका अन् चित्रपटसृष्टी या तिन्ही माध्यमांतलं खणखणीत नाणं. नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’मधील भूमिकेमुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील भूमिकेसाठी त्यांना ‘झी गौरव’ प्राप्त झालाय. व्यावसायिक रंगभूमीवर गेल्या २५ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. कित्येक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या सशक्त अभिनयानं छाप पाडलेली आहे.
देवेंद्र (Devendra Dodke) यांचा जन्म विदर्भातील तुमसरचा. नाट्यकलेचं बाळकडू घरातूनच मिळालेलं. १९७१ साली ते ‘अदरक के पंजे’ या गाजलेल्या नाटकात रंगमंचावर उभे झाले. नटेश्वरानं तिथंच देवेंद्र यांचं भवितव्य जणू निश्चित केलं होतं. त्यानंतर शाळा, कॉलेजांच्या नाटकांत ते भूमिका गाजवू लागले. १९८६ला पहिलं व्यावसायिक नाटक केलं. त्याचदरम्यान ट्रान्स्पोर्टमध्ये त्यांना नोकरी लागली. मात्र, नाटक काही स्वस्थ बसू देत नव्हतं. नोकरीमुळे सततच्या तालमी शक्य होत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यातील कलावंताची घुसमट होत होती. तरी, जशी जमेल तशी रंगदेवतेची सेवा सुरू होती. राज्य नाट्यस्पर्धांतील भूमिकांचं कौतुक होत होतं. एकदा विलास पात्रीकर यांचा फोन आला. ‘झाडीपट्टीतील नाटकात एक भूमिका आहे, करशील का’, अशी विचारणा केली. थोडा वेळ होता, म्हणून देवेंद्र यांनी होकार दिला. ती तारीख होती, २६ जानेवारी १९९८. वडसा ते सिंदेवाही मार्गावर मोहाडी गावात प्रयोग होता. त्यासाठी ३५० रुपये मिळणार होते. शंभर रुपयांचा अॅडव्हान्स मिळाला होता. आधीच वेळ कमी, त्यात तीनदा भूमिका बदलली. तयारी काहीच नव्हती. शेवटी एक भूमिका निश्चित झाली. प्रवासादरम्यान देवेंद्र यांनी टॉर्चच्या प्रकाशात सीन्स वाचून काढले. डायलॉग्जपेक्षा सीन्सवर अधिक भर देऊन एन्ट्री करू, बाकी रंगमंचावर जे घडायचं ते घडेल, असं त्यांनी ठरवलं होतं. अस्सलता कुठंही वाखाणली जाते. इथं तेच झालं. शिदू न्हाव्याच्या भूमिकेत देवेंद्र (Devendra Dodke) यांनी केलेला ‘प्रयोग’ सुपर डुपर हिट ठरला होता. रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं.
झाडीपट्टीच माझा गॉडफादर!
नोकरीमुळे नाट्यक्षेत्रात काम करताना मर्यादा येत होत्या. मात्र, उदरनिर्वाहाचं हातचं साधन सोडून कसं चालेल? इकडे झाडीपट्टीत मागणी वाढली होती. एक निर्माता ३६ तारखा घेऊन आला. मात्र, नाइलाजानं त्यातील आठच तारखा घेता आल्या. नोकरी आणि झाडीपट्टी असं सुरू झालं. नंतर मात्र झाडीपट्टी रंगभूमी आपलं उदरनिर्वाहाचं साधन बनू शकते, असा विश्वास यायला लागला. त्याला कारण ठरलं, नंतरच्या टप्प्यात आलेल्या ७५ तारखा. मानधनही दुप्पट झालं होतं. देवेंद्र (Devendra Dodke) यांनी फारसा विचार न करता नोकरी सोडली अन् झाडीपट्टी रंगभूमीवर पूर्णवेळ दाखल झाले. ‘या रंगभूमीनं मला खूप काही दिलंय. आज मी जो ‘तयार’ झालोय, तो या झाडीपट्टी रंगभूमीमुळेच. झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे एक कार्यशाळा आहे. म्हणूनच आज मालिका, चित्रपटांत कुठल्याही भूमिका मी समर्थपणे साकारू शकतो. झाडीपट्टी रंगभूमीच माझा गॉडफादर आहे’, असं ते नम्रपणे नमूद करतात. ‘झाडीपट्टी रंगभूमी अन् तेथील रसिकांचं वैगळं वैशिष्ट्य आहे. तेथील रसिक कमालीचे जाणकार आहेत. त्यांच्यासमोर पाट्या टाकून चालत नाही. त्यांना अस्सलता हवी असते. सुरुवातीच्या काळात तेथील प्रेक्षकांनीही मला बरंच काही शिकवलं’, असं देवेंद्र सांगतात. देवेंद्र यांनी गेल्या २५ वर्षांत झाडीपट्टीत दीडशे नाटकांचे जवळपास चार हजार प्रयोग केले आहेत.
मालिका अन् चित्रपटांत
देवेंद्र (Devendra Dodke) रंगमंच गाजवू लागले होते. आता मुंबई खुणावत होती. नंदू शिंदे यांच्यामुळे ‘सह्याद्री’ वाहिनीवरील मालिकेत काम मिळालं होतं. तिकडे काही नाटकंही मिळाली होती. मध्यंतरीच्या काळात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचं काम सुरू झालं. ती वैदर्भी अभिजित गुरूनं लिहिलेली आहे. या मालिकेत गुरुनाथच्या वडिलांच्या भूमिकेसाठी वऱ्हाडी बाजाचा कलाकार हवा होता. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी देवेंद्र यांना फोन केला अन् या भूमिकेविषयी विचारलं. देवेंद्र यांच्या तेव्हा झाडीपट्टीत तारखा बुक होत्या. ‘आठ ते दहा दिवसांचं काम आहे, तेही येऊन-जाऊन’ असं प्रॉडक्शन टीममधील सुवर्णा मंत्री यांनी समजावलं. देवेंद्र तयार झाले. त्या आठ-दहा दिवसांचं काम पुढं कसं वाढत गेलं काही कळलंच नाही. ती भूमिका मालिकेतील प्रमुख पात्रांपैकी एक ठरली. पुढची साडेचार वर्षे देवेंद्र या मालिकेत होते. नंतर ‘तू चाल पुढं’, ‘संत गजानन शेगावीचे’ या मालिका झाल्या. मध्यंतरीच्या काळात ‘तानी’, ‘रंगकर्मी’, ‘माझी शाळा’, ‘ताटवा’, ‘फोर इडियट्स’, ‘सुल्तान शभु सुभेदार’ आदी चित्रपट केले. ‘ते दोन दिवस’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. तेलुगू ‘शिर्डी साईबाबा’मध्ये साउथचे सुपरस्टार नागार्जुना यांच्यासोबत श्यामा देशपांडे ही भूमिका करण्याची संधी देवेंद्र यांना मिळाली. याच चित्रपटात त्यांच्या पत्नी दीपाली दोडके यांनीदेखील एक पात्र साकारलं आहे. ‘हिंदी असो वा दाक्षिणात्य; मराठी कलावंतांना सन्मानाची वागणूक मिळते. या क्षेत्रात आजवर चांगलेच अनुभव आले. आपण आपल्या कामात ‘परफेक्ट’ असलो तर कुठलीच अडचण जात नाही. हे क्षेत्र फक्त तुमच्यातील काम बघतं’, असं देवेंद्र स्पष्ट करतात. पत्नी दीपाली नोकरीला आहे. त्यांच्या पाठबळामुळे या क्षेत्रात वावरता आलं, असंही ते सांगतात.
‘मोनिका…’साठी ऑडिशनचीही गरज पडली नाही
नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या चित्रपटातील पोलिस इन्स्पेक्टर शेंडे या पात्रासाठी मराठी कलावंत हवा होता. प्रॉडक्शन टीमनं देवेंद्र यांना हेरलं. त्यांचे फोटोज दिग्दर्शक वासन बाला यांच्याकडे गेले. ‘यही अपना शेंडे हैं’, असं वासन यांनी जाहीर करून टाकलं. देवेंद्र (Devendra Dodke) यांना ऑडिशनही द्यावी लागली नाही, अन् ही भूमिका त्यांच्या वाट्याला आली. राजकुमार राव, राधिका देशपांडे, हुमा कुरेशी आदी कसलेल्या कलावंतांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर करीत आपली वेगळी छाप उमटवली आहे.
=========
हे देखील वाचा : हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी
=========
कुठे भूमिका, कुठे डायलॉग गायब
सिनसृष्टीत देवेंद्र (Devendra Dodke) यांना काही अजब अनुभवही आलेत. ‘हॅपी’ नावाच्या हिंदी चित्रपटात चांगली भूमिका मिळाली. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’मध्ये ट्राफिक हवालदारची भूमिका मिळाली. फरहान अख्तरसोबत त्यात चार सीन होते. ते चांगले शूटही झाले होते. मात्र, चित्रपटातून ते सीनच काढण्यात आले. ‘बदमाश कंपनी’मध्ये चांगले डायलॉग वाट्याला आले होते. मात्र, एडिटिंगमध्ये ते कापण्यात आले. इरफान खानसोबत एक वेबसीरिज मिळाली होती. मात्र, इरफान यांची प्रकृती खालावल्याने तीही बंद पडली. काम करूनही असे कित्येक निराशाजनक अनुभव येत होते. कान्सला गेलेल्या ‘मिस लव्हली’चं तेवढं थोडंफार समाधान होतं. मात्र, अजून योग यायचा होता. तो आत्ता कुठे ‘मोनिका…’च्या निमित्तानं मिळाला, असं देवेंद्र सांगतात.
ओटीटी, मोठा पडदा आणि टीव्ही ही तिन्ही माध्यमं आपापल्या जागी योग्य आहेत. ओटीटी हे तरुणाईचं माध्यम आहे. कुणी कुठंही आता सिनेमा, वेबसीरिज मोबाइलमध्ये पाहू शकतो. मात्र, त्यामुळे मोठ्या पडद्याचं महत्त्व कमी होत नाही. सिनेमाचा ‘फील’ घ्यायचा असेल तर थिएटरच बेस्ट असतं, असं त्यांचं मत आहे.
‘कलाकार कधीच समाधानी नसतो’, असं मानणाऱ्या देवेंद्र यांनी आज त्यांच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. तरी, ‘अभी बहोत कुछ करना बाकी हैं’, असं ते म्हणतात. स्टारपण असलं तरी ते कमालीचे नम्र आणि जमिनीवर आहेत. माणुसकीवर त्यांचा विश्वास आहे. केवळ रंगमंच आणि पडदाच नाही तर रसिकाचं मन व्यापण्याची ताकद त्यांच्या अभिनयात आहे. त्याच भरवशावर मनोरंजनक्षेत्राचं मैदान ते एखाद्या राजासारखं गाजवत आहेत. नावातही ‘देवेंद्र’, फिर क्या कहना!
अभिषेक खुळे