‘दगडी चाळीतील’ मन धागा धागा चा खरा किस्सा नक्की वाचा
अलीकडच्या काळातील मराठी चित्रपटगीतात अनेक युगुलगीते यशस्वी झाली आणि त्या गीतात ‘मन धागा धागा जोडते नवा’ हे ‘दगडी चाळ’ चित्रपटातील गीत खूप लोकप्रिय झालं. त्या गाण्याचा गीतकार आहे क्षितिज पटवर्धन. या गाण्याचा सुद्धा एक किस्सा आहे. प्रथम हे गीत क्षितिज लिहिणार नव्हता, दुसरं कोणीतरी लिहिणार होतं. क्षितिजची एक पद्धत आहे, जर का असं कधी घडलं की एखादे गीत दुसरा गीतकार लिहिणार आहे आणि मग जर का ते त्याच्याकडे आलं, तर तो त्या गीतकाराशी आधी बोलून घेतो. जेणेकरून कोणाच्या मनात गैरसमज राहत नाही. तसेच त्याने याही गाण्याच्या बाबतीत त्या गीतकाराशी बोलून घेतले.
क्षितीज म्हणतो, “या गीताची चाल संगीतकार अमितराज यांनी आधीच केली होती आणि मला चालीवर शब्द लिहायचे होते.” या गीताचे व्हिज्युअल्स सुद्धा माहित होते. त्या काळात क्षितिज पार्ले येथे मित्रांबरोबर राहत होता. त्यांच्या घरात एक पाच फुटी फळा होता. तिथे त्या फळ्यावर दिवसभराची कामे वगैरे लिहिली जायची. दुपारी एकदा जेव्हा क्षितिज एकटा होता, तेव्हा त्याला अमितराज याने दिलेल्या चालीवर शब्द सुचले. त्याने ते अमितराज ला पाठवले. बाकी गाणे पूर्ण उत्तम आहे, फक्त गाण्याची ‘हुकलाईन’ थोडी बदलूया असे ठरले आणि त्यातून क्षितिजला शब्द सुचले “मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुवा.” हे गीत जेव्हा अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांना ऐकवले गेले तेव्हा त्यांना सुद्धा ते खूप आवडले. अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्यावर हे गीत चित्रित होणार होते. हे गीत हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे. आजही अनेक रियालिटी शो मध्ये हे गाणे आवर्जून गायले जाते. अंकुश चौधरी यांनी हे गाणे ऐकताच “हे गाणे सॉंग ऑफ दि इअर” होणार असे म्हटले होते आणि खरोखर तसेच घडले.
या गाण्याने प्रेमिकांच्या मनाचा आणि रसिक प्रेक्षकांच्या मनाचा धागा नक्की जोडला गेला.