राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Pratiggya Movie : Dharmendra नाचला आणि पब्लिकने थिएटर डोक्यावर घेतले…
ते दिवसच वेगळे होते, म्हणूनच असे काही भन्नाट घडे.स्थळ वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओतील ध्वनिमुद्रण स्टुडिओ. वादकांचा ताफा बसलाय. निमित्त दुलाल गुहा दिग्दर्शित ‘प्रतिज्ञा’ चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे. आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत हे तर सुपरहिट समीकरण. यांची अनेक गाणी पन्नास पंचावन्न वर्षानंतर आजही लोकप्रिय आहेत. पुन्हा ऐकली, पाहिली, गुणगुणली जातात. लोकप्रिय गाण्यांनी एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्यात जात असतात. असेच एक गाणे, ‘मै जट यमला पगला दीवाना’; याच गाण्याचे हे रेकॉर्डिंग.(Bollywood News)

पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी हे गाणे, त्याचे स्वरुप, पडद्यावरील त्याचे सादरीकरण, हे धर्मेंद्रवर चित्रीत होणार आहे याची माहिती हे सगळे समजून घेतले. (या चित्रपटाची निर्मिती त्याचा भाऊ विक्रमसिंग देओल याची असल्याने चित्रपटात धर्मेंद्र असणार हे वेगळे सांगायलाच नको. धर्मेंद्रही या गाण्याच्या रेकॉर्डिंगला हजर होता. घरचाच चित्रपट आहे म्हटल्यावर काय हो?) मोहम्मद रफी आपले प्रत्येक गाणे समरसून गाण्यासाठी ओळखले जाणारे. तशी आत्मियता हे त्या काळाचे वैशिष्ट्य (उगाचच व्यावसायिकता वगैरे शब्द तोपर्यंत व्यवहारात आले नव्हते). या गाण्यासाठी मोहम्मद रफी यांचा काही वेगळाच मूड लागला. ते गाता गाता उभ्या उभ्या जणू नाचू लागले. गाणे तसे मस्तीभरे असल्याने त्याचा तसाच आनंद घेत घेत गायला हवे होते ते त्यांनी केले. (Bollywood Tadaka)

रेकॉर्डिंग स्टुडिओतील वादक, रेकॉर्डिस्ट आणि अर्थातच धर्मेंद्र हे सगळे पाहुन थक्क झाले. त्यांना रफीसाहेबांचे विशेष कौतुक वाटले. धर्मेंद्रला तोपर्यंत मोहम्मद रफी यांनी अनेक गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असल्याने धर्मेंद्रच्या आवाजाची मोहम्मद रफी यांना चांगलीच ओळख होती (त्या काळातील पार्श्वगायक/ पार्श्वगायिका आपण कोणत्या कलाकारासाठी गातोय याचे भान ठेवत म्हणून तर पडद्यावर तो कलाकारच जणू गातोय असे वाटे. असं आजच्या चित्रपट गीत संगीताबाबत अजिबात होत नाही.), मोहम्मद रफी यांचा यावेळचा मनसोक्त मनमुराद उत्साह पाहून धर्मेंद्रही खुश झाला, त्याने रफीसाहेबांना मिठी मारली, पंजाबी शैलीत त्यांचे कौतुक केले आणि आपण हे गाणे असेच चांगल्या पध्दतीने पडद्यावर साकारु असे म्हटले.(Pratiggya movie and Dharmnedra)

हा किस्सा त्या काळात खूप गाजला. त्यानंतर ‘प्रतिज्ञा’चे एकेक चित्रीकरण सत्र पार पडत गेले आणि मग या गाण्याच्या चित्रीकरणाची वेळ आली. तेव्हा धर्मेंद्रची मोठीच कसोटी होती. कारण नृत्य हे धर्मेंद्रचे अंग नव्हतेच. प्रेमगीत, विरहगीत, मैत्रीचे गीत, स्टेजवरचे माईकसमोरचे गीत , एखादे पार्टीतील गीत अशी गाणी त्याने पडद्यावर साकारली होती (आणि पुढेही मोठ्याच प्रमाणावर साकारली) पण नाचायचे तर हसं होणार. ते आपणास जमणारे नाही. नृत्य दिग्दर्शकाने ‘यमला पगला दीवाना’ कसे नाचत नाचत साकारायचे हे नृत्य स्टेप सांगत समजावले. पण धर्मेंद्रला ती स्टेप्स बरेच प्रयत्न करुनही जमेना. त्याचे नाचकाम व कॅमेरा मूव्हमेंट यांचा काही ताळमेळ बसेना. ते अधिकच विचित्र होऊ लागले. (Untold stories of indian cinema)
================================
हे देखील वाचा: Dharmendra : प्रेम चोप्राच्या भीतीची धर्मेंद्रने केली पोलखोल!
=================================
अखेर धर्मेंद्रने निर्णय घेतला. आपल्याला जमेल तसं मुक्त नाचायचे. चित्रपट ॲक्शन कॉमेडी आहे. त्यात ते फिट्ट बसेल आणि हा चित्रपट आपल्या घरचीच निर्मिती आहे. आपण ठरवू ते होईल, व्हायलाच हवे. आणि त्याने जसे पाय उचलतील, हातवारे होतील तशी नाचायला सुरुवात केली. जवळपास चार दिवस या गाण्याचे तुकड्या तुकड्यात चित्रीकरण रंगले. संकलकाने ते पडद्यावर बरे दिसेल असे कापले व जोडले. अर्थात धर्मेंद्रला नाचता येते असे अजिबात म्हटले जात नसल्याने हा एकूणच आश्चर्याचा धक्का बसला.’प्रतिज्ञा’ प्रदर्शित झाला आणि हे गीत नृत्य पडद्यावर येताच पब्लिकने प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्यांनी अख्ख थिएटर असे काही डोक्यावर घेतले की पिक्चर हिट है हे सांगायला फिल्मी ज्योतिषाची गरजच लागली नाही. पब्लिक बोली पिक्चर कडक.म्हणजेच सुपरहिट. (Entertainment)
‘प्रतिज्ञा’ मुंबईत २७ जून १९७५ रोजी प्रदर्शित झाला. म्हणजेच त्याच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. १९७५ मध्ये चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी घडल्या, त्यात ही एक.’प्रतिज्ञा’ हा फुल्ल मसालेदार मनोरंजक चित्रपट. त्या काळात मोठ्याच प्रमाणावर डाकूपट बनत. प्रत्येक पटकथाकार व दिग्दर्शकाची त्यात शैली वेगळी. अधला मधला मसाला म्हणा वा भेसळ म्हणा, पण वेगळीच. अगदी चित्रपटाच्या नावातच डाकूपट (चांद दिग्दर्शित ‘धर्मा’, सुलतान अहमद दिग्दर्शित ‘हीरा’वगैरे ). अशा डाकूपटात डायलॉगबाजी भरपूर. पब्लिक हमखास टाळ्या वाजवणार. आणि त्यात गीत, संगीत व नृत्याचीही बहार. ध्वनिमुद्रिकांचा खप वेगाने वाढे. ‘मै जट यमला दीवाना’ या गाण्याने तर शहरांपासून ग्रामीण भागात दूरवर लाऊडस्पीकरवर अक्षरश: धुमाकूळ घातला. चित्रपटातील लोकप्रिय गाणी चित्रपटाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवते (चित्रपट निर्मितीत पाऊल टाकणार्यांनी याचा विचार करायला हरकत नाही.) (Entertainment news in marathi)

‘प्रतिज्ञा’ची पटकथा शफिक अन्सारी, नबेन्दु घोष व कंवलजित सिंग यांची. धर्मेंद्रची दुहेरी भूमिका. ट्रकचालक अजितसिंग व पोलीस इन्स्पेक्टर देवेंद्र सिंग. यातून उडणारा गोंधळ आणि त्यातूनच भरत डाकू (अजित) व त्याचा उजवा हात (इम्तियाज खान) यांचा खातमा म्हणजेच हा चित्रपट. यात राधा (हेमा मालिनी) ट्रकचालकाची प्रेयसी आहे. ग्रामीण भागातील कथानक असल्याने त्यानुसार गोष्टी रंगतात. चित्रपटात केश्तो मुखर्जी ( हमखास दारुड्याची भूमिका. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र तो दारु पित नसे), सुंदर, मारुती, जगदीप, बिरबल असे अनेक कॉमेडियन विनोद निर्मितीसाठी होते. रंगत येई. याशिवाय प्रदीपकुमार, अभी भट्टाचार्य, नासीर हुसेन, सत्येन कप्पू, लीला मिश्रा इत्यादींच्याही भूमिका. चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. मै जंगल की मोरनी ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), फरदेसी आया देश में ( लता मंगेशकर), उठ निंद से ( लता मंगेशकर) याबरोबरच जट यमला पगला दीवाना….
धर्मेंद्र व हेमा मालिनी त्या दिवसात पडद्यावर पाहण्यास पब्लिक इच्छुक असत आणि गॉसिप्स मॅगझिनमधून त्यांचा खास रिश्ता रंगवून रंगवून मांडला जाई. हेमा मालिनीच्या काही आवडत्या चित्रपटातील एक म्हणजे, ‘प्रतिज्ञा’ आहे. कम्माल वाटतेय? तद्दन व्यावसायिक मनोरंजक चित्रपट आहे आणि तशाच दृष्टिकोनातून याकडे पाह्यला हवे. दिग्दर्शक दुलाल गुहा यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात ‘दुश्मन’ (१९७२, मीनाकुमारी, राजेश खन्ना , मुमताज )चे कथानक काहिसे वेगळे. त्यांच्या दिग्दर्शनातील काही चित्रपट सांगायचे तर,’धरती कहे पुकार के’ (१९६९), ‘मेरे हमसफर’ (१९७०), ‘दोस्त’ (१९७४), ‘खान दोस्त’ (१९७६), ‘दो अन्जाने’ (१९७६), ‘दिल का हीरा’ (१९७९) इत्यादी.
================================
हे देखील वाचा: Jaya Bachchan : …म्हणून जया बच्चन ‘सिलसिला’च्या सेटवर रोज जायच्या!
=================================
‘प्रतिज्ञा’ चित्रपट फर्स्ट रनला चांगलाच यशस्वी ठरल्याने मॅटीनी शो व रिपीट रनलाही त्याला चांगलीच गर्दी होई. तीच तर जास्त महत्वाची असते…. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ‘प्रतिज्ञा’ मधील ‘जट यमला दीवाना’ गाणे भारी आवडेल. आज लहान मोठ्या सणात नाचकाम असतेच असते, त्यात हे गाणे एकदम फिट्ट. आणि कालांतराने धर्मेंद्रनेच समीर कर्णिक दिग्दर्शित ‘यमला पगला दीवाना’ (२०११), त्याचाच दुसरा भाग संगीत सिव्हन दिग्दर्शित ‘यमला पगला दीवाना २’ (२०१२) आणि मग तिसरा भाग नवनियत सिंग दिग्दर्शित ‘यमला पगला दीवाना ३’ ( २०१८) हे चित्रपट निर्माण करताना ‘प्रतिज्ञा’च तर पुढील पिढीसमोर आणला. सगळेच चित्रपट पडद्यावरुन उतरले की फक्त यूट्यूबवर राहत नाहीत तर काही चित्रपट रसिकांच्या मनातही राहतात….(Bollywood news update)