सई ये रमुनी साऱ्या या जगात …
धुंद होते शब्द सारे
काही गाणी अशी असतात की ती एखाद्या चित्रपटात दोन वेळा येतात. असं घडलं होतं ते ‘उत्तरायण’ चित्रपटाच्या बाबतीत. ‘उत्तरायण’ चित्रपट हा जयवंत दळवी यांच्या ‘दुर्गी’ नाटकावर आधारित होता. रघुवीर आणि कुसुमावती या ज्येष्ठ व्यक्तींच्या नात्यातील ही हळुवार गोष्ट. या चित्रपटाचे संवाद कौस्तुभ सावरकर याने लिहिले होते आणि या चित्रपटासाठी गाणी सुद्धा त्याला लिहायची होती.
या चित्रपटाचा संगीतकार अमर्त्य राहूत होता आणि त्याने कौस्तुभला गाण्याची चाल सांगितली होती. चालीवर कौस्तुभला शब्द लिहायचे होते. कौस्तुभ त्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला हवे तसे सुचत नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते बिपीन नाडकर्णी यांच्याबरोबर कौस्तुभ लोकेशन पाहायला गाडीने जात होता, तेव्हा त्याला शब्द सुचले आणि ते त्याने कागदाच्या एका चिटोऱ्यावर लिहिले. ते शब्द नंतर त्याने बिपीन नाडकर्णींना ऐकवले,
“धुंद होते शब्द सारे, धुंद साऱ्या भावना
वाऱ्यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना…”
बिपिनला आणि अमर्त्य ला गाणे आवडले.
रघुवीर हा विधुर आहे. कुसुमावतीचे म्हणजे दुर्गीचे पहिले लग्न अयशस्वी झाले आहे. रघुवीर आणि दुर्गी या दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ आहे. रघुवीरच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कौस्तुभला अचूक शब्द सुचले होते,”सई ये रमुनि साऱ्या या जगात,
रिक्त भाव असे परि कैसे गुंफू गीत हे…”
या गीताचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे गीत रवींद्र बिजूर यांच्या आवाजात ही आहे. त्यावेळी या गाण्याच्या चित्रणात काही मोंटाजेस दिसतात. त्यात शिवाजी साटम (रघुवीर) आणि नीना कुळकर्णी (कुसुमावती म्हणजेच दुर्गी) यांच्या जीवनातील प्रसंग आपल्यासमोर येतात. त्या मोंटाजेस मधून रघुवीर आणि दुर्गी यांच्या मनात एकमेकांबद्दल किती प्रेम आहे, हे आपल्याला जाणवते. हे गाणे बेला शेंडे यांच्या स्वरात देखील आहे. चित्रपटाच्या शेवटी ते येते.
या गाण्याकरिता कौस्तुभ सावरकर याला सर्वोत्कृष्ट गीतकारांचे नामांकन मिळाले होते. कवी ग्रेस आणि ना धों महानोर यांच्याबरोबर ते नामांकन मिळाले होते. तसेच या चित्रपटाच्या संवाद लेखनासाठी कौस्तुभला राज्य शासनाचा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला होता. ‘उत्तरायण’ चित्रपट हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला आहे.
गणेश आचवल