‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
चित्रपटातील आई म्हणलं की सुलोचना लाटकर हेच नाव डोळ्यासमोर येतं.
जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. चित्रपटांमध्ये आईच्या भूमिका करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. सुलोचना दीदींचा (Sulochana didi) जन्म ३० जुलै १९२८ चा. लहान वयातच त्यांनी आपल्या आईवडिलांना गमावलं. आईवडिलांनंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. मास्तर विनायक यांनी आपल्या प्रफुल्ल पिक्चर्स या संस्थेत सुलोचना यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हणून नोकरीला घेतलं. ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी छोटी भूमिका केली. मराठी चित्रपटासोबतच त्यांनी हिंदी चित्रपटामध्येही काम केलं.
ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या बऱ्याच चित्रपटात सुलोचना दिदींनी काम केलं. दीदींच जन्मनाव रंगू. भालजी पेंढारकर यांनी त्यांचं नाव बदलून ते सुलोचना केलं. चित्रपटांविषयीचे अनेक बारकावे दीदी भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात शिकल्या. चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा शुद्ध नव्हती. भाषा सुधारण्यासाठी भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं. नियमितपणे त्या क्लिष्ट मासिकाचे वाचन करत सुलोचना दिदींनी आपली भाषा सुधारली.(Sulochana didi)
पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत आपल्या हिंदी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुलोचना दिदींनी (Sulochana didi) पुढे राज कपूर, शम्मी कपूर यांच्यासोबतदेखील काम केलं. सुनील दत्त, देव आनंद आणि राजेश खन्ना यांच्या आईचा रोल करण त्यांच्या विशेष आवडीचं होतं असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. जवळपास दोनशे पन्नासहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. सासुरवास, वहिनींच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट.
======
हे देखील वाचा : कुली सिनेमाच्या ॲक्सीडेंटमुळे ‘हा’ सिनेमा ठरला सुपरहिट
======
लहान वयापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती. लहान असतांना आपल्या वडिलांसोबत त्या तंबूत जाऊन चित्रपट बघायच्या. इथूनच त्यांच्या मनात चित्रपट कलेचे बीज रोवले गेले. चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट ते चित्रपटातील आई हा त्यांनी केलेला प्रवास अतुलनीय आहे. चित्रपटातील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. २००३ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून देण्यात येणारा चित्रभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. १९९९ साली पद्मश्री, २००४ साली फिल्मफेयर लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड, २००९ साली महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.