भारतामधील या विविध चित्रपटसृष्टींबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
भारतातील चित्रपट उद्योग असं म्हटलं की, बॉलिवूडचे नाव घेतले जाते. मात्र भारतात बॉलिवूड म्हणजे मुंबई बरोबरच अन्य राज्यातही प्रादेशिक चित्रपट व्यवसाय वाढला आहे. या चित्रपट उद्योगानंही आपली छाप पाडली आहे. बॉलिवूड वगळता भारतात 27 ठिकाणी चित्रपट व्यवसाय (Indian Entertainment Industry) आहे आणि तो आता अधिक समृद्ध होत आहे.
काही वर्षापूर्वी प्रादेशिक चित्रपटांना दुय्यम तर, बॉलिवूडला सर्वश्रेष्ठ दर्जा दिला गेला होता. मात्र हेच चित्रपट आता बॉलिवूडला टक्कर देत आहेत. यातील अनेक चित्रपटांच्या कथा घेऊन त्यावर हिंदी चित्रपट करण्याची वेळ बॉलिवूडवर आली आहे. बाहुबली, KGF-2 सारख्या चित्रपटांनी तर बॉलिवूडलाही खूप मागे टाकलं आहे.
टॉलिवूड
तमिळ-तेलुगू फिल्म इंडस्ट्री टॉलिवूड म्हणून ओळखली जाते. 2015 मध्ये आलेल्या बाहुबली चित्रपटानं टॉलिवूडच्या साम्राज्यावर यशाची मोहर उमटवली. 180 करोडचं बजेट असलेल्या बाहुबलीनं 650 करोडचा गल्ला जमवला. दोन वर्षानंतर बाहुबलीचा सिक्वल आला त्यानं रेकॉर्डतोड 2200 एवढी कमाई केली. या टॉलिवूडच्या यशात पुष्पा, RRR, 2.0, साहो, सैरा नरसिंहा रेड्डी या चित्रपटांनीही सोनेरी कमाई केली. यामुळेच की काय बॉलिवूडमधील अनेक कलाकार या चित्रपटांच्या सिक्वलमध्ये एखादी भूमिका मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी साऊथचे स्टार काही वर्षापूर्वी उत्सुक असायचे. पण आता हे चित्र पूर्णपणे उलट झालं आहे. आता बॉलिवूडचे सूपरस्टारही टॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटात छोटी भूमिका करण्यासाठी बिगबजेट चित्रपटाला नकार देत आहेत. सलमान खान, हृतिक रोशन, सैफ अली खान, अमिर खान यांसारखे कलाकार आता या साऊथ इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपला स्टरडमला जपत आहेत.
मल्याळम
उत्तम कथा, निसर्गाचे सुंदर चित्रण आणि मातीशी जोडलेले कलाकार यांचा संगम बघायचा असेल तर मल्याळम चित्रपट बघायला हवेत. अत्यंत उत्कृष्ट कथा हा या चित्रपटांच्या यशाचा गाभा असतो. पुल्लीमुरुगन, लुफिसर सारख्या चित्रपटांनी आपल्या दर्जातून मल्याळम चित्रपटाला भाषिक बंधानातून मुक्त केले आहे.
सॅंडलवूड
कन्नड सिनेमा म्हणजे सॅंडलवूड. KGF चित्रपटानं या इंडस्ट्रीला वेगळी ओळख दिली. KGF आणि KGF: चेप्टर 2 ने करोडो रुपये मिळवून दिले. त्याबरोबरच अभिनेते आणि दिग्दर्शकांचा परिचयही जगाला करुन दिला. आत्तापर्यंत सॅंडलवूडमधील चित्रपटांना टॉलिवूडमध्येच गणलं जात असे. पण आता या चित्रपटांनी आपली स्वतंत्र ओळख असल्याचे सिद्ध केले.
पॉलीवूड
चार साहिबजादे, चैरी जट्टा, सौकां सौकने सारख्या चित्रपटांमुळे अलिकडे पंजाबी सिनेमा अर्थातच पॉलीवूडचे नाव घेतले जाते. स्थानिक संगितकारांच्या मनाला ओढ देणाऱ्या संगीतामुळे हे चित्रपट अधिक पाहिले जातात. हिंदी चित्रपटात अनेकवेळा या मूळ पंजाबी चित्रपटातील गाण्यांच्या धूनचा वापर केला जातो.
मॉलिवूड
आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास सर्वश्रृत आहे. अलिकडे आलेल्या सैराट, नटसम्राट, सारख्या चित्रपटांची मोहिनी हिंदी चित्रपट सृष्टीलाही पडल्याचे दिसले. मराठी चित्रपटसृष्टीला मॉलीवुड म्हणून ओळख आहे.
गोलीवूड
गोलीवूड म्हणून ओळख असललेल्या गुजराथी चित्रपटांनाही आता चांगले दिवस आले आहेत. स्थानिक भाषेमधील संगीत आणि ग्रामीण कथा यामुळे या चित्रपटांना चांगली मागणी असते.
बिहारवूड
बहुतांशी भोजपुरी चित्रपटसृष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. बिहारवूड असं नाव असलेल्या या चित्रपटसृष्टीत चित्रपट तयार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कमी बजेटमध्ये आणि कमी वेळात झालेले हे चित्रपट स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणात संधी देणारे ठरले आहेत.
इतर चित्रपटसृष्टी (Indian Entertainment Industry)
जोलीवूड म्हणजे आसामी चित्रपटसृष्टीही आपल्या उत्तम कथांसाठी ओळखली जाते. याबरोबरच बंगाली चित्रपटसृष्टी, छत्तीसगडी चित्रपटसृष्टी म्हणजेच छोलीवुड, डोलीवुड, पहाडीवुड, हरियाणवी, जोलीवुड, कश्मिरी, कोकबोरोक, कोंकनी, मैथई, नागपुरी, ओलीवुड, राजस्थानी, संभलपुरी, संस्कृत, सॉलिवूड, सिंधी चित्रपटसृष्टीही आहे.
==========
हे ही वाचा: तेजाब: चित्रीकरणादरम्यान ब्रेक घेऊन कलाकार रेस्टॉरंटमध्ये गेले आणि…
मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
==========
दुर्दैवानं आत्तापर्यंत मनोरंजन क्षेत्रात (Indian Entertainment Industry) फक्त बॉलिवूडची ओळख होती. मात्र आता या स्थानिक भाषेतील चित्रपट निर्मांत्यांनीही आपल्या चित्रपटांचा प्रचार सोशल मिडियाद्वारे केल्यामुळे त्यांचीही स्वतंत्र ओळख तयार होत आहे. एवढी वर्षी चित्रपट व्यवसायावर आपली हुकूमत गाजवणाऱ्या बॉलिवूडवर आता प्रादेशिक चित्रपटसृष्टीचे वर्चस्व मान्य करण्याची वेळ आली आहे.