Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट सिनेमा!
“तुम देखो, तुम्हारा बाप देख्या तुम्हारा पातशाह देख्या…” ही नुसतीच गर्जना नव्हती, तर अशी डरकाळी होती, जिच्यामुळे भारताचा अक्ख्खा इतिहासच बदलून गेला. विचार करा, आशिया खंडातला सर्वात मोठा बादशहा… त्याचा पन्नासावा वाढदिवस… त्याच्या दरबारात त्याच्याकडे कुणी नजर वर करून बघू सुद्धा शकत नाही… आणि अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला असं अपमानित करून सोडलं, की त्यानेच नव्हे तर मुघलांच्या पुढच्या पिढ्यांनीही ते लक्षात ठेवलं असेल. याचच चित्रण लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी परफेक्ट करून दाखवलेलं आहे. शिवराज अष्टकातला हा त्यांचा सहावा सिनेमा आणि त्यांच्या या सिरीज मधला सर्वात बेस्ट सिनेमाच म्हणावा लागेल. चला तर जाणून घेऊया कसा आहे ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’! (Marathi Movie Review 2026)
तसं प्लॉट वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आपण इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीचे प्रसंग ऐकतच आलो आहोत. शिवराय कशाप्रकारे आपल्या गनिमी काव्याने शत्रूच्या तावडीतून सुटून आले, हे तर दिग्पाल यांनी दाखवलंच आहे. पण त्यासोबतच आग्रा स्वारीच्या आधीची आणि आग्र्यातून सुटून आल्याच्या रणनीतीचं या चित्रपटात अचूक चित्रण केलं आहे. औरंगजेबाने गादीसाठीच आपल्या सक्ख्या भावाला मारून टाकलं इथून चित्रपटातल्या इतिहासाची सुरुवात होते. त्यातच पुरंदरचा तह, पुरंदरचं युद्ध हे महत्त्वाचे संदर्भसुद्धा वापरलेले आहेत. (Marathi Review 2026)
दिग्पाल लांजेकर यांच्याबाबत एक गोष्ट भारी आहे, की त्यांचा अभ्यास खूपच दांडगा आहे. म्हणजे या चित्रपटामध्येही ऐतिहासिक पात्र, समकालीन उल्लेख, अगदीच श्री शिवभारत ग्रंथ, कवी भूषण यांचे छंद… या सर्व गोष्टींचा योग्य वापर केलेला आहे. थोडीशी सिनेमॅटिक लिबर्टी तर प्रत्येक ऐतिहासिक पटात असते. जी यामध्येही घेतलेली आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे शिवरायांचा आग्रा स्वारी का करावी लागली? हे रणपती शिवरायमध्ये शून्यापासून उलगडत जातं आणि आपण चित्रपटासोबत पूर्णपणे एंगेज होऊन जातो. चित्रपटाच्या सुरुवातीला थोडे युद्धाचे अॅक्शन सीन आहेत. पण बाकी चित्रपटात रणपतींची रणनीतीच आपल्याला पहायला मिळते. (Entertainement News)
आता थोडं अभिनयाबद्दल जाणून घेऊया. तसं दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’मध्ये प्रेक्षकांना शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर यांना पाहण्याची सवय होती. पण या सहाव्या पुष्पात शिवरायांच्या भूमिकेसाठी अभिजित श्वेतचंद्र याची निवड केली आणि ती त्याने योग्यरित्या पार पाडलीये. खरंतर महाराजांची भूमिका म्हणजे सर्वात मोठ आव्हान…देहयष्टीपासून ते डायलॉग डिलिव्हरीपर्यंत छोट्या गोष्टीही तुम्हाला पहायला लागतात आणि यासाठी अभिजितला १० पैकी १० दिलेच पाहिजेत. आग्र्याच्या भेटीवेळी शिवरायांचं वय जवळपास ३५-३६ होतं. त्यामुळे तसाच तरुण तडफदार योद्धा या भूमिकेत अभिजित बरोबर बसला आहे. तुम्हाला माहितीच असेल, की ‘शेर शिवराज’मध्ये बॉलीवूडचे प्रसिद्ध व्हिलन मुकेश रिशी यांनी अफझल खानची भूमिका साकारली होती. ‘रणपती शिवराय’मध्येही बॉलीवूडमधला एक प्रसिद्ध चेहरा आपल्याला पहायला मिळतो, ते आहेत पुनीत इस्सार… त्यांची मिर्झा राजे जयसिंग यांची भूमिका उठून दिसते. या चित्रपटात पुन्हा एकदा मृणाल कुलकर्णी आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत आहेत, पण यावेळी त्यांचा भावनिक, आईच्या नात्याचा आणि मनाला भिडणारा अभिनय तुम्हाला पाहायला मिळतो.
समीर धर्माधिकारी यांनीही औरंगजेब जागवला आहे. तो अहंकार त्यांच्या डोळ्यात दिसतो. त्यासोबतच पुन्हा एकदा अजय पुरकर यांची तान्हाजी मालुसरे आणि स्वत: दिग्पाल लांजेकर यांची बहिर्जी नाईक या दोघांनी आपल्या अभिनयाने आणि डायलॉग्जने चित्रपट जिवंत ठेवला आहे. याशिवाय प्रसन्ना केतकर, ऋषी सक्सेना, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर यांनीही आपापले पात्र उत्तम साकारले आहेत. एकंदरीत सर्वांनीच आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे.

संवादाबाबत म्हणायचं झालं तर, चित्रपटात जितके भावनिक संवाद आहेत, तितकेच दमदारही आहेत. खासकरून औरंगजेबाच्या दरबारातील प्रसंग… अक्षरशः अंगावर काटा येतो असा तो सीन आहे. चित्रपटात एक सीन आहे, जे पाहून तुमच्या डोळ्यात पाणीच येईल. SPOILER देत नाही, पण एक प्रसंग आहे, जेव्हा महाराज सुखरूप राजगडावर जिजाऊ साहेबांसमोर येतात. संगीत ही दिग्पाल लांजेकर यांच्या सर्वच चित्रपटांची उजवी बाजू आहे. अवधूत गांधी यांनी पुन्हा शिवकाळातलं संगीत आपल्यासमोर सादर केलं आहे. पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला आणि चित्रपटातल्या प्रत्येक प्रसंगांना साजेसं आहे.
================================
हे देखील वाचा : Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!
================================
चित्रपटाची एकच नकारात्मक बाजू आहे आणि तीसुद्धा तांत्रिक आहे. काही दृश्य AI द्वारे बनवले गेले आहेत आणि ते दिसून सुद्धा येतात. दिग्पालच्या ‘शिवराज अष्टका’मधल्या सर्व चित्रपटांमधील एक साम्य म्हणजे ते खूपच जास्त भावनिक असतात, जे कुठेतरी टाळता आलं पाहिजे. चित्रपटात सर्वच गोष्टी समसमान असल्या की, पराक्रम, युद्ध, रणनीती आणि भावना यांचा समतोल राखला जाईल. बरं दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाच्या अखेरीत शिवराज अष्टकमधल्या सातव्या पुष्पाची घोषणा केली आहे आणि शिवकाळातला खूपच महत्त्वाचा विषय आहे. तर ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा आणि थिएटरमध्येच अक्ख्या कुटुंबांसोबत पाहण्यासारखा हा चित्रपट आहे.
कलाकृती मीडिया ‘रणपती शिवराय’ला देत आहे पाचपैकी चार स्टार्स!
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi