दिल बेचारा : सुशांतच्या आठवणींच्या जोरावर लढवलेला किल्ला
‘सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू’, ही बातमी १४ जूनला समाजमाध्यमांवर झळकली आणि एक चर्चेला उधाण आलं. टीव्हीक्षेत्रात प्रचंड नावं कमविल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान नोंदवू पाहणाऱ्या या मेहनती कलाकाराच्या अचानकपणे जाण्याने सगळ्यांना धक्का बसला पण त्यापेक्षा त्याच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीमध्ये खदखदत असलेल्या एका विषयाला वाट मोकळी करून दिली.
‘नेपोटीझम’ किंवा घराणेशाही, सोबत कंपूशाही हा या क्षेत्राला लागलेलं म्हणावं तर गालबोट किंवा गोंदण. एखाद्या डॉक्टरच्या मुलांना ‘काय मग तुम्हीपण डॉक्टरचं बनणार ना?’ असं आपल्याकढे सहज म्हटलं जातं. आईवडील एका क्षेत्रामध्ये असतील तर मुलंही त्याचं क्षेत्रामध्ये असा जागतिक समज असतो तो समज या क्षेत्रालाही चुकलेला नाही. पण डॉक्टरच्या मुलांना डॉक्टर बनण्यासाठी डॉक्टरी शिक्षण घेणं आवश्यक असतं तशी आवश्यकता एका अभिनेत्याच्या किंवा निर्मात्याच्या मुलांना अभिनेता बनण्यासाठी नसते. या पेशाला म्हणावं तशी शिक्षणाची गरज नाही ना विशिष्ट पात्रतेची. त्यामुळे एरवी नवोदित कलाकाराला पहिलं काम मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड यांना सहज टाळता येते आणि संधी आपसूक दारावर चालून येते, हा या वादाचा मुख्य मुद्दा.
त्याशिवाय याला अनेक पैलू आहेत. सुशांतच्या आत्महत्येमुळे या सर्व चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. काही बडी नावं यात गुतली गेली. या धगधगत्या वातावरणात सुशांतचा नवा (शेवटचा) सिनेमा येणं, ही बाब खूपकाही बोलून जाते. या ‘सिनेमा’कडे फक्त एक कलाकृती म्हणून वेगळ्या नजरेने पाहता येणं कठीण आहे. सिनेमा पाहतानासुद्धा सुशांतचं नसणं विशेषतः त्याच्या जाण्यामध्ये गुंतलेली कारणं ही बाब दुर्लक्षित करणं कठीण होतं. पण सिनेमाचं परीक्षण, त्याच्यावरील मतं हा सगळा विषय बाजूला ठेवल्यास शेवटच्या सिनेमामध्येसुद्धा सुशांतची अभिनेता म्हणून असलेली धडपड, मेहनत स्पष्ट दिसून येते. ‘एक गुणी अभिनेता’ या बिरुदाला तो आपल्या इतर सिनेमांप्रमाणे इथेही सार्थ करतो.
‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ हे पुस्तक आणि त्यावर आधारित हॉलीवूडच्या सिनेमावर ‘दिल बेचारा’ या सिनेमाचं कथानक आधारित आहे. आयुष्यातील नैराश्येच्या टप्प्यावर एका व्यक्तीचं आयुष्यात येणं आणि त्याचं अचानक जाणं यातील एखाद्याची भावनिक गुंतवणुक या सिनेमामध्ये अधोरेखित केली आहे. थायरोईड कर्करोगाची रुग्ण असलेली क्रीझी सिनेमाची मुख्य नायिका आहे. सतत पाठीवर एका ओझ्यासम असलेली ऑक्सिजनची टँक तिला पदोपदी या कर्करोगाच्या भुताची जाणिव करुन देत असते. जगण्याची अनिश्चितता, त्यातून आलेल नैराश्य या ओझ्यानिशी ती आला दिवस ढकलत असते.
अशाच एका वाटेवर तिला मॅनी भेटतो. तोही हाडांच्या कर्करोगाने ग्रासलेला. पण त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्रीझीपेक्षा अगदी वेगळा. उरलसुरल आयुष्य आनंदात घालवायच, मित्राच सिनेमा बनवायच स्वप्न पूर्ण करायच, स्वतः आयुष्यात काहीतरी भन्नाट करायच अशी त्याची स्वप्न असतात. क्रीझी आणि मॅनीच्या भेटण्याने दोघांची आयुष्ये बदलायला सूरवात झालेलीच असते की भविष्यातल दाहक सत्य वर्तमानात आ वासून उभ राहत.
खरतर कथानक म्हणून एक सिनेमा आणि मुख्य पुस्तक असा खच्चुन भरलेला मालमसाला दिग्दर्शकाकडे उपलब्ध होता पण नवोदित दिग्दर्शक मुकेश छाब्रा या संधीचा फ़ारसा उपयोग करुन घेत नाही. बॉलिवुड सिनेमाला अपेक्षित नाचगाणी, हीरोगिरी सिनेमामध्ये आहे पण मुख्य पुस्तकामध्ये हेझल आणि ऑगस्तसच्या नात्यात गुंफलेली भावनिक नस क्रीझी आणि मॅनीला सापड़त नाही आणि नेमकी तिथेच कथानक अपुर पड़त. कदाचित हेच बारीक हेलकावे दिग्दर्शकाने टिपले असते तर सुशांतने त्याच सोन केल असत हे नक्की.
पुस्तकातील अनेक बारीक संदर्भ दिग्दर्शकाने वगळून त्याऐवजी मॅनीच्या मित्राच सिनेमा बनवायच स्वप्न या कथानकावर आवास्तव भर दिला आहे. सिनेमामध्ये सैफ़ अली खान एका वेगळ्या भूमिकेत येतो पण त्याच्या पात्रावर दिग्दर्शक अजिबात मेहनत घेत नाही. खरतर पुस्तकामध्ये हेच पात्र महत्त्वाची भूमिका बजावत. क्रीझी आणि मॅनीमधील प्रेमाचे क्षण, त्यांची जवळीक हे क्षणसुद्धा नाजूकतेने हाताळणे गरजेचे होते. कारण हे क्षण पुन्हा आपल्या आयुष्यात येतील याची शाश्वती दोघांनाही नसते. मृत्यु दोघांची दार ठोठावत असतो. त्यामूळे कर्करोगाच्या रुग्णांची मानसिकता, त्यांच्या घरच्यांची डोलामय स्थिती हे अजून बारकाईने आल असत तर सिनेमाने वेगळीच उंची गाठली असती.
मॅनीचा एक पाय गुडघ्यापासुन कापून त्या जागी कृत्रिम पाय लावलेला असतो. या कृत्रिम पायाने तो म्हणायला सगळी काम करु शकत असतो पण बास्केटबॉल खेळताना आपण अधू असण आणि स्वतःच्या हरण्याजिंकण्यावर नको असुनही हा अधूपणाचा शिक्का चिकटण याच त्याला असलेल दुःख किंवा कर्करोग आणि अधूपणा यामुळे इच्छा असुनही स्वतःची पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नसल्याची त्याची वेदना असे नेमके क्षण सिनेमात सुंदरपणे टिपले आहेत आणि सुशांत त्या क्षणांमध्ये जीव भरतो. त्याच्याशिवाय संजना सांघी, साहील वेद, सास्वता चॅटर्जी, स्वस्तिका मुखर्जी हे आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावतात.
सुशांतच जाण आणि त्या परिस्थितीमध्ये या सिनेमाच येण या योगायोगामुळे प्रेक्षक म्हणून हा सिनेमा एक वेगळीच साद घालतो. ती साद सिनेमा पाहताना सतत जाणवते. या सिनेमाचा असा परिणाम होणे काळानुरुप सहाजिकच होत. त्यामुळे या गारुडासोबत सिनेमाचा आस्वाद घेण इतकच आपल्या हाती राहत.