दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिलीपकुमारने नाकारलेल्या भूमिकेचा होतोय त्यांना पश्चाताप
जिवंतपणे दंतकथा बनण्याचे भाग्य दिलीप कुमारला लाभलं. त्यांची प्रत्येक कृती ही आजच्या भाषेत ‘न्यूज’ होत होती. दिलीप कुमारने आपल्या साठ वर्षाच्या कलाकार कारकिर्दीत फक्त ६४ चित्रपट केले. अतिशय चूझी, अतिशय अभ्यासू आणि प्रतिभावान कलाकार असलेल्या दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये काही चित्रपट मात्र आपण नाकारल्याचे दुःख झाले असे सांगितले.
रुपेरी जीवनात दिलीप कुमार पन्नासच्या दशकातच मोठे झाले होते. प्रत्येक निर्माता त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपडत होता. असे असताना दिलीप कुमार यांनी काही चित्रपट नाकारले होते. हे नाकारण्याचे दुःख त्यांना काही काळानंतर झाले होते. आज आपण दिलीपकुमारने नाकारलेले हे कोणते चित्रपट होते ते पाहूयात.
या नाकारलेल्या चित्रपटात पहिले नाव येते १९५२ साली प्रदर्शित झालेल्या विजय भट दिग्दर्शित बैजू बावरा या चित्रपटाचे. प्रकाश पिक्चरचा ‘बैजू बावरा’ हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील एक माईलस्टोन चित्रपट आहे. विजय भट जेव्हा दिलीप कुमारला या सिनेमा बाबत भेटले त्यावेळी त्यांना कथा तर आवडली पण सिनेमाच्या मानधनावरून चर्चा फिस्कटली. दिलीप कुमार त्यावेळी एका सिनेमाचे ५० ते ६० हजार मानधन घेत होते.
मात्र विजय भट यांनी त्यांना फक्त पाच हजार रुपये ऑफर केले होते. एवढ्या कमी पैशात दिलीप कुमार काम करणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांनी नम्र नकार दिला. पुढे या भूमिकेत भारत भूषण यांची निवड झाली. चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्यातील भारत भूषण ची भूमिका पाहून दिलीप कुमार यांना आपण हि भूमिका नाकारल्याचा पश्चाताप वाटला. आपण देखील या भूमिकेत चांगले रंग भरले असते असे त्यांना वाटले. पन्नासच्या दशकामध्ये दिलीप कायम ट्रॅजेडी भूमिका करत होता. त्यामुळे त्यांना ट्रॅजेडी किंग ही पदवी मिळाली होती. परंतु असे चित्रपट केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होऊ लागला. ‘देवदास’ (१९५५) या बिमल रॉय यांच्या चित्रपटानंतर तर त्यांना डॉक्टरांनी अशा भूमिका करू नका असा सल्ला दिला.
याच काळात त्यांना एक भूमिका ऑफर झाली होती. गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ चित्रपटातील विजय ची! खरोखरच ती दिलीप कुमार साठीच लिहिली होती असे वाटते. पण सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दिलीप कुमार आले नाही. कंटाळून गुरुदत्त यांनी एक मोठा निर्णय घेतला. चित्रपटातून त्यांना काढून टाकले आणि स्वतः चेहऱ्याला रंग लावून विजय रंगवला. प्यासामधील भूमिका आपण करायला हवी होते असे दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
सत्तरच्या दशकामध्ये प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’ या चित्रपटातील भूमिका देखील सुरुवातीला दिलीपकुमार यांना ऑफर झालेली होती. ही भूमिका देखील दिलीपकुमार यांनी नाकारली. याच भूमिकेने अमिताभ बच्चन पुढे सुपरस्टार झाला. साठच्या दशकामध्ये हॉलीवुड मध्ये बनलेल्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटात काम करण्याची फार मोठी संधी त्यांच्याकडे चालून आली होती पण इकडे बॉलीवूडमध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे दिलीपकुमार यांनी ही ऑफर नाकारली. पुढे ही भूमिका ओमर शरीफ यांनी निभावली. शरीफ यांच्या कला जीवनातील ही अजरामर भूमिका ठरली. पण ही भूमिका देखील नाकारल्याचा दिलीप कुमार यांना पश्चाताप होत होता.
============
हे देखील वाचा : अमिताभचा राजकारणात गेल्यानंतरचा ‘हा’ पहिला सिनेमा
============
तसे दिलीप कुमार यांच्या बाबत अनेक चित्रपटांची नावे घेतली जातात की ते चित्रपट आधी दिलीपकुमारला ऑफर झाले होते. यात सत्याचा भाग किती हे माहिती नाही. पण ‘दो आंखे बारा हात’ दो बदन हे चित्रपट दिलीप कुमारला ऑफर झाले होते असं म्हणतात. १९६४ सालचा आर के फिल्मचा ‘संगम’ हा चित्रपट खरंतर खूप आधीच यायचा होता. कारण राज कपूरच्या डोक्यात हे कथानक खूप आधीपासून होते. ‘अंदाज’(१९४९) चित्रपट हिट झाल्यानंतर त्यातील दिलीप- राज- नर्गिस हे त्रिकूट घेऊन त्याला ‘संगम’ करायचा होता. त्या सिनेमाचे आधीचे नाव घरौंदा होते. दिलीप कुमारने त्याला नकार दिल्यामुळे पुढे राज कपूर ने त्या भूमिकेसाठी राजेंद्र कुमारची निवड केली.