दिलीप कुमारचा बॉम्बे टॉकीजमधील पहिला पगार!
अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि राजकपूर यांची मैत्री खूप जुनी होती. ते दोघे पाकिस्तानमध्ये एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. (त्यावेळी दिलीप कुमारचे नाव युसुफ खान होते; दिलीप कुमार झाले नव्हते!) त्यानंतर चाळीसच्या दशकात दोन्ही कुटुंब मुंबईमध्ये आले आणि इथे खालसा कॉलेजमध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले. कॉलेज शिक्षण झाल्यानंतर दोघांनी कामधंदा शोधण्याचा पर्याय निवडला.
युसुफ खान यांचे वडील फळांचा व्यापार करत होते साहजिकच युसुफ खान त्यांच्यासोबत त्या व्यवसायात गेले. राजकपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर ‘पृथ्वी’ थिएटर वतीने भारतभर नाटक करत फिरत होते. त्यामुळे राजकपूर यांचा ओढा साहजिकच थिएटर आणि सिनेमाकडे होता. राजकपूरसाठी सिनेमांमध्ये प्रवेश फारसा अवघड नव्हता. परंतु पृथ्वीराज कपूर यांनी त्यांना , ”कुठेही माझे नाव न लावता तू तुझा प्रयत्न कर.” असे सांगितले.
राजकपूर यांनी देखील अगदी खालच्या स्तरापासून सिनेमामध्ये काम करायला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये अक्षरशः १५० रुपये महिना या पगारावर त्यांनी प्रोडक्शनमध्ये काम करायला सुरुवात केली. अगदी पडेल ते काम ते करत होते. पण यातून त्यांचं शिक्षण देखील होत होतं. “राजू जब तुम नीचे से उपर जाओगे तो एक दिन जरूर अव्वल बनोगे!” हा त्यांच्या वडिलांचा मंत्र त्यांनी कायम लक्षात ठेवला .
याच काळामध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि जगभर मंदीची लाट आली. युसुफ खान (Dilip Kumar) यांच्या बिझनेसवर देखील याचा मोठा परिणाम झाला. सहाजिकच कुटुंबासाठी काहीतरी वेगळं काम करणे भाग होते. परंतु युसुफ खान यांच्या घरी सिनेमा नाटक या विषयाला टोटली बंदी होती. त्यांचे वडील तर याला नौटंकी म्हणत. त्यामुळे पुढे काय करायचे हा प्रश्न होता. युसुफ खान (Dilip Kumar) यांचे कॉलेजमधील एक सर होते डॉक्टर मसानी. ते सायकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी खालसा कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायचे. त्यांचे लेक्चर युसुफ खान यांना खूप आवडायचे.
१९४२ साली एकदा युसुफ खान चर्चगेट स्टेशनवर उभे होते. तिथे त्यांची मसानी सरांची भेट झाली. त्या काळात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे मसानी सरांनी देखील युसुफ यांना ओळखले. त्यांनी विचारले, ”सध्या काय करतोस?” तर युसुफ खानने सांगितले, ”मी कामाच्या शोधात आहे.” त्यावर डॉ मसानी म्हणाले, ”मी आता मालाडला जातो आहे. तिथे माझ्यासोबत ये. काहीतरी नक्की काम होईल.” युसुफ खानला खरंतर दादरला जायचं होतं पण सर मालाडला त्याला घेऊन गेले. मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये मसानी सर युसुफ खान यांना घेऊन गेले आणि त्यांची भेट झाली देविकारानी यांची. युसुफ खान (Dilip Kumar) ची यापूर्वी देखील एकदा भेट झाली होती पण युसुफ खानने तेव्हा ऑफर नाकारली होती. आता मात्र त्यांना कामाची गरज होती.
देविकारांनी त्यांना विचारलं, ”तू उर्दू बोलू शकतोस का ?” युसुफ (Dilip Kumar) म्हणाला “हो”. “तू सिगारेट पितोस का?” तेव्हा युसुफ खानने सांगितले “नाही”. युसुफ खानला वाटले बहुतेक आपल्याला उर्दू ट्रान्सलेशनचा जॉब मिळेल म्हणून ते त्या पद्धतीने विचार करू लागले. परंतु देविकारानीने विचारले, ”तू एक्टिंग करशील का?” हा प्रश्न मात्र युसुफला अनपेक्षित होता. ती म्हणाली, ”तुला बाराशे रुपये महिना पगार मिळेल.” त्यावर युसुफ म्हणाला, ”मी विचार करून सांगतो.” घरी जाताना युसुफ लोकल ट्रेनमध्ये विचार करू लागला, ”हा पगार बहुतेक वार्षिक पगार असावा”.
त्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहिले महिना शंभर रुपये पगार मिळतो. या पगारात काय होणार? म्हणून त्याने डॉ मसानी यांना जाऊन भेटला आणि त्यांना सांगितले, ”खूपच कमी पगार आहे.” त्यावर ते म्हणाले, ”हा पगार तुझा एका महिन्याचा आहे!” तरी एकदा कन्फर्म करूत म्हणून त्यांनी देवीकाला फोन करून विचारले, ”हा १२०० रुपये पगार युसुफला तो देणार आहात तो मासिक आहे की वार्षिक?” त्यावर देविकाने सांगितले, ”अर्थातच मासिक!” डॉक्टर मसानी खुश झाले आणि त्यांनी सांगितले की, ”हा तुला महिन्याचाच पगार आहे!” युसुफचा विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा बॉम्बे टॉकीजमध्ये युसुफला घेऊन गेले आणि पगार कन्फर्म केला अशा पद्धतीने युसुफ खानचा फिल्मी प्रवेश झाला पण त्याने घरी काहीही सांगितले नाही. बिस्किटंच्या कारखान्यात कामाला जातो असे सांगितले आणि इकडे सिनेमात काम सुरू केलं!
=============
हे देखील वाचा : ‘नीले नीले अंबर पार चांद जब आये….’
=============
गंमत पहा राजकपूर फिल्मी खानदानीतून आलेला असून देखील १५० रुपये महिना पगारावर काम करत होता बॉम्बे टॉकीजमध्ये. मात्र युसुफ खान (Dilip Kumar)च्या घरी कुठलेही फिल्मी वातावरण नसताना आणि कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना त्याला महिना बाराशे या पगारावर बॉम्बे टॉकीजमध्ये जॉब मिळाला!