दिलवाली काजोल…
समर्थ आणि मुखर्जी घराण्याचा वारसा जपणा-या काजोलचा 5 ऑगस्टला वाढदिवस. काजोलचं सर्व घराणं बॉलिवूडमधील, अगदी तिची पणजीही अभिनेत्री होती. हा अभिनयाचा वारसा या गुणी अभिनेत्रीनं तेवढ्याच समर्थपणे सांभाळला आहे.
अभिनेत्री कशी असावी….गोरी पान, उंच, शिडशिडीत बांध्याची…ढोबळ मनाने अभिनेत्रीची ही व्याख्या आहे. मात्र या व्याख्येला एक अपवाद ठरली, ती म्हणजे काजोल…सावळ्या रंगाच, थोडी बुटकी असणारी काजोल हिंदी चित्रपट सृष्टीत आली.आपल्या आजी आणि आईच्या पावलावर पाऊल ठेऊन आलेली काजोल या दोघींपेक्षा दिसायला खूप वेगळी. तसंच तिचा अभिनयाचा बाजही वेगळा…बाजीगर, दिलवाले दुल्हनिया या चित्रपटातून काजोलनं आपला ठसा उमटवला आणि बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीचे रुप नाही तर तिचा अभिनय बोलतो हे सिद्ध केले.
काजोलचा जन्म फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या मुखर्जी-समर्थ या बंगाली आणि मराठी घरात झाला. तिची आई तनुजा प्रसिद्ध अभिनेत्री तर वडील प्रसिद्ध दिग्दर्शक शोमू मुखर्जी. तिची मावशी प्रसिद्ध अभिनेत्री नूतन. या सर्वात वरचढ म्हणजे काजोलची आजी शोभना समर्थ. शोभना समर्थ म्हणजे सुंदर, बिंनधास्त आणि परिपक्व अभिनेत्री. शोभना समर्थ यांच्या आई रतनबाई याही अभिनेत्री होत्या. 1936 मध्ये स्वराज्याच्या सीमेवर या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. आजी आणि आईचे हे अभिनयाचे गुण तनुजा आणि नुतन या त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये उतरले. या दोघींनी आपला काळ गाजवला. या घराण्याची चौथी अभिनय संपन्न पिढी म्हणजे काजोल.
आजीच्या अभिनयाचा समर्थ वारसा घेऊन काजोल वयाच्या सोळाव्या वर्षी मोठ्या पडद्यावर आली. ‘बेखुदी’ हा तिचा पहिला चित्रपट. अर्जुन, बेताब सारखे सुपरहीट चित्रपट दिलेल्या राहूल रावल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक. बेखुदी फार चालला नाही, पण काजोलच्या अभिनयाची दखल मान्यवरांनी घेतली. खरंतर बेखुदी म्हणजे काजोलनं सुट्ट्या घालवण्यासाठी केलेला उद्योग होता. पाचगणी येथील शाळेत शिकणारी काजोल सुट्टी घालवण्यासाठी आईकडे आली आणि तिला हा चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर मात्र काजोलला शाळा पूर्ण करता आली नाही.
बेखुदीमध्ये दिसलेली सावळी आणि थोडी जाड असलेली अभिनेत्री कितपत यशस्वी होईल याबाबत काहींनी शंकाही घेतली. पण बेखुदीपाठोपाठ आलेल्या ‘बाजीगर’नं काजोलचं नशीब बदललं. अब्बास-मस्तान यांचा हा थ्रिलर चित्रपट, ए किस बियर डाइंग या अमेरिकन चित्रपटावर आधारित ही कथा होती. यात शहारुख आणि शिल्पा शेट्टी काजोलचे सहकलाकार होते.
बाजीगरमध्ये श्रीदेवी पहिल्यांदा डबल रोल करणार अशी चर्चा होती. पण तिच्या तारखा मॅच झाल्या नाहीत, त्यामुळे शहारुख, शिल्पा आणि काजोल या नवोदीत असलेल्या त्रिकुटावर दिग्दर्शकांनी विश्वास ठेवल. बाजीगर सुपरहीट झाला. यातून काजोल, शहारुख आणि शिल्पा हे तिघंही स्टार झाले. याशिवाय काजोल आणि शहारुख ही सुपरहिट जोडी समोर आली. काहीजणांनी तर राजकुमार आणि नर्गिस यांच्या जोडीनंतर परफेक्ट जोडी म्हणून या दोघांचा उल्लेख केला.
त्यानंतर काजोल म्हणजे हीट हा सिलसिला चालू झाला. ‘ये दिल्लगी’ हा तिचा चित्रपटही यश्स्वी झाला. त्यानंतर ज्या चित्रपटानं अनेक विक्रम केले तो म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाय़ेंग… डीडीएलजे. हा चित्रपट काजोलच्या करिअरमधला सुवर्णक्षण होता. रोमॅंटीक मेलोड्रामा असलेल्या ‘डीडीएलजे’ची टॅग लाईन “Come… fall in love” ही होती. त्याचप्रमाणे प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रेमात पडले. मराठी मंदिरमध्ये 1000 आठवडे हा चित्रपट होता. शोले चित्रपटाचा विक्रम या डीडीएलजे ने मोडला.
डीडीएलजे नंतर काजोल म्हणजे यशाचा हुकमी एक्का ठरली. त्याप्रमाणे काजोलची रोखठोख प्रतिमाही समोर आली. अनेकवेळा सहपुरुष कलाकारापेक्षा तिचे मानधन अधिक असायचे. अर्थात ‘कुछ कुछ होता हे’, ‘कभी खुशी कभी गम’ सारख्या चित्रपटातील यशामुळे तर काजोलनं आपलं मानधन सर्वाधिक वाढवलं होतं. एरवी प्रेमळ, चुलबुली दिसणारी काजोल ‘फना’ आणि ‘माय नेम इज खान’ सारख्या चित्रपटात भावनिक भूमिकेत तेवढीच समर्थ दिसली. याशिवाय गुप्त, दुश्मन, इश्क, करण अर्जून, यू मी और हम, दील क्या करे, व्ही आय पी 2, हेलिकॉप्टर इला, हम आपके दिल मे रहते है हा काजोलच्या यशस्वी चित्रपटांची दास्तान चालूच होती.
काजोल नंबर वनवर असतांना ‘गुंडाराज’ हा चित्रपट तिच्याकडे आला. यात अजय देवगण तिचा सहकलाकार होता. या चित्रपटापासून काजोल आणि अजय यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं. अजय देवगणची कारकीर्द नुकतीच सुरु झाली होती. तर काजोल ही टॉपची अभिनेत्री. अशावेळी काजोलनं आपल्या स्वभावाप्रमाणे झटपट निर्णय घेतला.
24 फेब्रुवारी 1999, काजोल आणि अजय देवगण यांचा विवाह झाला. मराठमोळ्या पद्धतीनं हा विवाहसोहळा झाला. नथ घातलेली, हिरव्या नऊवारीमधली काजोल सुरेख दिसत होती. तिचा हा निर्णय धक्कादायक होता. कारण टॉपवर असलेल्या अभिनेत्रीनं लग्न करणं म्हणजे तिची कारकीर्द संपूष्ठात येणं असं मानलं जायचं. त्यामुळे तिच्यावर लग्नाची घाई केली म्हणून टीका करण्यात आली. अर्थात अत्यंत सडेतोड असलेल्या काजोलने आपल्या टीकाकारांची तोंडं लगेच बंद केली.
आता बॉलिवूडमधील सर्वात गुणी जोडपं म्हणून अजय आणि काजोलकडे बघण्यात येतं, तेव्हा तिचा निर्णय किती योग्य होता हे समजतं. काजोल न्यासा आणि यश या दोन मुलांची आई आहे. लग्नानंतर किंवा आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं करीअर संपतं हे सांगणा-यांनी कजोलनं आपल्या अभिनयातून गप्प केलं आहे. आजही ही अभिनेत्री स्वतःच्या अटींवर चित्रपट स्विकारते, आणि तिचे चित्रपट यशाच्या सर्वोच्च पायरीवर असतात. अलिकडे काजोल आपल्या होम प्रॉडक्शनमध्ये दिसली. अजय देवगण बरोबर ‘तान्हाजी’ मध्ये तान्हाजींच्या पत्नीची भूमिका तिनं केली. नऊवारी साडीमध्ये वावरणारी काजोल तडफदार मराठी पत्नींच्या भूमिकेत अगदी परफेक्ट बसली.
अभिनय आणि चित्रपटाव्यतिरिक्त काजोल समाजसेवेतही व्यस्त असते. लहानमुलं आणि विधवा महिलांसाठी चालवण्यात येणा-या संस्थांमध्ये ती काम करते. यासाठी तिचा कर्मवीर पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला आहे. या हरहुन्नरी अभिनेत्रीकडे पुरस्काराची कमी नाही. तब्बल सहा वेळा फिल्मफेअरच्या बाहुलीवर काजोलचं नाव कोरलं आहे. यापूर्वी तिची मावशी आणि अभिनेत्री नूतन यांनी पाच फिल्मफेअर मिळवून विक्रम केला होता. हा विक्रम काजोलनं मोडला. २०११ मध्ये तिचा पद्मश्री देऊन गौरव केला आहे.
काजोलच्या बोटामध्ये ओम लिहिलेली एक अंगठी कायम असते. ती अंगठी म्हणजे काजोलची ट्रेडमार्क आहे. अर्थात काजोल शंकराची भक्त आहेच. पण दरवर्षी आपल्या मुखर्जी परिावारासह काजोल दुर्गा पुजेत सहभागी होते. इथे आपलं स्टारपण बाजुला ठेऊन दुर्गापूजा आणि मनसोक्त नाचणारी काजोल दिसते. वास्तविक आयुष्यातही काजोल अशीच आहे.
तिनं आपल्या स्टारपणाच्या आवरणाला कधीच कुरवाळलं नाही. अनेकवेळा साधा आरसाही न बघता कॅमे-यासमोर ती आत्मविश्वासानं उभी असते आणि तो शॉट आकेही करते. काजोलचा हा आत्मविश्वास तर तिची ओळख आहे. बेखुदीतून आलेली चंचल स्वभावाची काजोल तान्हाजी पर्यंतच्या प्रवासात परिपक्व झाली आहे. आता आगामी वर्षात तिच्याकडे अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत. तिच्या या यशस्वी प्रवासासाठी कलाकृती मिडीयाचा अनेक शुभेच्छा!