चौकटीबाहरेचा दिग्दर्शक रवी जाधव
‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’, ‘रेगे’, ‘कच्चा लिंबू’, ‘न्यूड’ यांसारख्या मराठी सिनेसृष्टीला एक सौ एक कलाकृती देणारे सिनेदिग्दर्शक रवी जाधव.
रवी जाधव यांचा जन्म २२ सप्टेंबर १९६६ साली मुंबईत झाला. रवी यांचं बालपण वरळीत गेलं. त्यानतंर त्यांचं कुटुंब डोंबिवलीला शिफ्ट झालं. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेत रस होता. पण चित्रकलासारख्या विषयात करिअर करण्यासारखं काय आहे अशी शंका कुटुंबाच्या मनात होती. पण रवी जाधव यांचा स्वत:वरचा आत्मविश्वास काही वेगळं सांगू पाहत होता. त्यांनी मनात कुठेतरी पक्कं करून टाकलं होतं, की करिअर करायचं तर याच विषयात. त्यामुळे कुटुंबाची इच्छा नसताना रवी जाधव यांनी १९९१ मध्ये सर जे. जे. इन्सिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
आणि अखेर त्यांचं आयुष्याला वेगळं वळण मिळालं. नव-नवीन करिअरच्या संधी त्यांच्यासाठी खुल्या होणार होत्या. आयुष्यात हवा असलेला नेमका मार्ग त्यांना सापडला. इथे रवी जाधव यांचा रंगसंगती, जाहिराती, ग्राफिक विषयांशी संबंध आला. अभ्यासू विद्यार्थी असलेल्या रवी जाधव यांना महाविद्यालयीन शिक्षणानंतर चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. भारतातील मोठ्या जाहिरात एजन्सीसाठी दिग्दर्शक आणि कॉपीरायटर म्हणून १२ वर्ष काम केलं. त्यामुळे सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण त्यांना अशा क्षेत्रात जायचं होतं की तिथे अनिश्चितता होती. यश व अपयश हातात नव्हतं. फक्त प्रयत्न आणि मेहनत करणं हातात होतं…ते क्षेत्र होतं ‘सिनेदिग्दर्शक’
सुरुवातीपासूनच धडपड्या वृत्तीचे असलेले रवी जाधव यांचं नोकरीत मन रमत होतं पण आयुष्यात नवीन काही तरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. २००५ साली झी गौरव पुरस्कार सोहळ्यात गणपत पाटील यांना अवॉर्ड मिळाला. त्यावेळी रवी जाधव तिथे उपस्थित होते. त्याच क्षणी मनात वेगळाच किडा वळुवळु लागला. जर गणपत यांच्या आयुष्यावर सिनेमा केला तर… मग ‘नटरंग’ चित्रपटाचा विचार मनात आला.
हे सगळं नक्कीच त्यांच्यासाठी अवघड होतं. सिनेसृष्टीमधील कुटुंबाची पार्श्वभूमीही नव्हती. नटरंग चित्रपटाबदद्ल मित्र, कुटुंबाला सांगितल्यावर, ‘अरे गेला तो जमाना तमाशाचा. आता कोण बघणार असा सिनेमा. आता जग बदललंय’ अशा प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. पण रवी जाधव यांच्यातला किडा स्वस्थ बसू देईल तर ना…!!
तमाशातील लोककला ‘नटरंग’ चित्रपटातून अशा पध्दतीनं करू की तरुण डोक्यावर घेईल असा विचार रवी जाधव यांच्या मनात तरळून गेला. २००८ साली गलेलठ्ठ पगाराची नोकरी त्यांनी सोडली आणि नटरंगचा प्रवास सुरू झाला. यावेळी त्यांना साथ मिळाली संगीतकार अजय-अतुल, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेते अतुल कुलकर्णी, कोरिओग्राफर फुलवा, संतोष फुटाणे अशा तगड्या स्टार कास्टची…
‘नटरंग’ हा चित्रपट डॉ. आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. चित्रपटातील ‘वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’ ही गाणी खूप गाजली. रवी जाधव यांचा ‘नटरंग’ हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे सहाजिकच मनात धाकधुक होती. प्रेक्षकांना कितपत पसंतीस उतरेल, काय प्रतिक्रिया असतील? असे अनेक प्रश्न रवी जाधव यांच्या डोक्यात घोंघावत होते.
अखेर जानेवारी २०१० साली चित्रपट रिलीजचा दिवस उजाडला. प्रेक्षकांनी चित्रपट, गाणी अक्षरक्षा: डोक्यावर घेतली. नटरंगने तगडी कमाई केली. १०० हून अधिक दिवस चित्रपटानं पूर्ण केले. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्डही मिळालं. त्यांनतर आणखी काही चित्रपट करायचं रवी जाधव यांनी ठरवलं.
सातत्यानं नवीन प्रयोग करण्याची भूक त्यांच्या चित्रपटांमधून दिसून येते. प्रेक्षकांची नाळ अचूक ओळखणारा दिग्दर्शक रवी जाधव. यांनी ‘नटरंग’नंतर ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाईमपास’सारखे चित्रपट आणले. बालगंधर्व आणि बालक-पालक, टाईमपास या चित्रपटांच्या विषयात बराच विरोधाभास आहे. कारण बालगंधर्व यांची लोक पूजा करतात. अशा संवेदनशील विषयात हात घालणं आणि त्यांच्यावर चित्रपट काढणं खूप धाडसाचं काम. चित्रपटाचा प्रेक्षकही बदलणार होता. त्यामुळे आपला प्रेक्षक टिकवून ठेवणं हे जोखमीचं काम. पण हे रवी जाधव यांना उत्तमरित्या जमलं आहे.
धडपड्या आणि नवीन प्रयोगाची उर्मी असणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा प्रत्येक चित्रपट वेगळा धाटणीचा असतो. चौकटीबाहेरचा विषय संवेदनशील आणि यशस्वीपणे हाताळण्यात रवी जाधव यांचा हातगंडा आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचा प्रेक्षक वेगळा असतो. प्रत्येक चित्रपटाचा विषय नवीन काहीतरी सांगू पाहतो. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांची ओळख प्रेक्षकांना होते.
असाच एक २०१८ सालचा ‘न्यूड’ चित्रपट…
रवी जाधव हे सर जे.जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना एक रूम नेहमी बंद असायची. आणि तिथे नेहमी ‘न्यूड नो एन्ट्री’ असा बोर्ड लावलेला असायचा. त्यामुळे या बंद रुमच्या आड आहे तरी काय याचं त्यांना प्रचंड कुतुहुल होतं. या न्यूड मॉडेल खरंच मनापासून हे काम करतात का?, की पैशांच्या चणचणीमुळे? या कामाबद्दल त्यांच्या घरच्यांना माहिती आहे का?, यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय असेल? असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते.
हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका स्त्रीवर आधारित आहे. जेव्हा रवी जाधव यांनी चित्रपटाचं पोस्टर फेसबूकवर शेअर केलं तेव्हापासूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या. वादविवाद, चर्चा सुरू झाल्या.
गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स्वात (इफ्फी) मध्ये दाखवण्यात येणार होता. पण अचानक हा सिनेमा इफ्फीतून वगळण्यात आला. न्यूड चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत माहिती व प्रसारण मंत्रायलानं जारी केलेल्या यादीतून सिनेमाला वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पुढे हा चित्रपट रिलीज झाला ती गोष्ट वेगळी.
‘मित्रा’ ही रवी जाधव यांची पहिली शॉर्टफिल्म. या शॉर्टफिल्मला त्यांना अवॉर्डही मिळालं आहे. रवी जाधव यांचा प्रत्येक चित्रपट वेगळा अनुभव देणार असतो.
रवी जाधव सोशल साईटसवर अॅक्टिव्ह असतात. आपल्या नवीन प्रयोगाची माहिती ते स्वत: आपल्या प्रेक्षकांना देत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. “हर हर महादेव..मोरया नवीन सुरुवात” असं सुंदर कॅप्शनही दिलं होतं. रवी जाधव यांचा लवकरच छत्रपती शिवाजी असा चित्रपट येतोय. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असल्याची माहिती मिळितेय. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल खूप उत्सुक्ता आहे.
रवी जाधव यांनी मेघना यांच्याशी विवाह केला. मेघना या रवी यांच्या मित्राची बहीण आहे. मित्राच्या फॅमिलीसोबत पिकनिकला गेले असताना त्यांचा मेघनाशी मैत्री झाली. आणि पुढे जाऊन मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं.
समाजातील मनाला चटका लावणाऱ्या विषयांवर आणखी सिनेमे आम्हाला तुमच्या नजरेतून पहायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या कलाकृती मिडीयाकडून खूप शुभेच्छा!
- संकलन आणि शब्दांकन – प्रज्ञा आगळे.