नवीन वाट शोधणारा जतिन
जतिन यांचे वडील सतीश वागळे हे बॉलिवूडमध्ये निर्माते म्हणून नावाजले गेले. त्यांनी 1969 मध्ये ‘प्यार ही प्यार’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यामध्ये वैजयंती माला आणि धर्मेंद्र प्रमुख भूमिकेत होते. 1971 मध्ये राखी आणि जितेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला ‘यार मेरा’ हा चित्रपट केला. 1973 मध्ये अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या भूमिकांनी गाजलेला ‘नमक हराम’ ही सतिश वागळे यांचीच निर्मिती. त्यानंतर 1979 मध्ये राजेश खन्ना, राजकपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘नौकरी’ या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हा वागळे कुटुंबिय वरळीला रहायचे. पण काही कारणांनी ते 1983 मध्ये पुण्याला रहायला गेले. तेव्हा मुंबई-पुणे प्रवास सोप्पा नव्हता. फोनचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे सतिश वागळे हे मराठी चित्रपट सृष्टीकडे वळले. त्यांचा शेवटचा चित्रपट 1995 मध्ये ‘सुखी संसाराची बारा सुत्रे’हा होता. त्यामध्ये जतिन आपल्या वडीलांसोबत मदतनीस होते. फायलिंग, पेपरवर्कचं काम ते करत होते. वास्तविक तेव्हा जतिन यांनी हॉटेल मॅनेंजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. आणि त्याच क्षेत्रातला चांगला जॉब पण त्यांना मिळाला होता. पण लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीचे वातावरण घरी होते. ‘सुखी संसाराची बारा सुत्रे’ मध्ये प्रोडक्शनचे काम केल्यामुळे जतिन यांना या क्षेत्राची गोडी लागली. दरम्यान त्यांचे वडील एका हिंदी चित्रपटाचे काम करत होते. पण त्यादरम्यान दुर्दैवानें त्यांचे निधन झाले. त्याचवेळी जतिन यांनी चित्रपटसृष्टीत एन्ट्री मिळावी म्हणून मान्यवर निर्मात्यांकडे जायला सुरुवात केली. वडीलांचे नाव होते, म्हणून काही मान्यवर निर्मांत्यांनी त्यांची भेट घेतली ही. पण फक्त पाहुणचारापलीकडे काहीही झालं नाही. कारण जतिन यांना काहीच अनुभव नव्हता. मग जतिन पुण्यामध्ये सिनेमॅटोग्राफी शिकले. पुण्यामध्ये कनल सर यांचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर पुण्यातील रंगा गोडबोले यांच्या इंडीयन मॅजिक आय प्रोडक्शन हाऊसमध्ये ते जॉईन झाले.
इथूनच जतिन यांच्या आयुष्याला नवीन वळणमिळाले. रंगा गोडबोले यांचा अनुभव दांडगा. त्याचा फायदा जतिन यांना झाला. ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करु लागले. रंगा गोडबोले यांच्या सोबत जतिन पाच वर्ष होते. पिंपळपान, नक्षत्रांचे देणे अशा अनेक कार्यक्रमांचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिलं. मग प्रतिमा कुलकर्णी, विजय किंकरे, गजेंद्र अहिरे, संजय सुरकर यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. यात संजय सुरकर यांची स्टाईल त्यांना खूप आवडली होती. रंगा गोडबोले यांच्यासोबत जतिन यांना अनुभव आणि आत्मविश्वास मिळाला होता. त्यामुळेच आपण स्वतंत्ररित्या काम करायला सुरुवात करावी असा त्यांनी प्रयत्न सुरु केला. 2004 मध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. 1995 मध्ये जे बॅनर बनवलं होतं. त्याच बॅनरखाली पहिला मराठी चित्रपट केला, ‘चकवा’. अतुल कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सुहास पळशीकर हे कलाकार त्यात होते. मुक्ता बर्वेचा हा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शंभर टक्के जतिन वागळे होता. म्हणजे या चित्रपटाची कथा त्यांचीच होती. शिवाय दिग्दर्शन आणि निर्मितीही त्यांचीच! कथा…पटकथा…दिग्दर्शन… या सर्व बाजू त्यांनी सांभाळल्या. कारण नवीन निर्मात्याला पैसे द्यायला कुणीही तयार नव्हते. या चित्रपटासाठी त्यांना त्यांची गाडीही गहाण ठेवायला लागली. ‘चकवा’ चित्रपटाला चांगलं यश मिळालं. अमेरिकेत इंजिनीअर असलेला तरुण भारतात कोकणात एका प्रोजेक्टसाठी येतो. या तरुणाला काही भास होतात. मग एक-एक रहस्य समोर येतं… या रहस्याचे पदर हा तरुण कसा उलगडतो ही कथा या चित्रपटात आहे. या चित्रपटानंतर जतिन यांचा आणखी एक चित्रपट आला ‘माझी गोष्ट’ नावाचा. सिझोफेनियाअसोसिएशन, कॅनडा यांच्यातर्फे जनजागृतीचा उद्देश ठेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. डॉक्टर वाटवे आणि डॉक्टर आगाशे हे पुण्याचे मानसोपचारतज्ज्ञ. सोबत डॉक्टर विद्याधर बापट. या तिघांसोबत बसून जतिन यांनी या चित्रपटाची स्टोरी तयार केली. जनजागृती करणे हा या चित्रपटाचा उद्धेश होता. जतिन यांनी चित्रपट निर्मितीसाठी खूप मेहनत घेतली. परिणामी हा चित्रपट पॅनारोमासाठी गेला. जितेंद्र जोशी याचा हा पहिलाच चित्रपट. हा चित्रपटही नावाजला.
चित्रपटसृष्टीची आणि जतिन यांची ओळख होऊ पहात होती. त्यांनी तीनही बाजुंनी चित्रपट निर्मितीचं तंत्र आत्मसात केलंअसलं तरी जतिन यांना लिखाणाची जास्त आवड होती. श्रावणी देवधर यांच्यासाठी त्यांनी लिहायला सरुवात केली. मॉर्फी कंपनीसाठी एक हिंदी चित्रपट लिहीला. दरम्यान एक मराठी चित्रपटही केला. पण तो काही कारणांनी रिलीज होऊ शकला नाही. या सर्वांत श्रावणी देवधर यांच्यासाठी लिखाण चालूच होतं. या देवधर कुटुंबियांबरोबर जतिन यांनी अनेक प्रोजेक्ट केले. शिवाय स्वतःची वेगळी निर्मितीही चालूच होती. 2012 मध्ये त्यांनी ‘बंध नायलॉनचे’ हा चित्रपट केला.त्यात सुबोध भावे, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर हे कलाकर होते. मग ‘मांजा’ हा चित्रपट केला. खरतर ‘मांजा’ चित्रपटाची कथा 2007 साली तयार होती. या कथेमध्ये कोणी हिरो नाही…गाणी नाही. मग चित्रपट चालणार कसा? त्यामुळे ही चांगली कथा मागे पडली. पण जतिन यांनी स्वतः पुढाकार घेऊन मांजा चित्रपट केला. या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले.चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. जतिन यांचे नाव यशस्वी निर्माता म्हणून घेण्यात येऊ लागले.
अॅप लॉज नावाचा अदित्य बिर्ला यांचा प्लॅटफॉर्म आहे. त्यांना कोणी दिग्दर्शक हवा होता. हरमन बवेजा यांच्याकडे वेबसिरीजचे काम होते. पण तिन चित्रपटांचं दिग्दर्शन केलेला दिग्दर्शक हवा अशी त्यांची अट होती. जतिन यांचा ‘मांजा’ हा चित्रपट बवेजा यांच्या टेक्निशियनने पाहिला होता. त्यांना तो आवडला होता. त्यामुळे जतिन यांच्या नावाला पसंती मिळाली. ‘भोकाल’ नावाच्या वेबसिरीजसाठी ही चाचपणी होती. गोष्ट उत्तरप्रदेशमधली. महाराष्ट्रातला माणूस ती दाखवणार कशी हाच पहिला प्रश्न बवेजा यांनी वागळे यांना विचारला. वेबसिरिज हा फ्लॅटफॉर्म वागळे यांच्यासाठी नवीन होता. पण कॅमेरा तोच शिवाय कथा लिहीण्याची कलाही तिच त्यामुळे जतिन यांनी हे नवखे आव्हान स्विकारले. आणि स्वतःच्या अनुभवाच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यात ते अग्रेसरपण ठरले.
बवेजा यांना त्यांनी भोकालच्या शूटचे सर्व प्लॅनिंग शेड्यूल करुन दिले. भोकालचं शुट झालं. एडीटिंग चालू झालं. त्याच वेळी झी 5 च्या ‘पॉईझन ’वेबसिरीजसाठी जतिन यांना विचारण्यात आलं. ही वेबसिरिज पाच भागांच्या शुटींगनंतर थांबली होती. त्यांनाहा प्रोजेक्ट पुन्हा सुरु करायला नवीन डायरेक्टर हवा होता. तिथे श्रावणी देवधर यांनी जतिन यांच्या नावाची शिफारस केली. जतिन यांनी या वेबसिरीजचं जुनं फुटेज पाहिलं. पण त्यांच्या नजरेत ते परफेक्ट नव्हतं. त्यामुळे ही सिरीज मी करणार असेन तर मी पुन्हा नव्यानं शुटींग करेन असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. ही जतिन यांची अट मान्य झाली. झी 5 चे चॅनेल हेड हे हरमन यांना ओळखत होते.त्यांनी हरमन यांना विनंती करुन जतिन यांची मागणीच केली. त्या वेळी जतिन सकाळी ‘पॉईझन’चे शूट आणि रात्री ‘भोकाल’चे एडीटींग करत असत. किमान दोन महिने हे शेड्यूल होतं. त्यानंतर पहिल्यांदा ‘पॉईझन’ ही वेबसिरीज रिलीज झाली आणि तिला सर्वाधिक रेटेड सिरीज म्हणून अवॉर्ड सुद्धा मिळाला. ती झी5 ची सर्वात लोकप्रिय वेबसिरीज ठरली. आता ‘भोकाल’ ही रिलीज झालीये. ‘भोकाल’ ला तर 65 मिलीयन व्हूज मिळाले आहेत. ‘भोकल’ सिरीजचे तीन पर्व होणार आहेत. प्रयागराज चे आयजी नवनीत यांच्या जीवनावर आधारीत ही सिरीज आहे. त्यामुळे त्यावर रिसर्ज,कथा,शूट लोकेशन याबाबतपुढील काम चालू आहे.
या वाटेवर जतिन नवखे होते. वडीलांबरोबरचा अनुभव पाठिशी होता. जिद्द आणि आवड म्हणून त्यांनीया चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. आपल्या अनुभवाच्या आणि मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणले. आजपर्यंत त्यांनी पाच चित्रपट केले आहेत. टीव्ही सिरीयलही केल्या ज्यांना चांगलाच टीआरपीदेखील मिळाला. सात ते आठ मान्यवर दिग्दर्शकांना त्यांनी असिस्ट केलं आहे. आता दोन वेबसिरीजचे यशस्वी निर्माते आणि ‘भोकाल’ चे लेखक म्हणूनही त्यांचे नाव झाले आहे.
चित्रपट आणि वेबसिरीज या दोन्ही प्लॅटफॉर्मवर जतिन वागळे यशस्वी झालेत. पण तरीही त्यांना खरा आनंद मिळतो तो चित्रपट निर्मितीमध्येच. जतिन यांनाचित्रपट निर्मिती करतांना वेगळं समाधान मिळतं. जतिन सांगतात चित्रपटाची निर्मिती करतांना हे पक्कं लक्षात ठेवावं लागतं की आपला प्रेक्षक हा स्वतःचे पैसे खर्च करुन थिएटरमध्ये येतो. काही प्रेक्षकतर महिन्याचे पैसे साठवून कुंटुंबासह चित्रपट बघायला येतात. या प्रेक्षकांचं समाधान करणं ही जबाबदारी निर्मात्याची असते. त्यांनी ट्रेलर बघितला असतो. मग अशा कुटुंबाचं समाधान करणं हे माझं पहिलं कर्तव्य असल्याचं जतिन मानतात. या प्रेक्षकाला जर फसवलं तर हा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात येणार नाही. त्यामुळे निर्मात्याची जबाबदारी मोठी असते असं जतिन यांना वाटत.
हे सर्व सुख-समाधान वेबसिरीजमध्ये अनुभवता येत नाही, असं जतिन सांगतात. वेबसिरीज ही तुम्ही कधीही बघू शकता. रिलीज झाल्यानंतर पाच वर्षांनी बघितलीत तरी काही फरक पडत नाही. जतिन सांगतात खरतंर वेबसिरीज बनवणं हे टेक्निकली मोठं कसब असतं. त्यात वेळेचं बंधन असतं. काटेकोर रहावं लागतं. वेबसिरीजच्या शुटींगचं शेड्युल वेगवान असतं. एक वेबसिरीज ही अकरा एपिसोडची असते. साधारण पाचशे मिनीटांची ही वेबसिरीज असते. तीन ते चार चित्रपटांएवढी ही वेबसिरीज सलग शूट करावी लागते. चित्रपट शूटला पण वेळेचं बंधन असतं. पण तरीही या दोघांच्या निर्मितीमध्ये फरक असतो. चित्रपटातून आपण प्रेक्षकांबरोबर संवाद साधू शकतो. जतिन वेबसिरीजला फास्ट फूड म्हणतात. जशी प्रेक्षकांची चव तशी ही डीश सजवावी लागते. मग एकदा एक चव टेस्ट केली की कंटाळा येतो. मग त्याची चव बदलायची म्हणजेच नवीन काहीतरी अॅड करायचं. अर्थात हे फास्टफूड असल्यामुळे त्यातून काय मिळतं हे नक्की सांगता येत नाही, असंही जतिन स्पष्ट करतात.
जतिन निर्माते म्हणून यशस्वी आहेत. पण तरीही जतिन रमतात ते लेखकाच्या भूमिकेत. आता या लॉकडाऊनच्या काळात त्यांना मोकळा वेळ मिळाला आहे. या वेळेत आपल्या आवडत्या भूमिकेत जतिन रममाण झाले आहेत. आपल्या वेबसिरीजच्या नवीन कथांवर काम करीत आहेत. रात्री आड दिवस लपलेला असतो. त्यामुळे जतिन या लवकरच येणा-या दिवसासाठी आपली तयारी करीत आहेत.
आपल्या वडीलांचा वारसा प्रत्येकाला मिळतो. पण हा वारसा जपण्यासाठी फक्त नाव पुरेसं पडत नाही. तर त्याच्यामागे लागते मेहनत आणि जिद्द. जतिन यांनी ही जिद्द कायम ठेवली. खूप मेहनत घेतली. आता त्यांच्या नावापुढे यशस्वी निर्माता ही बिरुदावली लागली आहे. पण जतिन यांना यापेक्षा पुढचा टप्पा गाठायचा आहे. या क्षेत्रात सतत नाविन्य गरजेचे असते. जतिन हे जाणतात. त्यामुळे हा अभ्यासू निर्माता लेखक आता प्रेक्षकांना काही नवीन देता येईल का याचा अभ्यास करतोय. तरमंडळी तयार रहा आता जतिन वागळे यांच्या येणा-या नव्या प्रॉडक्शनसाठी…..
सई बने