‘हिरामंडी’साठी कुणी किती मानधन घेतले? जाणून घ्या
भव्यदिव्य सेट्स, महागडे कॉस्च्युम्स, दागदागिने आणि तितकंच भव्यदिव्य कथानकाचं सादरीकरण असं म्हंटलं की आपल्यासमोर एकाच व्यक्तिची कलाकृती उभी राहते. ती व्यक्ति म्हणजे संजय लीला भन्साळी.
आपल्या लार्जर दॅन लाईफ अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नुकतंच ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे.
गेली १५ वर्षे भन्साळी ज्या प्रोजेक्टवर काम करत होते तो ‘हिरामंडी’ हा प्रोजेक्ट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. नेटफ्लिक्स इंडियाची ही आजवरची सर्वात महागडी वेबसीरिज असून भन्साळी यांनी ही सिरिज त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच अगदी भव्यदिव्य रीतीने सादर केली आहे.
१ मे रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून लोकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भन्साळी यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच त्यांच्या या प्रोजेक्टमध्येही भव्य-दिव्य सेट्स, राजवाडे, खरे दागिने, भरजरी कपडे यांचा एक सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे.
या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, शेखर सुमन, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हासारख्या प्रसिद्ध कलाकारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
या सीरिजसाठी नेमकं कुणी किती मानधन घेतलं? याचं बजेट किती आहे? संजय लीला भन्साळी यांनी या सीरिजसाठी दिग्दर्शक म्हणून नेमकं किती मानधन घेतलं? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
‘मनी कंट्रोल’ या प्रसिद्ध वेबसाइटच्या वृत्तानुसार, संजय लीला भन्साळी यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनासाठी अंदाजे ६० ते ७० कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर ‘हीरामंडी’चं बजेट २०० कोटी रुपये आहे.
===
हेदेखील वाचा : मराठीसाठी झगडणाऱ्या रेणुका शहाणे का चर्चेत आहेत?
===
ही आजवरची नेटफ्लिक्स इंडियाची सर्वात महागडी वेबसीरिज आहे. सोनाक्षी सिन्हाने या सीरिजमध्ये दुहेरी भूमिका निभावली आहे. तसेच ती या सीरिजमधील मुख्य खलनायिकाही आहे. या सीरिजसाठी तिने तब्बल २ कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.
मनीषा कोइराला हिच्या कामाची सगळेच प्रशंसा करत आहेत. ‘हीरामंडी’मधील सर्वात महत्त्वाची भूमिका मनीषाने साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने एक कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे.
मनीषा कोइरालाच्या मोठ्या मुलीची भूमिका निभावणाऱ्या अदिती राव हैदरीच्या अभिनयाचीही तारीफ होताना दिसत आहे. तिने या भूमिकेसाठी एक ते दीड कोटी मानधन घेतल्याचं सांगितलं जात आहे.
रिचाने यात लाजवंती उर्फ लज्जोची भूमिका साकारली आहे. तिला मनीषाच्या बरोबरीने मानधन देण्यात आलं. तिला या सीरिजसाठी एक कोटी रुपये मिळाले.
संजीदाने रेहाना आणि मल्लिकाजानची धाकटी बहीण वहिदा ही भूमिका साकारली होती. तिला या सीरिजसाठी ४० लाख रुपये मानधन देण्यात आलं. फरदीन खानने या वेब सीरिजमधून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आहे.
त्याने यात नवाब वली बिन झायेद-अल मोहम्मद ही भूमिका साकारली आहे. यासाठी त्याला ७५ लाख रुपये मानधन देण्यात आलं. तसेच ‘हीरामंडी’मध्ये शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह बदुशा, फरीदा जलाल आणि श्रुती शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहायला मिळेल.