हॉलिवूडच्या चित्रपटांना बसतोय चीनमधील सेन्सॉरशिपचा विळखा
सरकारी सेन्सॉरशिपबरोबरच सोशल मीडियामधून होणारं ट्रोलिंग आणि त्यातून चित्रपटावर येणारी बंदी हे फक्त आपल्याकडे नाही, तर जगभरात सुरु आहे. याचा ताजा बळी आहे ‘मेट्रीक्स’ फेम ‘कीआनू रिव्ह्ज’. (Film censorship in China)
‘तिबेट हाऊस बेनेफिट कॉन्सर्ट’ मध्ये भाग घेतला म्हणून चीनमधील सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरून ‘कीआनू रिव्ह्ज’चे सर्व चित्रपट अचानक गायब झाले आहेत. टेन्सेन्ट व्हिडीओ (Tencent Video), योकु आणि मिगु व्हिडीओ (Youku & Migu Video) या प्लॅटफॉर्म्सवरील ‘Speed’, Something’s Gotta Give’, ‘Bill & Ted’s Excellent Adventure’, ‘The Lake House’ असे अनेक चित्रपट काढून टाकण्यात आले आहेत.
‘कीआनू रीव्ह्ज’ने तिबेट कॉन्सर्टमध्ये भाग घेतला म्हणून चीनमधील राष्ट्रवादी नागरिकांनी सोशल मीडियावर इतका गदारोळ केला की, चीन बॉक्स ऑफिसवर ‘मॅट्रीक्स’च्या कमाईवरही प्रतिकूल परिणाम झाला. ‘कीआनू रिव्ह्ज’चा आवाज असलेला ‘टॉय स्टोरी ३’ हा चित्रपट तेवढा काही प्लॅटफॉर्म्सवर अजूनही दिसतोय, पण तिथेही श्रेयनामावलीमधून त्याचं नाव हटवण्यात आलेलं आहे.
तिबेटला समर्थन देणं किंवा नुसता दलाई लामा यांच्यासोबत फोटो काढणं हे चीनमध्ये अजिबात खपवून घेतलं जात नाही. यापूर्वी रिचर्ड गेअर यांनी तिबेटला समर्थन देणारं वक्तव्य केलं म्हणून काही चित्रपट सोडावे लागले होते. सेलेना गोमेज या सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्रीला दलाई लामा यांच्यासोबत फोटो काढले म्हणून चीनमधील दोन कॉन्सर्ट्स रद्द करावे लागले होते. (Film censorship in China)
ब्रॅड पिट या अभिनेत्याने ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात तिबेटी जनतेबद्दल सहानुभूती आणि चिनी सैन्याबद्दल तिरस्कार वाटेल अशी कथेची मांडणी होती. या कारणामुळे केवळ ब्रॅड पिटचा हा एक चित्रपट नाही, तर स्वतः ब्रॅड पिटलाही चीनमध्ये मज्जाव करण्यात आला होता.
तरुणाईची लाडकी पॉपस्टार केटी पेरी हिने २०१५ साली चीनमधील एका कॉन्सर्टमध्ये तैवानच्या राष्ट्रध्वजासारखी रंगसंगती आणि त्यावरील चिन्ह असलेला ड्रेस परिधान केला होता. यामुळे संतप्त झालेल्या चिनी नागरिकांनी सोशल मीडियावर केटी पेरी वर निशाणा साधला. यामुळे मग केटी पेरी वर चीनमध्ये परफॉर्म करण्यासाठी अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली.
२०१७ साली जस्टिन बीबरवरही चीनमध्ये अशीच बंदी घालण्यात आली होती, कारण त्याने जपानमधील युद्धस्मारकाला भेट दिली आणि तिथले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
गेल्यावर्षी फास्ट अँड फ्युरिअस’ मालिकेतला ९ वा चित्रपट म्हणजेच ‘F9’ जेव्हा चीनमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा तो तुफान गर्दीत सुरु होता. पण या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये आलेल्या कलाकारांपैकी जॉन सेना याने तैवानचा उल्लेख देश असा केला आणि तेवढ्या एका कारणामुळे दुसऱ्या आठवड्यापासून बॉक्स ऑफिस कमाईला ओहोटी लागली. नंतर जॉनने चिनी भाषेतून फॅन्सची माफीही मागितली, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. (Film censorship in China)
‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे पत्रकार एरिक श्वार्टझल (Erich Schwartzel) यांनी तर या विषयावर एक पुस्तकच लिहिलंय – “रेड कार्पेट: हॉलिवूड, चायना अँड द ग्लोबल बॅटल फॉर कल्चरल सुप्रीमसी (Red Carpet: Hollywood, China and the Global Battle for Cultural Supremacy.)” या पुस्तकात त्यांनी हॉलिवूडवरील चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल विस्ताराने लिहिलेलं आहे.
चीन हे महत्त्वाचं सत्ताकेंद्र बनलं आहेच, पण आता चीनने जगभरातील बॉक्स ऑफिसवरही सत्ता गाजवायला सुरुवात केलेली आहे. निर्मात्यांच्या कमाईतला मोठा हिस्सा आता चीनमधून येतोय. पण आपला चित्रपट चीनमध्ये घवघवीत चालावा अशी इच्छा असणाऱ्या निर्मात्यांना आधी तो चित्रपट चिनी सरकारी सेन्सॉरकडून संमत करून घ्यावा लागतो.
चिनी प्रेक्षकांनी पाहू नये, अशी कोणतीही गोष्ट चित्रपटात असेल, तर त्याला प्रदर्शनाची मंजुरी मिळत नाही. हॉंगकॉंगमधील निदर्शनं किंवा तैवानचं स्वातंत्र्य किंवा तिबेटींचं आंदोलन अशा गोष्टींचा अगदी ओझरता उल्लेख जरी असेल तरी लगेच कात्री चालवली जाते किंवा थेट बंदीच. (Film censorship in China)
२००६ साली आलेल्या ‘मिशन इम्पॉसिबल ३’ मध्ये टॉम क्रूझ शांघायच्या रस्त्यांवरून जातोय, असं दाखवलं होतं. एका प्रसंगात त्याच्या मागे एका बिल्डिंगच्या गॅलरीत कपडे वाळत टाकलेले दिसत होते. मोठ्या शहरात असे कपडे वाळत घातलेले दिसले, तर जगाला वाटेल की आमचा देश गरीब आहे, म्हणून तेवढं ते दृश्य वगळा असं चीनी सरकारी यंत्रणेनं स्पष्ट सांगितलं आणि निर्मात्यांना ते निमूट ऐकावं लागलं.
=====
हे देखील वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
=====
याचीच दुसरी बाजू म्हणजे जर तुमच्या चित्रपटात चिनी कंपन्या किंवा चिनी गोष्टींचा समावेश असेल (Product Placement), तर चित्रपट चीनमध्ये हमखास चालतो. २०१४ मध्ये आलेल्या ”Transformers: Age of Extinction’ मध्ये मार्क वॉलबर्ग चिनी बँकेच्या एटीएम मधून पैसे काढताना दिसतो. दुसऱ्या एका प्रसंगात, चित्रपटातील एक कलाकार शिकागोमधील स्टोअरमधून चिनी बनावटीची प्रोटीन पावडर विकत घेतो. (Film censorship in China)
एरिक श्वार्टझेल (Erich Schwartzel) लिहितात की, “अशा क्लुप्त्या वापरल्यामुळे चीनमध्ये पहिल्या दहा दिवसात ‘Age of Extinction’ या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्यांनी पुढे असंही निरीक्षण नोंदवलं आहे की, हॉलिवूड चित्रपटात आता चिनी बनावटीचे मोबाईल्स जास्त दिसायला लागले आहेत.
=====
हे देखील वाचा: बॉलिवूडमध्ये दाखल होणार ६ नवे दाक्षिणात्य चेहरे…
=====
हॉलिवूड स्टुडिओजचे प्रतिनिधीही एक गोष्ट मान्य करतात की, वेगवेगळ्या देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी थोड्या-फार प्रमाणात त्या त्या ठिकाणच्या सेन्सॉरशिपचा सामना करावाच लागतो, पण चीनमधील सेन्सॉरशिप ही ‘जगात भारी’ आहे आणि कितीही डोकेदुखी वाटत असली तरी निर्मात्यांना चिनी सरकारपुढे झुकावंच लागतं. तिथे ‘मैं झुकेगा नही’ म्हणून चालत नाही.
शेवटी सत्ताकारणापेक्षा अर्थकारण महत्त्वाचं हेच खरं.