
Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!
‘आरती’ प्रदर्शित झाल्यावर राजश्री चित्र संस्थेचा दुसरा चित्रपट होता ‘दोस्ती’(Dosti). ६ नोव्हेंबर १९६४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. एका अंध आणि अपंग मित्रांच्या जीवनावरील ही कहाणी प्रचंड यशस्वी ठरली. या चित्रपटात कुणीही नावाजलेले कलाकार नव्हते, रोमान्स नव्हता, मारामारी नव्हती, खलनायक नव्हता, रूढार्थाने नायक नव्हता, नायिका नव्हती होती फक्त मैत्रीच्या अकृत्रिम नात्याची भावस्पर्शी कथा आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे मेलडीयस संगीत. एल पी यांचा हा दुसरा गाजलेला चित्रपट.

१९६३ साली त्यांनी ‘पारस मणी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यातील नायक मुंबईच्या पदपथावर गाणी गात ते आयुष्य जगत असतात. पायाने अपंग असले तरी ते स्वाभिमानी असतात. दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असतात. राजश्रीच्या चित्रात असलेला साधेपणा, मूल्यांची जपणूक आणि नात्यांचा सन्मान या गुण विशेषाचा इथे ठायी ठायी प्रत्यय येतो. ‘दोस्ती’ (Dosti) ने इतिहास निर्माण केला. फिल्म फेयरची सात नामांकने याला मिळाली होती त्यातील तब्बल सहा पारितोषिके या चित्रपटाने पटकावली. मैत्रीच्या नात्यावर अनेक सिनेमे यापूर्वीही येवून गेले होते आजही येत असतात पण ‘दोस्ती’च्या मैत्रीची बातच काही और होती. इथे समर्पण आहे, त्याग आहे, मैत्रीचा ओलावा आहे पण या सर्वाला एक समदु:खाची झालर आहे. समाजाकडून उपेक्षित असल्याची भावना आहे.आपण एकाकी आहोत, अनाथ आहोत आणि यातून आपण दोघे मिळून व्यवस्थेशी लढा देवू शकतो हा दुर्दम्य आशावाद आहे.
चित्रपटात रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) या अनुक्रमे पायाने अधू आणि अंध असलेल्या मित्रांचा जीवन संघर्ष आहे. दोघेही परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेले असतात आणि महानगरीत आलेले असतात. एकदा रामूला एक अंध मुलगा रस्ता ओलांडताना दिसतो, एक भरधाव गाडी त्याला उडवणार अशा स्थितीत रामू त्या मुलाला वाचवतो. तो अंध मुलगा मोहन असतो. दोघेही समाजाकडून अव्हेरलेले असतात. दोन समान दु:खाचे जीव एकत्र येतात आणि मैत्रीचे (Dosti) नाते फुलू लागते.

रामू एकदा स्टेशनच्या जवळ सहज माऊथ ऑर्गन वाजवीत असतो. लोक त्याला भिकारी समजून पैसे टाकतात. सुरुवातीला त्याला तो अपमान वाटतो पण मोहन त्याला याद्वारे आपण लोकांच काही काळ मनोरंजन करीत असतो त्यांना त्यांच्या दु:खापासून दूर नेत असतो त्यामुळे या कलेला मिळालेली ही पावती किंवा बिदागी समज असे सांगतो. पुढे दोघे जण मुंबईच्या रस्त्यावर गाणी गाऊन आपली उपजीविका सुरू करतात. मोहनची एक बहिण नर्स असते तो तिचा शोध घेत असतो. पुढे रामू त्याचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करतो त्यासाठी मोहन त्याला मदत करतो.
चित्रपटाला आणखी छोटी उपकथानके आहेत. काही अनपेक्षित वळणे आहेत. काही क्षणिक मतभेद आहेत तर दोघात वितुष्ट आणणारे काही प्रसंग आहेत. या सर्व परिस्थितीत त्यांची मैत्री तावून सुलाखून आणखी घट्ट होते. महानगरीत हरवत चाललेल्या माणुसकीचे चित्रण साठ वर्षापूर्वी करताना बडजात्या यांनी याच माणुसकीच्या नात्याचे काही गहिरे रंग ही इथे दाखवले. सत्येन बोस यांचे परफेक्ट डायरेक्शन चित्रपटाला लाभले होते. पुढे मराठी अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेली उमा (भेंडे) आणि अभिनेता संजय खान यांचा हा पहिला चित्रपट होता. (Untold stories)

चित्रपटाचे (Dosti) संगीत हा लेखाचा स्वतंत्र विषय व्हावा इतके अनेक पैलूंनी समृध्द आहे. म.रफी यांची पाचही गाणी अतिशय कर्णमधुर, अर्थवाही आणि काळजाला भिडणारी होती. यातील माउथ ऑर्गनचे पीसेस पंचम तथा आर डी बर्मन यांनी वाजवले होते. ‘चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे‘ (या गीताकारीता रफी आणि गीतकार मजरूह सुलतान पुरी याना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला!) ‘राही मनवा दुख की चिंता क्यूं सताती है’, ‘मेरा तो जो भी कदम है वो तेरी राह में है’, ‘कोई जब राह न पाये मेरे संग आये के पग पग दीप जलाये’, ‘जानेवालो जरा मुडके देखो मुझे एक इन्सान हूं मैं तुम्हारी तरहा’ ही रफीने गायलेली गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत यात लताचे एकमेव गीत होते ‘गुडीया हमसे रुठी रहोगी कबतक न हसोगी’.
==============
हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
==============
फिल्मफेअर सोहळ्यात ‘दोस्ती’ (Dosti) वर पुरस्कारांची बरसात झाली. सर्वोत्कृष्ट गायक,गीतकार,चित्रपट, कथा (बाणभट्ट) आणि संवाद लेखक (गोविंद मुनीस) हे पुरस्काराचे मानकरी ठरले. फक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सत्येन बोस यांना मिळाला नाही. या सोहळ्यात ‘दोस्ती’ला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. ’दोस्ती’चे हे मोठे यश होते कारण या सिनेमाला टक्कर द्यायला संगम, मेरे मेहबूब, वो कौन थी हे चित्रपट होते. (Entertainment mix masala)
१९६४ आणि १९६५ च्या बिनाका गीत मालाच्या वार्षिक कार्यक्रमात चाहूंगा मै तुझे, राही मनवा आणि कोई जब राह न पाये या गीतांनी हजेरी लावली. आज हा सिनेमा पहाताना त्यात अनेक त्रुटी जाणवतात. आजच्या पिढीला क्वचित प्रसंगी हसू देखील येईल पण नात्यांची वीण घट्ट करीत मैत्रीच्या निरपेक्ष भावनेला केंद्रस्थानी ठेवून पूर्णपणे नवीन कलाकारांकडून चित्रपट बनवणे आणि तो सुपर हिट करून दाखवण्याची क्षमता ताराचंद बडजात्या यांच्यात होती. यशाचा नवा फार्म्युला त्यांना या निमित्ताने सापडला.
वाईट एकच वाटते एवढे धवल यश मिळूनही यातील नायकांना मात्र आपले करीयर करता आले नाही.