‘यामुळे’ मराठी दिग्दर्शकावर आली आत्महत्येची वेळ
ख्वाडा, बबन यांसारख्या चित्रपटांमधून ग्रामीण बाजाचे दर्शन घडवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा नवीन चित्रपट ‘टीडीएम’ २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी चर्चेचा विषय ठरली होती. मोठ्या गाजावाजात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे जे या चित्रपटाचे निर्माते सुद्धा आहेत त्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.(Marathi director)
त्यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले, खूप मेहनतीने त्यांनी आणि त्यांच्या टीमने या चित्रपटाला मूर्त रूप दिले आहे. कित्येक लोकांचे कष्ट, वेळ यामध्ये गुंतलेला आहे. तसेच सिनेमासाठी लागणारा आर्थिक हातभार त्यांनी बँकांचे कर्ज घेऊन उभा केलेला आहे. एवढ्या मेहनतीने निर्माण केलेल्या चित्रपटाला प्रदर्शनानंतर मात्र चित्रपटगृहात प्रेक्षक असूनदेखील स्क्रीन्स दिल्या जात नाहीत, त्यांचे शोज् लावले जात नाहीत. अशा परीस्थितीत एखाद्या कलाकाराने काय करावे? कलाकरांनी जीव ओतून साकारलेली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचू न देणे म्हणजे त्या कलाकृतीची आणि त्या कलाकाराची गळचेपी केल्यासारखं होय. अशा परिस्थितीत कलाकारांजवळ आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.(Marathi director)
सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांनी एका सिनेमागृहाला भेट दिली. तिथे त्या सिनेमागृहाच्या मॅनेजर सोबत त्यांची सिनेमाच्या कामगिरीबाबत चर्चा झाली. त्यात त्यांच्या लक्षात आले की, सिनेमाला प्रेक्षक असूनसुद्धा सिनेमाचे पुढचे शोज काढून घेण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी सिनेमागृहात जाऊन प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद असून देखील शोज काढले जातात हे लक्षात येऊन त्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.(Marathi director)
प्रदर्शन थांबवल्यानंतर होणाऱ्या या सगळ्या प्रकाराची माहिती देण्यासाठी ते विविध लोकांची भेट घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपट सेनेचे अमेय खोपकर आदींची घेऊन ते आपली तक्रार मांडणार आहेत. सगळ्यांशी चर्चा करून चित्रपटाच्या पुढील वाटचालीबद्दल, प्रदर्शनाबद्दल कळवणार आहेत.(Marathi director)
विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेत भाऊराव कऱ्हाडे यांच्या समर्थनात ट्विट केले आहे. “राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रिन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.” अशा शब्दांत त्यांनी आपला पाठींबा दर्शवला आहे.
======
हे देखील वाचा : अभिनेता प्रवीण तरडे यांनी सांगितला ‘बलोच’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा थरारक अनुभव
======
‘टीडीएम’ हा भाऊराव कऱ्हाडे (Marathi director) यांचा तिसरा चित्रपट आहे. २०१५ साली ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक मान्यवर पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. ख्वाडा लोकांच्यादेखील पसंतीस उतरला होता. २०१८ साली ‘बबन’ हा आपला दुसरा चित्रपट घेवून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘कस्स ??? बबन म्हणील तस्स…’ म्हणत या चित्रपटाने तिकीट खिडक्यांवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या दुनियेशी कुठलाही संबंध नसलेल्या चेहऱ्यांना आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी देवून त्यांची प्रतिभा जगासमोर आणण्यात भाऊराव कऱ्हाडे यांचा हातखंडा आहे.