
Durgabai Kamat : गोष्ट भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्रीची!
अलीकडे भारतीय सिनेसृष्टीतील अनेक महिला अभिनेत्री जागतिक स्तरावर आपलं नाव कमावताना दिसून येतात. अशावेळी तुमच्याही मनात कधी हा प्रश्न आलाय का? की आज ज्या भारतीय चित्रपटसृष्टीत इतक्या महिला कलाकार झळकतात, त्या प्रवासाची सुरुवात नेमकी कोणी केली होती? म्हणजे पुरुषांप्रमाणे आपणही चित्रपटात काम करावं असं कोणत्या महिलेला आधी सुचलं असेल आणि सर्वात आधी कोणत्या स्त्रीने चित्रपटात काम केलं असेल? कारण एक काळ असा होता, जेव्हा स्त्रीने अभिनय करणं तर दूरंच, पण चित्रपट पाहणंही समाजमान्य नव्हतं. मात्र, अशाच कठीण काळात भारतीय चित्रपाटासाठी पहिलं धाडसी पाऊल टाकलं एका मराठी स्त्रीने आणि त्या म्हणजे दुर्गाबाई कामत! जाणून घेऊयात त्यांच्या या प्रवासाबद्दल… (Durgabai Kamat)

दुर्गाबाईंचा जन्म साधारण १८७९ साली झाला. लहानपणापासूनच त्यांना नाटक, गाणं आणि अभिनयाची ओढ होती. पण त्या काळात घरातल्या लोकांना हे अजिबात मान्य नव्हतं. बाई माणसानं रंगभूमीकडे वळणं हे चुकीचं मानलं जायचं. पुढे त्यांचं लग्न जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणाऱ्या आनंद नानोस्कर यांच्याशी झालं. मात्र, हे लग्न टिकू शकलं नाही आणि १९०३ साली त्या पतीपासून वेगळ्या झाल्या. पदरात ३ वर्षांची मुलगी आणि घटस्फोटित बाई. त्यामुळे समाजात योग्य ते स्थान नसल्यामुळे त्यांनी स्वतःच मुलीची जबाबदारी घ्यायचं ठरवलं. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या त्या काळात स्त्रियांकडे रोजगाराचे पर्यायही नव्हते, पण त्याही काळात त्यांनी वेगवेगळ्या प्रवासी नाटक कंपनीत कामं करायला सुरवात केली. खरं तर, त्या काळात स्त्रीने रंगभूमीवर येणं म्हणजे संपूर्ण समाजाच्या विरोधात उभं राहणं होतं, पण दुर्गाबाईंनी समाजाच्या चौकटी मोडल्या आणि स्वतःसाठीच नाही, तर पुढच्या पिढीतील अनेक स्त्रियांसाठी एक नवा मार्ग निर्माण केला.

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना खरा ब्रेक मिळाला तो दादासाहेब फाळके यांच्यामुळे! खरं तर त्या काळात रंगभूमीवर पुरुषच स्त्रियांची भूमिका साकारत होते. १९१३ साली जेव्हा दादासाहेब फाळकेंनी भारतातला पहिला मूकपट ‘राजा हरिश्चंद्र’ तयार केला तेव्हा त्यात सर्व स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनीच साकारल्या होत्या. परत, कारण हेच की समाजातल्या बंधनांमुळे स्त्रिया अभिनय करायला तयारच नव्हत्या. पण फाळकेंना हे अमान्य होतं. त्यांना कायम वाटायचं की भारतीय चित्रपटात भारतीय स्त्री हवीच. त्या विचारातच ते एका अभिनेत्रीचा शोध घेऊ लागले. आणि तेव्हाच त्यांच्यासमोर नाव आलं दुर्गाबाई कामत यांचं.

फाळकेंनी संधी दिली आणि दुर्गाबाईंनी ती स्वीकारली देखील. ‘मोहिनी भस्मासुर’ या चित्रपटात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली आणि त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्री ठरल्या. इतकंच नाही, तर त्यांच्या मुलीने कमलाबाई ज्या पुढे कमलाबाई गोखले म्हणून ओळखल्या गेल्या त्यांनीही या चित्रपटात मोहिनीची भूमिका केली आणि ती पहिली महिला बालकलाकार ठरली होती. दुर्गाबाईंच्या या धाडसामुळे अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळाली. इतर नायिकांसाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडले. दुर्गाबाईंचा त्यांच्या या धाडसाची किंमतही मोजावी लागली होती. त्या काळात चित्रपटात काम करणाऱ्या महिलांचा बहिष्कार करणं, अपमान, टोमण सहन करणं हे सारं काही त्यांनी केलं.
================================
हे देखील वाचा : A.R.Rehman : संगीत क्षेत्राचा बादशाह!
================================
समाजाचा रोष पत्करुनही दुर्गाबाईंनी आपलं स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार केलाच. आणि पुढे जवळपास ६०-७० चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. ‘मोहिनी भस्मासुर’ (१९१३), ‘बाबांची बायको’ (१९२७), ‘गुलामी जंजीर’ (१९३१) अशा अनेक चित्रपटांमुळे त्यांचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं. १७ मे १९९७ रोजी वयाच्या ११७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज भारतीय चित्रपटात ज्या असंख्य अभिनेत्री चमकतात, त्या चमकण्यामागे एक पहिली ठिणगी होती ती म्हणजे मराठमोळ्या दुर्गाबाई कामत. म्हणूनच, आपण मराठी म्हणून, भारतीय म्हणून हा इतिहास लक्षात ठेवायलाच हवा.
-श्रेया अरुण