अफाट… अचाट…. डायनामो….
डायनामो…. जगामध्ये असा क्वचित एखादा व्यक्ती असेल ज्याने या अवलीयाचं नाव ऐकलं नसेल. कोण आहे हा डायनामो… जादूच्या दुनियेतील बादशहा… बरं हा जादूगार म्हणजे आपण बघतो तसा नाही… अबरा का डबरा म्हणत एक डबा हलवून फुलातून कबूतर काढणारा… किंवा खिशातून एखादा हार काढणारा… डोक्यावर मोठी टोपी असणारा.. आणि तेवढाच लांब कोट घालणारा….! हा डायनामो वेगळा आहे. तो अगदी आपल्या सर्वांसारखा दिसतो आणि वागतोही. तो कुठल्याही स्टेजवर जादू करण्यासाठी जात नाही. तो लोकांमध्ये मिसळतो आणि हळूच आपलं अस्तित्व दाखवतो… मग एखाद्या मुलीचा मोबाईल बाटलीमध्ये बंद करतो… किंवा पत्त्यांच्या कार्डावर नाव शोधून दाखवतो… कधी हवेत चालतो तर कधी बंद काचेपलीकडे निघून जातो… तो काहीही करु शकतो… हे सर्व तो लोकांमध्ये जाऊन करतो…. आणि लोकांना ते समजेपर्यंत तो त्यांच्यातून गायबही झालेला असतो… असा हा डायनामो… त्याच्या हिस्ट्री चॅनेलवरील ‘डायनामो – मॅजिशन इम्पॉसिबल’ या सिरीजचे चार सिझन झाले… त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली… आणि अद्यापही मिळतेय…
या डायनामोचं अवघं आयुष्यचं अचंबित करणारं आहे. त्याचं मूळ नाव स्टिव्हन फ्रायन. ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड या छोट्या गावात त्याचा जन्म झाला. स्टिव्हनचे आजोबा जादूचे प्रयोग करायचे… त्यांनी हा वारसा छोट्या स्टिव्हनला दिला. लहानपाणापासूनच त्याची तब्बेत नाजूक… सतत आजारी… या आजारपणात स्टिव्हनला जादूचे प्रयोग वेगळी उर्जा देऊन गेले. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो जादूचे प्रयोग करायला लागला. तेव्हा त्याला जाणवलं आपण या जादूशिवाय दुसरं काही करु शकत नाही. स्टिव्हनला त्याचं लोकप्रिय नाव डायनामो, हे 2001 मध्ये मिळालं… न्युयॉर्कमध्ये शो करत असतांना प्रसिद्ध जादूगार डेव्हिड ब्लाईन यांनी त्याच्या जादूगारीतील कसबाने प्रभावित होऊन त्याला डायनामो हे नाव दिलं. 2003 मध्ये त्यांने कर्ज घेऊन कॅमेरा विकत घेतला. यानंतर 2004 मध्ये हा डायनामो लंडनमध्ये दाखल झाला. त्याला करिअर करायचं होतं. कशात… तर जादू करण्याच्या कलेमध्ये. त्याने तिथे एक स्वतःची छोटी टीम तयार केली. मग हा डायनामो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही जादूचे प्रयोग करायचा. हे प्रयोग नेहमीसारखे साचेबद्ध नव्हते. त्याची जादू लोकांना अचंबित करायची… कधी तो भिंतीवरुन चालत सरळ बिल्डिंगच्या खाली उतरायचा तर कधी कागदाची नोट तयार करायचा…. या सर्व त्याच्या कलाकारीचं रेकॉर्डींग त्याची टिम करायची… मग या सर्वांची एक छोटीशी फिल्म करुन युट्यूबवर यायची… येथून डायनॅमोच्या लोकप्रियतेला सुरुवात झाली. मग हिस्ट्री चॅनेलवर त्याचा ‘डायनॅमो – मॅजिशियन इंम्पॉसिबल’ हा सर्वात लोकप्रिय शो सुरु झाला. तब्बल चार सिझन झाले… जुलै 2011 ते सप्टेंबर 1014 या काळात या शो ने दोन सर्वाधिक लोकप्रिय शो साठी असलेले पुरस्कार जिंकले आहेत. दरम्यान डायनामो इतरही अनेक चॅनेलवर झळकला… त्याची ‘डायनामो इस्टेट ऑफ माईंड’ नावाची डॉकेमेंन्टरी दाखवण्यात आली. आधीच त्याच्या हिस्ट्री चॅनेलवरील शोला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. 30 मिलीयन प्रेक्षकांनी इंग्लडमध्ये ही सिरीज बघितली. तर 250 मिलीयन प्रेक्षकांनी जगभरात ही सिरीज बघितली. या सिरीजमध्ये डायनामोनं काय केलं नाही… थेम्स नदीवरून चालणं, ब्राझीलच्या क्रिस्थ डे रेमेडीच्या पुतळ्यासमोर हवेत उडणं, इमारतीच्या भिंतीवरून चालत येणं… असं काहीही….
या सिरिजच्या दुस-या भागाने असाच विक्रम केला. त्याला ‘सर्वोकृष्ट इंटरटेंन्मेंट प्रोग्राम’ हा पुरस्कार मिळाला आहे. बाफटाचा मानाचा पुरस्कारही या सिरीजला मिळाला. 2013 मध्ये डायनामोनं जगभराचा दौरा केला. न्युयॉर्क, साऊथ अफ्रीका, अगदी आपल्या देशातही डायनामो आला… वाराणसीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी आपल्या जादूची उधळण केल्यानंतर तो मुंबईच्या भेटीस आला होता. येथेही त्याच्या काही प्रसिद्ध जादूच्या करामती करून त्याने आपल्या चाहत्यांना थक्क केलं.
लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला डायनामो एक ब्रॅन्ड झाला… त्याचे नावच सर्वकाही होते. त्याने अनेक टीव्ही शो केले. अदीदास, सॅमसंग, पेप्सी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनींच्या जाहीराती केल्या. फॅशन शोमध्येही डायनामोचा बोलबाला झाला. त्याने जर एखादा शो करायची घोषणा जरी केली तरी त्या शो ची टिकीटं हातोहात विकली जाऊ लागली. त्याने स्वतःचं पुस्तकंही काढलं. ‘डायनामो – दि बुक ऑफ सिक्रेटस’… आणि ‘डायनामो – नथिंग इज इंम्पॉसिबल’… ‘माय स्टोरी’ ही पुस्तकं सर्वाधिक विक्रीची ठरली.
डायनामो फक्त आपल्यापुरताच राहीला नाही. त्याने स्वतःच्या लोकप्रियतेचा फायदा अनेक सामाजिक संस्थानाही करुन दिला आहे. जगभरातील अनाथ मुलांसाठी तो काम करतो… त्यांच्यासाठी पैसे गोळा करतो.
एवढं असूनही या डायनामोच्या आयुष्याचा एक काळा कोपरा आहे. त्याला वयाच्या 17 व्या वर्षापासून एक असाध्य रोग झाला आहे. या रोगाचं नाव आहे ‘क्रॉन्स’. क्रॉन्स हा पोट आणि आतड्यांशी संबंधित दीर्घकालीन आजार आहे. यात पचनाच्या समस्या, पोटात असह्य वेदना, अशक्तपणा, वजन कमी होणे आणि शौचातून कधीतरी रक्त जाणे असे त्रास होतात. या रोगावर उपचार होतात ते स्टेरॉइडने. हा उपचार दीर्घकालीन असून त्याची सर्वात मोठी दुसरी बाजू म्हणजे शरीरावर होणारे दुष्परिणाम… म्हणजेच अचानक वजन वाढणे… डायनामोला अगदी लहान वयात हा आजार झाला. त्याच्यावर शस्त्रक्रीयाही करण्यात आली आहे. यात त्याच्या तब्बल 50 टक्के आतड्या काढण्यात आल्या. तेव्हापासून लोकांना अचंबित करणारा हा जादूगार जेवणाचं कडक पथ्य पाळतो पण, अलिकडील काही वर्षापासून त्याच्या शरीर आणि चेहऱ्यावर स्टेरॉइड आणि इतर औषधींचा दुष्परिणाम दिसून आला आहे. अगदी बारीकसा अंगकाठी असलेला डायनामोचा चेहरा आता सुजलेला दिसत आहे. त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर त्याने स्वतःच पोस्ट केला आणि त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
“आपल्या आयुष्यात कायम वेदना आपल्या सोबत आहेत… मी त्यांच्यासोबत लढतो आहे… पण मी त्यांना कधीच विजयी होऊ देणार नाही….” डायनामोनं एका शो मध्ये हे वाक्य म्हटलं होतं. लोकांना आनंद देणारा हा किमयागार जीवनाचा खरा मंत्र देतो… कधीही हरु नका कायम लढत रहा… विजय होणारच….
आत्ता कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर या डायनामोवर लिहण्याचं कारण की या जादूगारालाही कोव्हीड – 19 नं आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह होते… पण 10 एप्रिलला या आजारातून पूर्ण बरं झाल्याचं टि्वट त्यानं केलं आहे. आधीच आपल्या शारीरिक दुखण्याबरोबर लढणारा हा जादूगार या कोरोनाच्या वारानं हरला नाही की खचला नाही… मंडळी याच उमेदीची सध्या गरज आहे. हिम्मत ठेवा… डायनामोसारखी…
सई बने