Ekda Kaay Zala Movie Review: बाप-लेकाच्या नात्याचा नितांतसुंदर, हळवा प्रवास
लहानपणी रात्री अंगणात किंवा गच्चीवर बसून ऐकलेल्या पुराणातल्या किंवा भूता-खेतांची गोष्टी असोत किंवा झोपताना आई, बाबा, आजी, आजोबा, मावशी, काका किंवा तत्सम कोणाकडून ऐकलेल्या ‘बेडनाईट स्टोरीज’ असोत; गोष्टी ऐकल्याशिवाय क्वचितच कोणाचं बालपण सरलं असेल. शाळेतही कथालेखन त्याच्या तात्पर्यासहित लिहिणं हा भाषा विषयांमधला अनिवार्य प्रश्न असतो. थोडक्यात गोष्ट हा विषय दैनंदिन आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशाच ‘गोष्ट’ या विषयावर आधारित चित्रपट म्हणजे ‘एकदा काय झालं..’ (Ekda Kaay Zala Movie Review)
‘एकदा काय झालं’ ही कथा आहे गोष्ट सांगणाऱ्या माणसाची. किरण (सुमित राघवन) एक शाळा चालवत असतो. या शाळेची संकल्पना पूर्णपणे वेगळी असते. किरणचा विश्वास असतो की, कुठलाही विचार तुम्ही गोष्टीच्या माध्यमातून जगासमोर प्रभावीपणे मांडू शकता. त्याची पत्नी श्रुती (उर्मिला कोठारे) मेडिकल फिल्डमध्ये मोठ्या पोस्टवर काम करत असते. त्यांचा मुलगा चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) हा ‘डॅडाज बॉय’ असतो. त्याचे बाबा त्याच्यासाठी ‘आयडॉल’ असतात. बाबांची प्रत्येक गोष्ट चिंतन ‘कॉपी’ करत असतो.
किरणचं स्वप्न असतं की, शाळेतल्या मुलांना गोष्ट ‘रिप्रेझेन्ट’ करण्यासाठी हक्काचं ऍम्पिथिएटर मिळावं. त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. त्याच्या या कामात त्याचा मित्र जय (पुष्कर श्रोत्री) त्याला मदत करू इच्छितो, पण प्रामाणिकआयुष्य जगणाऱ्या किरणला जयच्या भ्रष्ट्राचाराच्या पैशाने ऍम्पिथिएटर उभारायचं नसतं.
काही दिवसांनी किरणला सरकारी निधीतून ऍम्पिथिएटर मंजूर होतं, पण नेमकं त्याचवेळी त्याचं आयुष्य वेगळंच वळण घेतं. अनेकांच्या आयुष्यात असं घडत असेल, ज्यावेळी वाटतं आपलं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, पण नेमकं त्याचवेळी नियती असा काही झटका देते की, सगळं उध्वस्थ होतं. पण नियतीशी चार हात करून जो लढतो तोच खरा माणूस. (Ekda Kaay Zala Movie Review)
चित्रपट सुरवातीपासूनच मनाची पकड घेतो. फ्लो बऱ्यापैकी मेंटेन ठेवला आहे पण, शेवट मात्र उरकल्यासारखा वाटतो. किरणच्या शाळेची संकल्पना अजून विस्तृतपणे मांडायला हवी होती. तसंच एका घटनेमुळे जयचं किरणच्या शाळेतून स्वतःच्या मुलाला काढणं आणि त्यानंतर किरणशी संपर्कही न ठेवणं, या गोष्टी काहीशा न पटण्यासारख्या.
हा चित्रपट तुम्हाला जेवढं हसवतो तेवढंच रडवतोही. नकळतपणे पालकत्व कसं असावं हे ही शिकवतो. इथे भावना आहेत, पण ‘मेलोड्रामा’ नाही. इथे कोणी नायक नाही, नायिका नाही, इतकंच काय तर व्हिलनही नाही. आहे फक्त एक प्रवास गोष्टींचा, ध्येयाचा आणि नात्यांचा.. (Ekda Kaay Zala Movie Review)
चित्रपटामध्ये मोहन आगाशे आणि सुहास जोशी किरणच्या आई -वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यांचा सहज सुंदर वावर सुखावणारा आहे. मुक्ता बर्वेची छोटीशी भूमिकाही लक्षात राहण्यासारखी. सुमित राघवनने आपलं काम चोखपणे केलं आहे. उर्मिलाला श्रुतीच्या भूमिकेत फारसा वाव नव्हता, पण तिने आपलं काम प्रामाणिकपणे केलं आहे. पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले आणि इतर बालकलाकारांच्या भूमिकाही ठीकठाक.
चित्रपटात कमाल केली आहे ती अर्जुन पूर्णपात्रे या बालकलाकाराने. त्याने चिंतनच्या भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. नैसर्गिक अभिनयाने त्याने ही भूमिका जिवंत केली आहे. या मुलाचं अभिनय क्षेत्रातलं भविष्य उज्वल आहे.
=========
हे देखील वाचा – Timepass 3 Movie Review: दोन घडीचा विरंगुळा; थोडा संथ, थोडा हटके
=========
किरण आणि चिंतनची केमिस्ट्री उत्तम. या दोघांचे अनेक प्रसंग भावनिक झाले आहे. आई आणि मुलीची किंवा मुलाची केमिस्ट्री अनेक चित्रपटांतून बघायला मिळाली. पण ‘एकदा काय झालं’ मध्ये बाप-लेकाच्या नात्याला इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल आणि एका गायकाने दिग्दर्शित केलेला चित्रपट असूनही अकारण गाण्यांचा भडीमार न केल्याबद्दल दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचं अभिनंदन. (Ekda Kaay Zala Movie Review)
खरं तर चित्रपट बघताना अनेकदा मनात येतं, या चित्रपटाचं शीर्षक ‘गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट’ किंवा तत्सम काहीतरी असायला हवं होतं, पण चित्रपटाच्या शेवटी मात्र कळतं की, चित्रपटाचं शीर्षक किती समर्पक आहे. एकुणातच एक चांगली आणि वेगळ्या वळणावरची कलाकृती सहकुटुंब बघायची असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा. (Ekda Kaay Zala Movie Review)
चित्रपट: एकदा काय झालं..
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन: डॉ सलील कुलकर्णी
कलाकार: सुमित राघवन, उर्मिला कोठारे अर्जुन पूर्णपात्रे, मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री
संगीत: डॉ सलील कुलकर्णी
गीत : संदीप खरे, डॉ सलील कुलकर्णी, समीर सामंत
दर्जा : चार स्टार