सिनेमात सिच्युएशन आणि गाण्यात लॉजिक नसताना ही, दोन्ही झाले सुपर हिट!
चित्रपटात गाण्याच्या सिच्युएशन्स असतात त्या जागी ती गाणी बरोबर फिट बसतात पण बऱ्याचदा सिच्युएशन नसताना देखील काही गाणी टाकली जातात! हा प्रयोग कधी फसतो तर कधी चालतो. दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी एकदा एका चित्रपटात असाच प्रयोग केला होता आणि गाणं सुपर डुपर हिट झालं होतं. नव्वदच्या दशकातील पॉप्युलर दहा गाण्यांच्या लिस्टमध्ये या गाण्याचा नंबर नक्की लागतो. कोणता होता तो चित्रपट? आणि कोणते होते ते गाणे?
नव्वदच्या दशकामध्ये गोविंदा आणि करिष्मा कपूर यांची सुपरहिट जोडी जमली होती. त्यांनी एकत्र काम केलेले बहुतेक सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाले. डेव्हिड धवन (David Dhawan) हा या दशकातील गाजलेला दिग्दर्शक! गोविंदाला घेऊन त्यांनी बरेच सिनेमे केले. त्यापैकी एक होता ‘हिरो नंबर वन’. या सिनेमात गोविंदा, करिश्मा कपूर, कादर खान, परेश रावल. टिक्कू तलसानिया, रिटा भादुरी, अनिल धवन यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा बऱ्यापैकी ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘बावर्ची’ (१९७२) या सिनेमावर बेतला होता.
या चित्रपटातील गाण्याच्या संदर्भात एकदा मीटिंग चालू होती. गीतकार समीर, संगीतकार आनंद मिलिंद आणि दिग्दर्शक डेव्हिड धावा यांची चर्चा चालू होती. डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी समीरला एक रोमँटिक गाणे लिहायला सांगितले. त्यावर समीर म्हणाले, ”गाण्याची सिच्युएशन काय आहे?” त्यावर डेव्हिड धवन म्हणाले, ”यार, सिच्युएशन गई तेल लगाने! तू सिर्फ गाना लिख. मै सिच्युएशन क्रियेट करुंगा” गीतकार समीरला डेव्हिड धवन आणि गोविंदाच्या गाण्याचा जॉनर माहिती होता. त्यामुळे त्या स्टाईलचे गाणे लिहायला सुरुवात केली.
गाण्याची पहिलीच लाईन जबरदस्त होती. त्याने दिग्दर्शक डेव्हिड धवनला सांगितले, ”दादा गाना तो बन सकता है. लेकिन आपने पिक्चर में सुट नही होगा.” त्यावर डेव्हिड धवन म्हणाला, ”अरे यार मैने तुझे बताया ना वो गाना सूट करना और फिट बिठाना ये मेरी जिम्मेदारी है. तू सिर्फ फडकता गाना लिख.” त्यावर समीर म्हणाला, ”ठीक आहे.” त्याने गाण्याची ओळ ऐकवली. ‘मै तुझको भगा लाया हु तेरे घर से तेरे बाप के घर से…’ डेव्हिड धवन (David Dhawan) जागेवर उडाला त्याने समीरला मिठी मारली आणि म्हणाला,” अरे यार. यही तो चाहिये.”
पण गीतकार समीर म्हणाले, ”पण आपल्या चित्रपटातील नायिकेला बापच नाही. ती तिच्या आजोबांसोबत राहते. मग हे गाणं तिथे कसं चालेल? लॉजिकला धरून पाहिजे.” त्यावर डेव्हिड धवन (David Dhawan) म्हणाले, ”देख समीर ये लॉजिक बिजिक कुछ नही होता. मेरी फिल्म के गाने चलते है. बस यही मुझे मालूम है और आज की तारीख लिख ले. ये गाना सुपर हिट रहेगा. ये गाने मे कोई भी लॉजिक नही ढूंढेगा” गीतकार समीरने आता पूर्ण गाणे लिहून काढले.
गाणे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी झोकात गायले. गाणे आणि सिनेमा सुपर डुपर हिट झाले. आणि दिग्दर्शक डेव्हिड धवनचे (David Dhawan) शब्द खरे ठरले. आज इतक्या वर्षानंतर देखील कोणालाही गाण्यातील ही चूक लक्षात आली नाही की चित्रपटातील नायिकेला बाप नाही दादा आहे! पण कोणीही हे गाणं चुकीचं आहे असं म्हटलं नाही.
===================
हे देखील वाचा : ‘माझी ओळख ‘मदर इंडिया’ म्हणूनच रहावी’ असे नर्गीस का म्हणत ?
===================
या सिनेमातील इतर गाणी देखील जबरदस्त लोकप्रिय झाली होती. सोना कितना सोना है सोने जैसा तेरा दिल (उदित नारायण-पूर्णिमा) मै पैदल से जा रहा था उन्हे सायकील से आ रही थी (विनोद राठोड-पूर्णिमा),सातो जनम तुझको (कुमार सानू),मुहोब्बात कि नही जाती (उदित नारायण-साधना सरगम), तुम हम पे मरते हो(विनोद राठोड- साधना सरगम),यु पी वाला ठुमका (सोनू निगम) या सिनेमात गोविंदाला चार विभिन्न पार्श्वगायकाचा स्वर वापरला गेला हा देखील एक दुर्मिळ योग होता. सिनेमात आणि गाण्यात कुणी लॉजिक शोधात नाही हेच खरे!