‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रयोगशील ‘जून’ आणि ‘स्टील अलाइव्ह’
मराठी चित्रपटात घटनाप्रधान कथानके आणि त्यातील व्यक्तिरेखांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारे संघर्ष, या घटकांना प्राधान्य देऊन चित्रपट मनोरंजक करण्याची परंपरा सुरु आहे. या परंपरांना छेद देत व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचे चित्रण करणे, त्यातील रंजन मूल्यापेक्षा, दृशात्मकतेला केंद्रस्थानी आणून कथा मांडण्याचे मोजके प्रयत्न आदिश केळुस्कर यांचा कौल, सुमित्रा भावे –सुनील सुखथनकर यांच्या कासव या चित्रपटातून केले गेले. या प्रयोगशीलतेला पुढे नेणाऱ्या दोन मराठी कलाकृती सध्या गोव्यात सुरु असलेल्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या गेल्या.
हे देखील वाचा: चॉपस्टिक्स : हरवलेल्या जगण्याचा शोध
सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती या दिग्दर्शक द्वयीने दिग्दर्शित केलेला ‘जून’ हा चित्रपट आणि ओंकार दिवाडकर दिग्दर्शित ‘स्टील अलाइव्ह’ हा लघुपट त्यातील पात्रांच्या मानसिक आरोग्यावर भाष्य करीत, Healing is beautiful या आशयसूत्राला प्रचारकी न बनवता प्रेक्षकांपर्यंत ताकतीने पोहोचवतात.
‘जून’ ही कथा आहे नेहा (नेहा पेंडसे) आणि नील (सिद्धार्थ मेनन) या दोन वैफल्यग्रस्त माणसांची! मुक्त आयुष्य जगू पाहणाऱ्या नेहाचे वैवाहिक आयुष्य गोंधळून गेलंय. मुंबईतील घुसमटलेल्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ती औरंगाबादच्या घरी राहायला राहायला येते. त्याच कॉलनीमध्ये आई वडिलांबरोबर राहणारा नील इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात नापास झाल्याने कॉलेज होस्टेल मधून घरी परतला आहे. कर्ज काढून इंजिनीअरिंगला प्रवेश मिळवून दिला परंतु नील त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला म्हणून आई बाबा त्याच्यावर नाराज आहेत. खरंतर नीलच्या परीक्षेतील अपयशामागे आणि त्याच्या बंडखोर वृतीमागे कॉलेजमध्ये घडलेली एक दुर्घटना आहे पण तो त्याबद्दल कोणाशीच मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेयसीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तो असमर्थ ठरतोय.
जून ट्रेलर (JUNE | Official Trailer | Nehha Pendse, Siddharth Menon)- https://youtu.be/UsmGlRNk64c
नेहा आणि नील भेटतात. नेहाच्या नवऱ्याबद्दल नीलच्या मनात नितांत आदर आहे. नेहाचं सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळ असणं नीलला आकर्षित करतं. त्या दोघांची मैत्री होते. नेहाला औरंगाबाद शहर फिरवण्याच्या निमित्ताने ते एकत्र येतात. या भटकंतीच्या काळात ते एकमेकांच्या मनातले सल जाणून घेतात.
हे नक्की वाचा: गुल्लक : सुखदुःखाची मध्यमवर्गीय झलक
एक विवाहित स्त्री आणि कॉलेजमध्ये शिकणारा तरुण यांच्यात निर्माण होणाऱ्या भावनिक नात्यांचे विविध पैलू जागतिक चित्रपटांमध्ये अनेकदा येऊन गेलेले असले तरीही मराठी मध्ये हा विषय आणि त्याची दिग्दर्शकांनी केलेली हाताळणी नाविन्यपूर्ण आहे. नेहा आणि नीलच्या भूतकाळात रमण्यापेक्षा त्या भूतकाळाचा त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांची वर्तमानात होत असलेली फरफट ‘जून’मध्ये पहायला मिळते. नेहा, नील सारखी माणसं आपल्या आसपास असतात, आपण त्यांना कधी समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? हा प्रश्न आपल्याला सतावू लागतो. एखाद्या कलाकृतीने प्रेक्षकांना अस छळत राहणे, हे त्या कलाकृतीचे यश मानायला हवे.
‘जून’च वेगळेपण त्याच्या पटकथेपासून सुरु होते. निखील महाजनने लिहिलेल्या पटकथेत नेहा, नील आणि त्यांच्या संबधितांचे केलेले व्यक्तिरेखाटन, तसचं चित्रपटातील घटनांना औरंगाबाद शहराची दिलेली पार्श्वभूमी ‘जून’ला सशक्त बनवते. ‘What is death? When you stop showing up!’, ‘आपल्या माणसाला चुकून द्यायचं नसत, that is family’ असे कथानकाच्या ओघात येणारे संवाद चित्रपटाचा प्रभाव वाढवतात. क्विस वासिक यांनी केलेलं प्रकाशचित्रण हा प्रभाव अधिक गडद करते.
नेहा पेंडसे (Neha Pendse) आणि सिद्धार्थ मेनन (Siddharth Menon) यांनी नेहा आणि नील या व्यक्तिरेखांच्या मनाचे तळ समजून उमजून केलेला अत्यंत स्वाभाविक अभिनय ही ‘जून’ची सर्वात उजवी बाजू आहे. नेहा पेंडसेनी त्यांच्या व्यावसायिक इमेज मधून बाहेर पडून साकारलेली नेहा तिच्या व्यक्तिरेखेला सहानुभूती मिळवून देण्यात यशस्वी होते. आई वडिलांच्या अतिआग्रहामुळे इंजिनीअरिंगला प्रवेश घेणाऱ्या व त्यात अपयशी ठरल्यावर बंडखोरी करणाऱ्या सिद्धार्थ मेननच्या नीलमध्ये मानसिकरीत्या खच्चीकरण झालेले अनेक तरुण आपलं प्रतिबिंब पाहू शकतील. अतीव उद्वेगाने गच्चीच्या कठड्यावर उभं राहून नीलने अविवेकी निर्णय घेण्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. सिद्धार्थने ही भूमिका स्वीकारून, आपल्या चाकोरीतल्या गुडीगुडी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्यांपुढे त्याने आव्हान निर्माण केलयं. किरण करमरकर, संस्कृती बालगुडे आणि जितेंद्र जोशी यांच्या भूमिका त्यांच्या पात्रांना पूरक आहेत.
‘जून’ आपल्या समाजात वावारणाऱ्या, लौकिक अर्थाने अपयशी ठरत असलेल्या लोकांच्या मानसिक स्वास्थावर भाष्य करतो आणि त्यांना आशावादाच्या किनाऱ्यावर अलगद आणून सोडण्याची जबाबदारी सुद्धा घेतो.
असाच आशावाद ओंकार दिवाडकरच्या ‘स्टील अलाइव्ह’ मध्ये सुद्धा अनुभवता येतो. प्रेमभंगाचे दुःख सहन करू न शकलेली मीरा (पूजा रायबेगी) तिच्या प्रियकराशी, नातेवाइकांबरोबर संवाद साधू इच्छिते. पण या प्रक्रियेत तीची उमेद खचत जाते. मानस हेल्प लाईनच्या संवादिकेशी बोलल्यावर तिच्यातील आत्मविश्वास हळूहळू परतू लागतो.
हे वाचलंत का: सेलिब्रिटी वेडिंग: कल और आज…
मीराचे हे फोनवर सुरु असलेलं सुमारे पंचवीस मिनिटांचे संभाषण सलग एका शॉटमध्ये चित्रित करणे हे दिग्दर्शकापुढे मोठ आव्हान होत. उसळलेला समुद्र, चमकणाऱ्या विजा, त्यानंतर आलेला पाऊस आणि या काळात मीराच्या मनोवस्थे मध्ये होत जाणारे बदल टिपणारा ‘स्टील अलाइव्ह’ पाहणे हा आपल्याला अंतर्मुख करणारा अनुभव ठरतो.
‘जून’ आणि ‘स्टील अलाइव्ह’ या दोन्ही कलाकृती त्यातील समकालीन आशय आणि त्यांची सिनेमॅटिक हाताळणी यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. गोव्यात महोत्सवातील दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनी या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. लवकरच हे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतील तेव्हा रसिक प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यायला हवा.