
120 Bahadur : फरहान अख्तरकडून खूप अपेक्षा होती पण…
१२० बहादूर… नाव आणी ट्रेलरवरून वाटलं होतं की, फरहान अख्तरचा War Drama असलेला हा चित्रपट धमाका करेल, पण सपशेल फेल ठरला आहे. मेकर्सनी काय चुका केल्या आहेत आणि इतका महत्त्वाचा, संवेदनशील आणि देशभक्तीवर आधरित चित्रपट कसा गंडला, चला जाणून घेऊया. (120 Bahadur Movie Review)
तर हा विषय आहे १९६२ च्या रेझांग-ला इथे झालेल्या भारत-चीन युद्धाचा… मेजर शैतान सिंग भाटी यांच्या फक्त १२० बहादूर जवानांनी कशाप्रकारे ३००० चीनी सैनिकांना भारतात घुसू दिलं नाही आणि त्यांचे जवळपास १००० सैनिक मारले यावर हा चित्रपट आधारित आहे. आता आधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊयात.. १९६२ ला जेव्हा चीनी सैनिक लडाखमध्ये पुढे सरकत होते, त्यावेळी १३व्या कुमाऊं रेजिमेंटला चुशुल सेक्टरमधल्या रेझांगला खिंडीचे रक्षण करण्याचं काम आलं होतं. मेजर शैतान सिंग भाटी म्हणजेच फरहान अख्तरच्या नेतृत्वातली १२० जवानांची टीम इथे तैनात असते. चीनला काय हवं असतं, चुशूल ताब्यात घ्यायचा म्हणजे लडाख आणि जम्मू-काश्मीर त्यांच्या ताब्यात येईल. १७ नोव्हेंबरला एक जोरदार वादळ येतं आणि यासोबतच चीनी सैनिक हल्ला करतात. मेजर शैतान सिंग यांच्या तुकडीला वरून मागे हटण्याचे आदेश असतात, पण ते लढण्याचा निर्णय घेतात. यानंतर त्या वादळात आणि बर्फात तुंबळ युद्ध होतं आणि शेवट तुम्ही चित्रपटात पाहूच शकता !

चित्रपटाची पहिली मोठी चूक म्हणजे स्वत: फरहान अख्तर (Farhan Akhtar)… कारण फरहान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेमध्ये जमून आलाच नाही आहे. ना अभिनयात त्याचा दम दिसला आहे ना डायलॉग डिलीव्हरीमध्ये… फरहान अख्तरच्या चेहऱ्यावर तो चार्मच नव्हता आणि एकंदरीत त्याच्याकडून आर्मीची वाईब देखील येत नाही. भावनिक दृश्य साकारण्यात तो कमी पडतो. इतक्या महान माणसाची भूमिका ही सर्वात आव्हानात्मक गोष्ट होती. पण फरहान अख्तरला मी ही भूमिका साकारतो, असं का वाटलं? कुणास ठाऊक… फरहानने याआधी ‘लक्ष्य’ हा इंडियन आर्मीवर आधारित असलेला कल्ट क्लासिक चित्रपट बनवला होता. पण तिथे तो लेखक आणि दिग्दर्शक होता. पण स्वत: आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना तो पूर्णपणे फसला आहे. अगदीच चित्रपटातली सर्वात महत्त्वाची घोषणा ‘दादा किशन की जय’ ही बोलतानासुद्धा त्याच्या तोंडावरची माशी हलत नाही, असंच वाटतं. जर फरहान हा चित्रपटाचा प्रोड्युसरच असता, तर हा रोल त्याचासाठी उत्तम ठरला असता.
मेजर शैतान सिंग भाटी यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे राशी खन्ना हिने… तिचा सुद्धा प्रभाव चित्रपटात दिसून येत नाही. त्यांच्याव्यतिरिक्त अजिंक्य देव, अंकित सिवाच, विवान भटेना, स्पर्श वालिया, एजाज खान यांनी आपल्या भूमिका योग्यरित्या वठवल्या आहेत. खास करून डेब्यू करत असलेला स्पर्श वालिया… चित्रपटाची सुरुवात आणि शेवटसुद्धा त्याच्यासोबत होतो, आणि त्याने एक यंग सोल्जर रामचंद्र यादव म्हणून परफेक्ट पात्र साकारलं आहे. मराठमोळे अजिंक्य देवसुद्धा आर्मी ऑफिसर म्हणून उठून दिसले आहेत. मुळात सहाय्यक भूमिका या लीड भुमिकेपेक्षा वरचढ ठरल्या आहेत. ही झाली कास्टची बाजू…
आता थोडं म्युझिकवर येऊया. चित्रपटात तीन गाणी आहेत, तिन्ही गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत आणि तिन्ही गाणी लक्षात राहणारच नाहीत, अशी आहेत. उदाहरण द्यायचं झालं, तर ‘बॉर्डर’, ‘लक्ष्य’ आणि ‘एल ओ सी कारगिल’ या चित्रपटांची गाणी सुद्धा जावेद अख्तर यांनीच लिहिली आहेत आणि आजही ती आपल्या स्मरणात आहेत, पण ‘१२० बहादूर’चं एकही गाण प्रभाव पाडू शकलं नाही. Background Score तर तुम्हाला प्रचंड निराश करतं. देशभक्तीपर चित्रपट म्हटलं तर त्याचा सगळा भार हा गाण्यांवर असतो, पण इथे तो भार पेलायला कदाचित मेकर्स तयारच नव्हते, असं वाटतं.

चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूपच स्लो आहे. सैनिक आणि त्यांचे कुटुंबासोबत असलेले भावनिक ऋणानुबंध दाखवण्याचे प्रयत्न मेकर्सनी केले आहेत. पण इथेही तुम्ही कनेक्ट होऊ शकत नाही. विशेष म्हणजे आर्मीच्या कुटुंबाचे सीन ही कुठल्याही वॉर ड्रामा चित्रपटाची खरी ताकद असते, पण हे सीन खूपच जास्त एव्हरेज आहेत. संवाद हासुद्धा चित्रपटाची उजवी बाजू ठरण्यात अयशस्वी ठरला आहेi ! तुमच्या अंगावर शहारे आणेल, असा एकही डायलॉग चित्रपटात नाही. आणि जे काही डायलॉग होते, ते फरहान अख्तरला एक्झेक्युट करताच आले नाहीत. इथे तुम्हाला बॉर्डरच्या सनी देओलची खूप आठवण येईल. चित्रपटाचा स्क्रीनप्ले पण फसलाय. चित्रपटात सर्वात महत्त्वाचं काय तर सुंदर लडाख दाखवायला ते यशस्वी झाले आहेत. त्यासोबतच ६०च्या दशकात सैनिक कसे वावरायचे, त्यांची वर्दी कशी होती, त्यांचं राहणीमान, लडाखची संस्कृती… एकंदरीत त्यांनी तो काळ उभा केलाय. शेवटची इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मी मधली Combat Fight जबरदस्त आहे ! चित्रपटाला तेत्सुओ नागाटा यांची सिनेमेटोग्राफी आहे आणि ती प्रशंसेला पात्र आहे.
================================
हे देखील वाचा : Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…
================================
आता जेव्हा आपण War drama म्हणतो, तेव्हा तो अॅक्शन आणि भावनांवर आधारित असतो. इथे शेवटी शेवटी अॅक्शन तर आहे पण भावनांच्याभोवती मेकर्सना खेळताच आलेलं नाही. अगदीच फरहान अख्तर म्हणजेच मेजर शैतान सिंग भाटी शहीद होतानाचा सीनसुद्धा तुम्हाला इमोशनल करत नाही. आता थोडं डीरेक्टरबद्दल जाणून घेऊ. याचं डीरेक्टन केलय रजनीश घाई यांनी… तसं हे इंडस्ट्रीमधलं फार मोठं नाव नाहीये. पण इथेही घाई यांना मोठी उडी घेता आली नाही. फक्त शेवटचे वॉर सीन त्यांनी परफेक्ट शूट केलेले आहेत. एवढ्या महत्वाच्या विषयाची रायटिंग खूपच कमजोर आहे, जी केलीये राजीव मेनन यांनी… ते इंडियन आर्मीच्या बहादुरांची इन्स्पायरिंग गोष्ट घेऊन आले हे उत्तम, पण ती त्यांना मांडता आली नाही. पण युद्धाची दाहकता इथे जाणवते. आणि कशाप्रकारे आपले सैनिक त्यावेळी लढले असतील हे कळून येतं.

परमवीर चक्राने सन्मानित असलेल्या वीराची गोष्ट दाखवण, यातून हे दिसून येतं की मेकर्सचे हेतू चांगले होते, पण तशा भावना दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता फरहान अख्तर यांना जोडता आल्या नाहीत. चित्रपटावर थोडासा ‘बॉर्डर’चा प्रभाव दिसून येतो पण तुम्ही ‘बॉर्डर’ची अपेक्षा घेऊन जाल, तर निराश व्हाल. जर Acting, स्क्रीनप्ले, म्युझिक आणि डायलॉग्स अधिक मजबूत असते, तर चित्रपट भारी झाला असता, यात शंकाच नाही. पण तरीही आपल्या बहादूर जवानाचं शौर्य, त्यांचं बलिदान पाहण्यासाठी तुम्ही एकदा हा चित्रपट थीएटरमध्ये जाऊन बघू शकता.
कलाकृती मीडिया ‘१२० बहादूर’ चित्रपटाला देत आहे ५ पैकी २ स्टार्स !
-सागर जाधव