राम गोपाल वर्मा: आशिक-ऐ-फिल्ममेकिंग
१९८९ साली ‘राम गोपाल वर्मा’ (Ram Gopal Varma) हे एखाद्या शुद्ध हिंदी भाषिकाला शोभेलसं नाव घेऊन हा तेलुगू युवकुडू ‘सिवा’मधून आपलं दिग्दर्शकीय पदार्पण करता झाला. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी फिल्ममेकिंगचं माफक शिक्षण आणि अफाट वेड घेऊन रामू नागार्जुनला भेटला. त्याच्या हातात ‘शिवा’ची कथा होती. हे प्रकरण काहीतरी भन्नाट होतं हे नागार्जुनने ओळखलं आणि त्याने फिल्ममध्ये काम करण्यासाठी होकार दिला. त्यावर्षी तेलुगू चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातलेल्या ‘शिवा’चा हिंदी रिमेक १९९०मध्ये त्याच नावाने रिलीज झाला आणि ‘राम गोपाल वर्मा’ उर्फ ‘रामू’ या नावाला बॉलीवूडमध्ये एक वलय प्राप्त झालं.
‘शिवा’मध्ये त्यावेळच्या टिपिकल मास-मसालापटांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ठासून भरल्या होत्या पण ‘शिवा’चं वेगळेपण होतं- त्या चित्रपटातील वास्तवदर्शी थरार! इंजिनिअरींगचा विद्यार्थी असलेल्या रामूने या चित्रपटामधून त्याने अनुभवलेली कॉलेजमधली दुनियादारी आणि दादागिरी पुन्हा एकदा जिवंत केली. जीवघेण्या पाठशिवणीच्या खेळात प्रेक्षकांनाही बसल्याजागी सहभागी करून घेतलं आणि सायकलपेक्षा सायकलच्या चेनला न भूतोः न भविष्यतिः असं महत्त्व प्राप्त करून दिलं.
त्यावेळच्या बॉलीवूडवर पूर्णतः हिंदी-मराठी-पंजाबी भाषिकांचा पगडा होता पण अभिनयक्षेत्रावर असलेली कमल हसन, रजनीकांत, श्रीदेवी यांची हुकूमत तेव्हाही ओसरली नव्हती. बाळू महेंद्र, के. राघवेंद्र राव, दासरी नारायण राव ही नावं वगळता दक्षिणेकडून दिग्दर्शक म्हणून इतर कुठलंही समर्थ नाव प्रेक्षकांसमोर आलं नव्हतं. मणीरत्नम, ए. आर. रेहमानचा इथं शिरकाव होणं बाकी होतं आणि त्याचवेळी ‘राम गोपाल वर्मा’ या इंडस्ट्रीत आपले पाय जागीच घट्ट रोवून उभा होता. त्याच्या पहिल्यावहिल्या ‘शिवा’ने त्याला नागर्जुनपेक्षाही अधिक स्टारडम मिळवून दिलं होतं. बोनी कपूरने ‘रूप की रानी चोरोंका राजा’साठी अर्थसहाय्य मिळावं म्हणून रामूला दिग्दर्शकाची जबाबदारी देऊन ‘रात’ची निर्मिती केली. ‘रात’ फारसा चालला नव्हता पण तत्कालीन भयपटांच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा सिनेमा होता. रामूचे चित्रविचित्र कॅमेरा अँगल्स ‘रात’चा भयरस अधिकच खुलवणारे होते. हीच कमाल त्याने ‘द्रोही’मध्येही दाखवली. ‘द्रोही’मधलं त्याचं स्टोरीटेलिंग हे नागर्जुनच्या अँटीहिरो असण्याइतकंच जबरदस्त होतं. फिल्ममध्ये एकापाठोपाठ एक घडणाऱ्या खुनांमधून रामू प्रेक्षकांमध्ये आणखीनच भिनत जातो.
१९९५चा ‘रंगीला’ हा ‘रामू’चरितमानस’मधला एक महत्त्वाचा अध्याय होता. ‘रंगीला’ची कथा रामूला रमेश या कॉलेजमधील मित्राच्या एकतर्फी प्रेमकहाणीवरून सुचली. आमिरने यात साकारलेला मुन्ना हा रमेशचाच फिल्मी अवतार होता. या चित्रपटाची कथा फक्त राज कमल-मिली-मुन्ना हा प्रेमाचा त्रिकोण मांडण्यापुरती मर्यादित नव्हती तर त्याखेरीज रामूचं सिनेमा आणि त्याच्या निर्मितीप्रक्रियेबद्दलचं प्रेमही प्रतिकात्मक रूपाने प्रेक्षकांसमोर आणणारी होती.
रामूचं स्त्रीदेहावरील, विशेषतः उर्मिलावरील प्रेम कुणापासून लपून राहिलं नव्हतं. ‘रंगीला’ हा त्याच प्रेमप्रकरणाचा कळसाध्याय होता. ‘रंगीला’नंतर रामूने पुन्हा एकदा उर्मिलाला घेऊन ‘दौड’च्या रूपाने हास्यरसाची मेजवानी प्रेक्षकांना दिली. चित्रपट तिकीटबारीवर आपला जम बसवू शकला नाही, पण यातील चाको आणि पिंकी सारखी पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत रामूची चौफेर फटकेबाजी सुरूच होती तर बॉलीवूडमध्ये रामूचा एक खास प्रेक्षकवर्ग बनत होता आणि यानंतर रामूने दिला एक अप्रतिम ‘मुंबई’ नॉयर- ‘सत्या’!
‘सत्या’… पावसात भिजलेली मुंबई, अंगाने काडी पैलवान असणारा मुंबईचा डॉन भिकू म्हात्रे, थंड नजरेचा आणि खुनशी विचारधारेचा सत्या.. द्रोहीची सुधारित आवृत्ती असलेला ‘सत्या’ हा रामूचा ‘शिवा’, ‘रंगीला’नंतरचा तिसरा मास्टरपीस होता. याच चित्रपटाने भारतीय चित्रपटांना दोन कालखंडात विभागलं आणि ते कालखंड म्हणजे ‘सत्या’पूर्वीचा भारतीय सिनेमा आणि ‘सत्या’नंतरचा भारतीय सिनेमा. मैलाचा दगड हा शब्दही ‘सत्या’च्या यशापुढे खुजा वाटू लागला. ‘सत्या’ रामूच्या बहुचर्चित गँगस्टर ट्रायलॉजीचा पहिला भाग होता, ज्यात नंतर ‘कंपनी’ आणि ‘डी’चा समावेश केला गेला. ‘कंपनी’ सारखा मास्टरपीस विवेक ओबेरॉय, अजय देवगण, मोहनलाल, मनीषा कोईराला, राजपाल यादव, विजय राज इत्यादींच्या करिअरमध्ये आजही मानाचं पान राखून आहे. अप्रतिम संवाद, सर्वांच्या उत्कृष्ट अभिनयाला धार लावणारी सिनेमेटोग्राफी आणि रामूच्या खिळवून ठेवणाऱ्या कथाकथनाचा जमून आलेला एक झकास प्रयत्न म्हणजे ‘कंपनी’. ऑस्कर विजेत्या दिग्दर्शक डॅनी बॉयलने ‘स्लमडॉग मिलेनियर’वर ‘सत्या’ आणि ‘कंपनी’मधल्या अंडरवर्ल्ड आणि मुंबईच्या वास्तववादी चित्रणाचा प्रभाव असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.
रामू फक्त अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीच्या विश्वातच रमला नाही. जसा त्याने ‘रंगीला’सारखा रोमँटिक आणि ‘दौड’सारखा विनोदी चित्रपट दिला, तसेच ‘रात’, ‘भूत’, ‘कौन’, ‘रोड’सारखे प्रेक्षकांना भयचकित करून सोडणारे चित्रपटही दिले. या चित्रपटांमधून भय, थरार, आणि गूढता अधोरेखित करणाऱ्या कथांना रामूने त्याच्या शैलीतून पडद्यावर मांडलं. ‘भूत’मधील मनजित ही जितकी प्रेक्षकांना घाबरवणारी होती, तितकीच गूढता‘कौन’च्या समीरमध्ये प्रेक्षकांना अनुभवता आली. रामूने ‘सरकार’, ‘सरकार राज’ आणि ‘सरकार 3’ या राजकारण आणि सत्तावर्चस्वावर आधारित ट्रायलॉजीचंही दिग्दर्शन केलं. तंत्राच्या आहारी गेलेल्या रामूचे कॅमेरा अँगल्स आणि कर्कश्श पार्श्वसंगीताचा भडीमार वगळता ही ‘सरकार’ सिरीजही प्रेक्षकांना प्रचंड भावली.
या सिरीजमुळे रामू वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडला पण त्याने माघार घेतली नाही. समाजातील संवेदनशील आणि बहुचर्चित घटनांना, विषयांना पडद्यावर जिवंत करण्याबाबत रामू कायमच आग्रही राहिला. मग ते अंडरवर्ल्ड (गँगस्टर ट्रायलॉजी) असो, भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेलं पोलीस विश्व (शूल, डिपार्टमेंट) असो, नक्षलवाद, चंदन तस्करी आणि दहशतवाद (जंगल, वीरप्पन, द अटॅक्स ऑफ २६/११) असो, राजकारणातील घराणेशाही आणि एकाधिकारशाही (सरकार मालिका, लक्ष्मी’ज NTR) असो, सुप्त लैंगिक भावनांचं प्रदर्शन (मेरी बेटी सनी लिऑन बनना चाहती है, गॉड, सेक्स अंड ट्रूथ) असो वा रायलसीमा, विजयवाडा भागातील रक्तरंजित संघर्ष (रक्तचरित्र, वंगाविती) असोत, रामूने बेधडकपणे त्याच्या सिनेमांमधून या विषयांवर मनमोकळं भाष्य केलं. भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्या कलेसाठी इतक्या उघडपणे लाभ उठवण्याची धमक फक्त आणि फक्त रामूमध्येच दिसून येते. विलक्षण वेगाने हे अश्या वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रामूला सिनेमा बनवताना भिकू म्हात्रेचा एक डायलॉग नक्कीच आठवत असणार: “करना है तो करना है!”
एका मुलाखतीमध्ये मराठी अभिनेता जितेंद्र जोशी अभिनय आणि दिग्दर्शन यांच्यातील नातेसंबंधावर भाष्य करताना एक सत्य उद्धृत करतो. तो म्हणतो,“कलाकाराला एखादी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी सर्व काही दिग्दर्शक देतो किंवा देऊ शकतो, मात्र तो त्या व्यक्तिरेखेचे डोळे म्हणजेच ती नजर देऊ शकत नाही.” रामूचे चित्रपट पाहताना मात्र हे सत्य फसवं वाटतं. रामूच्या सिनेमाची सगळीच पात्रं डोळ्यांनीच जास्त बोलतात, चालतात, मारतात आणि मरतात! त्या पात्रांच्या तोंडी लाजवाब संवाद असतातच, पण त्यांची नजर त्या संवादांना धार आणते. ही पात्रं साकारणाऱ्या कलाकारांच्या नजरेची धार इतर कुठल्या दिग्दर्शकासोबत काम करताना कुठल्याकुठे हरवून जाते. हे डोळे दिसतात फक्त रामूच्या सिनेमांमध्ये. मग ते डोळे मुन्ना आणि मिलीकडे बघणाऱ्या राज कमलचे असोत, सरकारकडे बघणाऱ्या रशीदचे असोत किंवा श्रीनिवासनकडे बघणाऱ्या मलिकचे असोत, नजरेचा हा बहारदार खेळ फक्त आणि फक्त रामूच करू जाणे! या खेळामुळेच रामूच्या सिनेमांमधली सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अगदीच थोड्या वेळासाठी झळकणाऱ्या पात्रांनाही अजरामर करण्याची विलक्षण हातोटी रामूकडे नक्कीच आहे.
जितकं प्रेम रामूने सिनेमावर केलं, तितकंच त्या सिनेमाच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या तंत्रावर आणि तंत्रज्ञांवर केलं. हे प्रेम ‘रंगीला’च्या टायटल क्रेडिट्समध्येही पाहायला मिळतं. संगीतकार रेहमानच्या बॉलीवूड पदार्पणाचं श्रेयही त्याचंच आणि मनिष मल्होत्राच्या फॅशनला आणि अहमद खानच्या कोरिओग्राफीला मिळालेला पहिला ग्रीन सिग्नलही त्याचाच. उर्मिला मातोंडकर, श्रीराम राघवन, मनोज वाजपेयी, अनुराग कश्यप, राजपाल यादव, शिमित अमीन, पुरी जगन्नाथ सारख्या मौल्यवान देणग्या त्याने बॉलीवूडला दिल्या. फरदीन खान, आफताब शिवदासानी हेही उत्तम अभिनय करू शकतात, याची जाणीव रामूनेच करून दिली. सध्याचा रामू भरकटल्यासारखा वाटतो. कधीकाळी सिनेअनुभव समृद्ध करणारे चित्रपट देणारा रामू आता बी-ग्रेड कथानकांच्या नादी लागल्याचं पाहून प्रेक्षक हळहळतात. पण तरीही त्यांच्या मनात विश्वास आहे की तो पुन्हा एखादा ‘सत्या’ घेऊन येईल, त्याच्या खास ‘रामू’टच सकट!
पुढच्या वर्षी याच दिवशी रामू वयाची साठी गाठेल. रामूच्या गेल्या काही फिल्म्स पाहता, तो अजूनही त्याची फिल्ममेकिंग शैली विसरला नाहीय, हे जाणवत राहतं. थोडक्यात, सिंह वयस्कर झालाय, पण शिकार करणं त्याने अजूनही सोडलेलं नाहीय. लवकरच या सिंहाची एक जबरदस्त गर्जना त्याच्या येत्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या कानावर पडो हीच सदिच्छा! फिल्ममेकिंगवर आतोनात प्रेम करणाऱ्या या फिल्मवेड्या कलावंताला कलाकृती मिडीयाचा मानाचा मुजरा!!