‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
भारतीय सिनेमातला पहिला डान्सिंग अॅक्टर….भगवान दादा
भारतीय सिनेमाचे साक्षीदार म्हणून आपण जेव्हा इतिहासात डोकावू लागतो तेव्हा अनेक नावं आपल्याला आठवू लागतात. त्यात एक नाव प्रामुख्याने घ्यायला हवे भगवान दादा तथा मा.भगवान यांचे! भगवान आबाजी पालव यांचा जन्म १ ऑगस्ट १९१३ चा! सिनेमातील पहिला डांसिंग स्टार अशी त्यांची ऒळख आहे. ’अलबेला’ सारखा अप्रतिम संगीत नृत्यप्रधान सिनेमा देवून एका ’माइलस्टोन’ची निर्मिती केली. एका सामान्य घरातील मुलाची ही भरारी थक्क करायला लावणारी होती. पण ’अलबेला’ चं यश शापित ठरलं.पुढे यशानं कायम हुलकावणी देत भगवान दादा आयुष्याच्या अखेरीस पुन्हा शून्यावर आले
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील सूड नाट्याला जी ‘क्रेझ’ होती किंबहुना त्याहून अधिक ती भगवान दादा यांच्या चाळीसच्या दशकातील सिनेमांना होती. प्रचंड मारधाड असलेले हे सिनेमे तसे बी किंवा सी ग्रेड चे असायचे पण अशा सिनेमांना एक प्रकारचा वेगळा प्रेक्षक वर्ग लाभत असे. याचं दुसर कारण असं, त्या काळचे हिंदी सिनेमाचे हिरो हे तसे शामळू प्रवृत्तीचे असायचे (आठवा अशोक कुमार यांचे बॉम्बे टॉकीजचे सुरुवातीचे चित्रपट) एकूणच नायिकेच्या प्रेमात पडायचे, तिच्यासाठी झुरायचे आणि त्यातच आयुष्याचा शेवट करावयाचा अशी ’देवदास” प्रतिमा असलेले पुचाट नायक सर्वाना थोडेच आवडणार होते? त्यामुळे भगवान दादा आणि अन्य कलावंताच्या देमार सिनेमांना चिक्कार गर्दी असायची.
हे देखील वाचा: …आणि ओपींच्या संगीताने सगळ्यांचे आयुष्य घडले
बदला, बहाद्दूर, जलन, दोस्ती, शेक हॅंड, मतलबी, जीते रहो, भेदी बंगला, बचके रहना हे सिनेमे म्हणजे चाळीस आणि पन्नासच्या दशकातील एक वेगळा मार्ग चोखाळणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतिक होते. त्याकाळातील इतर स्टंट पटाशी तुलना करता (फियर लेस नादिया-जोन कावस यांचे चित्रपट) भगवान यांच्या सिनेमात भावना प्रधानता असायची, आईच वात्सल्यमय कॅरेक्टर असायचं! त्यामुळे दादांच्या स्टंटपटाला सोशल सिनेमाचा कुटुंब वत्सल प्रेक्षक वर्ग लाभत असे.
लोकप्रियतेच्या लाटेवर असताना भगवान यांनी १९४२ साली जागृती पिक्चर्स या बॅनर ची स्थापना केली तसेच स्वतः चा चेंबूर इथे जागृती स्टुडीओ १९४७ साली उभारला. दादाचे हे सारे स्टंट पट मात्र पुढे गोरेगावला त्यांच्या गोडावून ला आग लागली आणि त्यात सर्व जळून भस्मसात झाले. ज्या सिनेमांनी दादाला वैभवाच्या शिखरावर नेले ते सर्व सिनेमे आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. रसिकांच भाग्य थोर त्यात ‘अलबेला’ ची प्रिंट सुखरूप राहिली. त्यामुळे आज भगवान दादाच्या स्टंट सिनेमाची आठवण इतिहास जमा झाली असली तरी त्याच्या कारकिर्दीला ’चार चांद’ लावणारा ‘अलबेला’ शाबूत राहिला. मा.भगवानच्या ‘अलबेला’ने इतिहास घडविला. नृत्य संगीताचा अभिनव अविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला पहिला डान्सिंग अॅक्टर मिळवून दिला. सोशल फिल्म द्वारे प्रथमच पडद्यावर आलेल्या दादांना प्रेक्षकानी स्वीकारले.
हे वाचलंत का: गुणवत्ता, दूरदृष्टी, माणुसकी आणि व्यावसायिकता यांची उत्तम केमिस्ट्री म्हणजेच रमेश देव
पूर्वीच्या त्यांच्या सिनेमात नायिकेला फारस महत्व नसायचा. त्यामुळे कोणतीही मुलगी चालून जायची पण अलबेलाची गोष्टच निराळी होती. दादांनी नायिकेच्या भूमिकेकरिता १९५० साली गीताबालीला ३५००० रुपये देवून साईन केले. सिनेमाचे कथानक तसे फारसे विशेष असे नव्हते. एक नाट्यवेडा कलंदर घर सोडून परिस्थितीशी झुंजत आपले ध्ये्य साध्य करतो. पण कथानकाकडे प्रेक्षकांचं लक्ष गेलंच कुठे? त्यांना मिळाली एकाहून एक सुपर डुपर हिट गाणी आणि त्यावरील खास भगवान डान्स!
सुरुवातीचेच ‘महफि्ल में मेरी कौन ये दिवाना आ गया दिवाना आगया, जब शम्माने पुकारा तो परवाना आ गया’ या गीतावर प्रेक्षक निहायत खूष होवून दौलतजादा करू लागले. ‘बलमा बडा नादान रे’ या मुजरा गीताला दादांनी चक्क प्रेमगीत बनवून त्या पद्धतीने पिक्चराईज केले. ‘शाम ढले खिडकीतले तुम सिटी बजाना छोड दो’ या गीताने तर छेडछाड वाल्या गीतांचा आरंभ केला. ’ओ बेटाजी किस्मत की हवा कभी नरम कभी गरम’ या गीतातील भाड्यांचा आवाज टाकण्याची कल्पना पूर्णतः दादाची होती.
‘भोली सूरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे’ आणि ‘शोला जो भडके दिल मेरा धडके दर्द जवानीका सताये बढ बढ के’ या गाण्याने पुढच्या तीन पिढ्या नादावल्या. ‘मेरे दिल कि घडी करे टिक टिक जब बजे रात के बारा हाय तेरी याद ने मारा’ हे गाणं देखील मस्त जमून आल होत. सिनेमातील अंगाई गीत सर्वात लोकप्रिय ठरले. ‘धीरेसे आजारे आखीयन में निंदिया धीरेसे आजा’ या लताच्या अंगाई गीताने आजही सर्वोत्कृष्ट अंगाई गीताचे स्थान कायम ठेवले आहे. यातील ‘शोला जो भडके’ हे गीत सिनेमाच्या अगदी शेवटी येते.
हे देखील वाचा: ऋषी कपूर यांची शेवटची आठवण – “शर्माजी नमकीन”
खरं तर नायक नायिकांचे मिलन झाल्यावर सिनेमा संपायला हवा पण नेमकं त्याच क्षणी हे गीत चालू होते. हा जुगार दादा खेळले कारण त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. गाणं सुरु होत आणि आख्ख थिएटर नाचू लागत.गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार सी रामचंद्र यांच्या कारागिरीचा हा सर्वोच्य बिंदू ठरला. अण्णांनी संगीतात बोंगो ड्रम, बेंजो, क्लॅरोनेट, ट्रम्पेट, सॅक्सो फोन ही सारी पाश्चात्य वाद्ये वापरली होती. याचाच अर्थ भारतीय सिनेमात खर्या अर्थाने पाश्चात्य संगीत आणि डांस रुजविण्याचे काम भगवान दादांच्या ’अलबेला’ ने केले.
भगवानदादा याचं अलबेला चं हे यश मात्र शापित ठरलं. त्या नंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले. झमेला, कर भला, लाबेला, शोला जो भडके, रंगीला… पण एकालाही यश मिळाले नाही. सिनेमा निर्मिती उद्योगात हात पोळून घेतल्यावर भगवान दादांनी काळाची पावलं ओळखली आणि आपल लक्ष पूर्णपणे ‘डान्स’वर केंद्रित केल. पुढे कित्येक हिन्दी आणि मराठी सिनेमात ते नाचू लागले. आपल्या दादा कोंडके सोबतही छान जोडी जमली होती. (आठवा गंगू तारूण्य तुझं बेफाम..) खरं तर डान्स हाच त्यांचा ’प्लस पॉइन्ट’ होता.
नाचता नाचता हळूवार पणे अलगद खांदे उडविण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी हिच डांस शैली सही सही उचलली.
चोरी चोरी, झनक झनक पायल बाजे या सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या. चोरी चोरी तर त्यांच्या वर ‘तुम अरबोका हेर फेर करनेवाले रामजी सवा लाखकी लॉटरी भेजो अपने भी नामकी’ हे मस्त गाणं चित्रित केलं होतं. दादा सिनेमे बनवत गेले पण त्यांना अलबेला नंतर पुन्हा काही यश मिळाल नाही. वैतागून त्यानी ’अलबेला’चे हक्क रणजित बुधकराना विकून टाकले. आणि काय आश्चर्य पहा १९५१ साली प्रदर्शित झालेला अलबेला पुन्हा १९७५ साली रणजीत बुधकरानी पुन्हा एकदा रिलीज केला आणि तब्बल २४ वर्षानंतरही ‘शोले’ ला टक्कर देत अलबेला पुण्या मुंबईत सुपर हिट ठरला.
हे देखील वाचा: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
दादरच्या ज्या लल्लूभाई मेंशन मध्ये ते रहात होते त्या भागात त्यांचा जबरदस्त बोलबाला होता. कोणत्याही धर्माचा समारंभ दादा शिवाय पुरा होत नसे. एके काळी एका स्टुडिओचे मालक असलेले दादा बंगला, गाडी असे सर्व काही ऐश्वर्य उपभोगत होते. पुढे काळ बदलला. दादा डेली पेड आर्टीस्ट म्हणून नवोदित कलाकारांसमवेत वावरू लागले. अहंकाराची अजिबात बाधा नसलेले दादा होते. ऐश्वर्य आणि गरीबी त्यांनी एकाच मापात मोजली.
कित्येक कलाकाराची आयुष्य त्यांनी घडवली. (आनंद बक्षी यांना पहीली संधी त्यांनीच दिली) भारतीय सिनेमातील त्यांचे ’कॉंन्ट्रिब्युशन’ यशाची मोजपट्टी लावली तर त्या अर्थाने कदाचित कमी असेल पण त्यांच्या मुळेच पहिला डान्सिंग स्टार मिळाला हे कसे विसरता येईल? ज्या लल्लूभाई मेंशन मध्ये ते रहात होते ते लहानपणापासून रहात होते तिथेच त्यांच्या जीवनाची अख्रेर झाली ४ फ़ेब्रुवारी २००२ रोजी. एक वर्तुळ वेगळ्या अर्थाने पूर्ण झालं!