Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

लताजींनी त्यांचं पहिलं हिंदी गाणं गायलं होतं चक्क एका मराठी चित्रपटात!
भारतामध्ये लता मंगेशकर हे नाव माहिती नाही असं क्वचितच कोणी असेल. केवळ भारतातच नाही, तर संगीताच्या दुनियेत लता मंगेशकर हे नाव आदराने घेतलं जातं. परंतु, “नाम गुम जाएगा….. मेरी आवाज ही पहचान है”, म्हणणाऱ्या संगीत क्षेत्रातील या स्वर सम्राज्ञीने स्वतःच्या नावासाठीच लढाई लढली होती.
यामागची गोष्ट अशी आहे की, फार पूर्वी पार्श्वगायकांना फारसं महत्व दिलं जात नसे. त्यामुळे चित्रपटाच्या नामश्रेयावलीमध्ये पार्श्वगायकांचं नाव दिलं जात नसे. अगदी गीतकार, संगीतकार, नृत्यदिगदर्शक सगळ्यांची नावं श्रेयावली मध्ये दिली जात. परंतु, पार्श्वगायकांचे नाव कुठेही लिहिलं जात नसे.
श्रेयनामावली वरून वाद होण्याची खरी सुरुवात झाली ती १९४९ साली आलेल्या मशाल या चित्रपटापासून. मशाल चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी पार्श्वगायन केलं होतं. परंतु, चित्रपटाच्या एलपी रेकॉर्डस् वर नाव होतं कामिनी.
नाही नाही.. हे श्रेय घेणारी कामिनी नावाची कुठलीही गायिका नव्हती. तर ‘कामिनी’ हे चित्रपटातील मधुबालाच्या व्यक्तिरेखेचं नाव होतं. यावर मात्र लता मंगेशकर यांनी हरकत घेतली. पार्श्वगायकाचं नाव न छापता चित्रपटातील व्यक्तिरेखेचं नाव छापणे, ही गोष्ट पूर्णपणे चुकीचीच होती.
पार्श्वगायकांना खऱ्या अर्थाने सन्मान मिळवून दिला तो राजकपूर यांनी. त्याच वर्षी म्हणजेच १९४९ साली आलेल्या ‘बरसात’ या चित्रपटाच्या एलपी रेकॉर्डस्वर चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या सर्व गायकांना श्रेयनामावलीमध्ये स्थान देण्यात आलं आणि पुढे ही प्रथा सुरु झाली.
जरा विचार करा, समजा जर लता दीदींनी त्या काळी आवाज उठवला नसता, तर आज आपल्याला कित्येक गायकांची नावंही कळली नसती आणि एस पी बालसुब्रम्हण्यम यांच्या जागी सलमान खानचे किंवा सोनू निगमच्या जागी शाहरुख खानचे नाव गायक म्हणून दिसले असते. अर्थात लता दीदींनी आवाज उठवला नसता, तरी पुढे जाऊन कोणी ना कोणी या प्रथेविरोधात हरकत घेतली असती, हा भाग वेगळा.

ही झाली श्रेयनामावलीची गोष्ट. बरसात या चित्रपटापासून एलपी रेकॉर्डस् वर पार्श्वगायकांचे नाव येण्याची प्रथा सुरु झाली असली, तरी लताजींचे नाव याआधीही एलपी रेकॉर्डस् वर आलेले होते.
१९४२ साली लता मंगेशकर यांच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या एका महिन्यातच त्यांनी काम शोधायला सुरुवात केली.
यानंतर पुण्यामध्ये नवयुग चित्रपट कंपनी या कंपनीमध्ये लताजींना काही अभिनय आणि गाण्यासाठीच्या असाइन्मेंट्स मिळाल्या. या कामामुळेच लताजी कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकल्या. परंतु, इथेही अनिश्चितता होती. सुदैवाने पुढे त्यांना एक चांगली नोकरी मिळाली.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
जानेवारी १९४३ मध्ये कोल्हापूरमधील प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ६० रु. प्रतिमाह या पगारावर लताजींना नोकरी मिळाली. प्रफुल्ल पिक्चर्स कंपनीचे मालक होते अभिनेत्री नंदाचे वडील मास्टर विनायक. मास्टर विनायक यांच्यासोबत लताजींनी केलेला पहिला चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’.
‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटामध्ये लताजींनी काम केलं होतं आणि त्यांचं चित्रपटाच्या पोस्टरवरील श्रेयनामावलीमध्ये नावही देण्यात आलं होतं. परंतु, लताजींनी पहिलं हिंदी गाणं ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटामध्ये गायलं नव्हतं.
त्याच वर्षी म्हणजे १९४३ मध्येच मास्टर विनायक यांच्यासोबत लताजींनी दुसरा चित्रपट केला होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘गजाभाऊ’. या चित्रपटाच्या पोस्टरवरही लताजींचे नाव देण्यात आलं होतं. या चित्रपटामध्येच लताजींनी पहिल्यांदा हिंदी गाणं गायलं होतं. गाण्याचे बोल होते – “हिंदुस्थान के लोगो अब तो मुझे पहचानो… ” दुर्दैवाने हे गाणं कुठेही उपलब्ध नाही. अगदी यु ट्यूब वरही नाही.
====
हे देखील वाचा: ‘या’ कारणासाठी लताजींनी हेमामालिनीसाठी पार्श्वगायन करायला नकार दिला होता.
====
अर्थात, या दोन्ही मराठी चित्रपटांच्या पोस्टरवर लताजींचे नाव गायिका म्हणून लिहिलेलं नव्हतंच. परंतु, त्या काळात कित्येक चित्रपटात कलाकारच पार्श्वगायन करायचे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना पण पार्श्वगायनासाठीही त्यांचे नाव एलपी रेकॉर्डस् वर झळकले होते असं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.