दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
बिनधास्त: भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक अभिनव प्रयोग
कोण म्हणतं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन प्रयोग होत नाहीत? अगदी कृष्ण-धवल चित्रपटांच्या काळापासून अलीकडच्या पॉंडेचरी चित्रपटापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कित्येक नवनवीन प्रयोग झाले आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट आला होता जो चित्रपट केवळ मराठीतीलच नाही तर, अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक अभिनव प्रयोग होता. या चित्रपटाचं नाव होतं ‘बिनधास्त (Bindhaast)’.
सन १९९९ मध्ये आलेल्या ‘बिनधास्त’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ‘ओन्ली लेडीज’ चित्रपट होता. ओन्ली लेडीज म्हणजे फक्त स्त्रियांसाठी नाही, तर या चित्रपटामध्ये सगळ्या स्त्रियाच होत्या. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानकही काहीसं हटके होतं.
सस्पेन्स थ्रिलर म्हणजे हॉलिवूडची किंवा फारफार तर दाक्षिणात्य चित्रपटांची मक्तेदारी असा ठाम समज असणाऱ्यांनी बिनधास्त (Bindhaast) हा चित्रपट आवर्जून बघायलाच हवा. या चित्रपटामध्ये सस्पेन्स खेचण्यासाठी अनाकलनीय वाटावं असं काहीही दाखवलेलं नाहीये. अगदी साधे सरळ प्रसंग, स्वतःला वाचविण्याची आणि सत्य शोधण्याची धडपड हे सगळे प्रसंग वास्तववादी वाटतं. तरीही प्रेक्षक चित्रपटामध्ये गुंतत जातो. या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व स्त्री कलाकार असूनही यामध्ये फेमिनिस्ट किंवा स्त्रीवादी दृष्टिकोन मांडण्यात आला नव्हता.
“दोन मित्रांची कहाणी तर सगळ्याच चित्रपटांमध्ये दाखविण्यात आली आहे, पण दोन मैत्रिणींची कहाणी कधी कुठल्या चित्रपटात बघितली आहेस का?” चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर त्याच्या प्रोमोजमध्ये हे वाक्य सातत्याने हायलाईट केलं जात होतं. कारण यामध्ये दोन प्रथमच दोन मैत्रिणींच्या मैत्रीची एक वेगळीच पण वास्तववादी कथा दाखवण्यात आली होती.
मयुरी (गौतमी कपूर) आणि वैजयंती उर्फ वैजू (शर्वरी जमेनिस) या गर्ल्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन जिवलग मैत्रिणी. मयुरी श्रीमंत कुटुंबातली तर, वैजू सातारातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातली. मयुरीचे आईवडील लहानपणीच वारल्यामुळे तिचा सांभाळ तिच्या आत्येने (रिमा लागू) केलेला असतो. मयुरी शांत, समंजस तर, वैजू बिनधास्त अरे ला का रे करणारी. कॉलेजमध्ये या दोघींच्या विरोधात असतात शीला आणि तिच्या मैत्रिणी.
मयुरी कॉलेज सेक्रेटरीची निवडणूक शिलाकडून हरते. त्यानंतर मात्र वैजू शिलावर सतत चिडचिड करत असते आणि शिलाही या दोघींना डिवचण्याची एकही संधी सोडत नसते. कॉलेजमधली भांडणं, धमाल मस्ती आणि फायनल परीक्षेत टॉप करण्यासाठीची धडपड याभोवतीच मयुरी, वैजू आणि शिलाचं आयुष्य फिरत असतं. कॉलेजमध्ये टॉप करणाऱ्या मुलीला कॉलेजतर्फे उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळणार असते. ही संधी कोणालाच सोडायची नसते. एकंदरीत सर्वांचं आयुष्य साधं, सरळ आणि सुरळीत चाललेलं असतं. पण या आयुष्यात एंट्री होते एका अस्तित्वात नसलेल्या माणसाची.
हा माणूस मयुरी आणि वैजू यांच्या कल्पनेतला असतो. गंमतीत म्हणून त्यांनी ही व्यक्तिरेखा निर्माण केलेली असते. मग तो प्रत्यक्षात कसा येतो? खरं तर तो येतच नाही म्हणजे तो यांच्या आयुष्यात यायच्या आधीच त्याचा खून होतो आणि या मुलींचं साधं सरळ आयुष्य ढवळून निघतं. आणि मग सुरु होते धडपड जगण्याची, स्वतःला वाचविण्याची आणि सत्य शोधण्याची!
खुनाचा तपास करणारी डॅशिंग इन्स्पेक्टर निशा (मोना आंबेगावकर) कॉलेजची माजी विद्यार्थिनी आणि कॉलेजच्या मुलींची ‘आयडॉल’ असते. खुनाचा तपास वेगवेगळी वळणं घेत असतो. वैजू आणि मयुरी फक्त धावत असतात कधी स्वतःला वाचवण्यासाठी तर, कधी खरा खुनी शोधण्यासाठी. पण या संकटातही दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरलेला असतो.
चित्रपटाचा शेवट धक्कादायक तर आहेच परंतु, त्याहीपेक्षा तो मनाला पटणारा आहे. कोणतंही पुरुष व्यक्तिमत्व न घेता एक चित्रपट तयार होऊ शकतो आणि तो सुपरहिट होऊ शकतो हे चंद्रकांत कुलकर्णी आणि चित्रपटाच्या टीमने सिद्ध करून दाखवलं.
चित्रपटाचे निर्माते मच्छिन्द्रनाथ चाटे यांचंही विशेष कौतुक कारण त्यांनी असा वेगळ्या वळणावरच्या चित्रपट निर्मितीचं धाडस दाखवलं. या चित्रपटाचं बजेट होतं रु.१.५० कोटी तर बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं रु.७ कोटी.
“दोन मुली कधी एकमेकींच्या ‘बेस्टी’ होऊ शकत नाहीत”, या संकल्पनेला आव्हान देणाऱ्या बिनधास्त चित्रपटाचे लेखक होते अजित दळवी आणि प्रशांत दळवी. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले तसंच मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.
दक्षिणेतले चित्रपट बॉलिवूडमध्ये रिमेक बनतात. परंतु, बिनधास्त या चित्रपटाचा तामिळ (स्नेगीथिये) आणि मल्याळम (राकिलीपट्टू) भाषेत रिमेक करण्यात आला होता. तसंच भागमभाग या हिंदी चित्रपटातही बिनधास्तचा ‘क्लायमॅक्स ट्विस्ट’ वापरण्यात आला होता. या तिन्ही चित्रपटांचं (स्नेगीथिये, राकिलीपट्टू, भागमभाग) दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केलं होतं.
=====
हे देखील वाचा – द ओमेन (The Omen): कहानी पुरी फिल्मी नही… शापित है!
=====
आयुष्य साधं सोपं नसतं ते कधी कुठलं वळण घेईल सांगता येत नाही, पण यातील प्रत्येक वळणावर जर सावलीसारखी साथ देणारी मैत्रीण तुमच्यासोबत असेल, तर तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. बिनधास्त चित्रपट पाहिल्यावर हाच विचार डोक्यात घोळत राहतो. जर बिनधास्त (Bindhaast) हा चित्रपट तुम्ही बघितला नसेल, तर आपल्या ‘Must watch’ लिस्टमध्ये नक्की लिहून ठेवा.