खरंच आहे असा बालगंधर्व आता न होणे
“असा बालगंधर्व आता न होणे…”
२६ जून आज बालगंधर्व यांची जयंती, त्यानिमित्त गदिमा लिखित व पु.ल यांनी संगीत दिलेले “असा बालगंधर्व आता न होणे” या कवितेची आठवण….पुलंच्या शब्दात…
पुण्याला ‘बालगंधर्व’ थिएटर उभे राहत होते, गोपाल देउसकरांच्या सुंदर चित्रांशी स्पर्धा करणार्या चार ओळी पाहिजे होत्या.पंचवटी गाठली.
माडगूळकरांना म्हणालो,
“स्वामी, चार ओळी हव्या आहेत ….बालगंधर्वाच्या पोट्रेटपाशी”.
मागणी संपायच्या आत माडगूळकर म्हणाले, “असा बालगंधर्व आता न होणे.” तेवढ्यात कुणीतरी आले. गप्पागोष्टी सुरु झाल्या. मी समस्यापूर्तीची वाट बघत होतो. तासाभरात निघायचे होते.त्या श्लोकाला चाल लावायची होती.
उदघाटन -समारंभाच्या प्रसंगी गाण्याच्या गीतांच्या तालमी चालल्या होत्या. त्यात माडगूळकरांचे “असे आमुचे पुणे” होतेच. तालमीच्या ठिकाणी बाळ चितळे श्लोक घेऊन आला. सुरेख, वळणदार अक्षरात लिहिलेला. बकुळ पंडितला मी चाल सांगितली. रंगमदिराच्या उदघाटनाच्या वेळी रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारातले दिवे मंदावले. रंगमंचावर मांडलेल्या बालगंधर्वांच्या ‘नारायण श्रीपाद राजहंस’ आणि ‘स्वयंवरातली रुक्मिणी’ अशी दोन दर्शने घडवणार्या त्या अप्रतिम चित्रांवरचे पडदे दोन युवतींनी बाजुला केले, आणि लगेच माडगूळकरांच्या गीताचे गायन सुरु झाल्यावर रसिकांना कळेना, की त्या रंगशिल्पाला दाद दयावी की गीतातल्या शब्दशिल्पाला !.
प्रेक्षागारात पुन्हा प्रकाश आला त्या वेळी त्या ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्’ ह्या अनुभूतीने पर्युत्सुक झालेल्या रसिकांच्या खिशांतले शेकडो हातरुमाल अश्रू पुसत होते .
गदिमांनी बालगंधर्वांवरती लिहिलेली सुप्रसिध्द कविता
असा बालगंधर्व आता न होणे…
जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!
रतीचे जया रुपलावण्य लाभे!
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे!
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!
ग.दि.माडगूळकर
माहिती सौजन्य : सुमित्र माडगूळकर