बाप्पाच्या मिरवणूकीची धम्माल
झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने अफाट लोकप्रियता मिळवली. त्यातील मुख्य अभिनेता यशोमान आपटे याचा फॅन क्लब प्रचंड वाढला. यशोमानने याआधी संत ज्ञानेश्वर मध्ये ‘सोपानदेव’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘झोपाळा’, ‘बिनधास्त पहा’ या नाटकात देखील त्याच्या भूमिका होत्या. सध्या तो ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत भूमिका करत आहे. तसेच ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शो मध्ये देखील सहभागी झाला आहे. यशोमान गणपतीबद्दलच्या आठवणी सांगताना म्हणतो, “आम्ही पार्ल्याला राहतो. आमच्या घरी दीड दिवसांसाठी गणपती आणला जातो. नातेवाईक, मित्रमैत्रिणी घरी बाप्पाच्या दर्शनाला येतात. खूप धमाल असते. पण यंदाच्या वर्षी मात्र या कोरोनाच्या सावटामुळे कोणाला घरी बोलावता आलं नाही, याची खंत वाटते. साध्या पद्धतीने गणपती साजरा झाला.
मी पार्ले टिळक विद्यालयात असताना आमचा चार पाच मित्रांचा ग्रुप होता. आम्ही पार्ल्यातील ‘विलेपार्ल्याचा सम्राट’ या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीत नाचायचो. खूप मजा यायची. पुढे कॉलेजला गेल्यावर गिरगाव आणि खेतवाडीतले सार्वजनिक गणपती पाहायला जाणे, हे आम्हाला खूप आवडायचे. सकाळीच आम्ही एक दिवस ठरवून गिरगावात जायचो, मग सर्व गणपतींचे दर्शन घेऊन आम्ही खाऊगल्लीत खायला जायचो. तेथून मरीन ड्राइव्ह च्या कट्ट्यावर अगदी संध्याकाळ पडेपर्यंत गप्पा मारत बसायचो. खूप मजा यायची. आता कितीही इच्छा असली तरी सार्वजनिक मिरवणुकांमध्ये सहभागी होणे शक्य नाही.
मित्रांपैकी बऱ्याच जणांकडे दीड दिवसांचे गणपती येत असल्याने आम्हाला एकमेकांकडे जायला वेळ मिळत नव्हता. पण सार्वजनिक गणपती मात्र आम्ही एकत्र पाहायला जायचो. मालिकांमध्ये सुद्धा हल्ली गणपती बाप्पा आणला जातो. ‘फुलपाखरू’ मालिकेत सुद्धा गणपतीचा सिक्वेन्स होता. तिथेही गणपती उत्सवाचा आनंद घेता आला. यावर्षी या गोष्टींच्या आठवणीत रमून जायला होते.”