‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णीशी गपशप
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेतील आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी. शिक्षक दिनाच्या निमित्तानं विराजस सांगतोय त्याच्या आयुष्यातील पहिल्या शिक्षिकेविषयी …
प्रत्येक आई ही प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली शिक्षिका असते. तीच्या शाळेत मात्र गणित, भूगोल, इतिहास विषयापासून ते आयुष्याचे सगळे धडे शिकवले जातात. आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या वळणावर ती एक शिक्षिका म्हणून मार्गदर्शन करत असते. तीच्या शाळेत मधली सुट्टी ही आपण आपल्याच मनानुसार घेऊ शकतो. हक्कानं या आई नावाच्या शिक्षिकेवर ओरडतो, भांडतो, नाही करायचा अभ्यास म्हणून तीच्यावर रुसून बसतो. हळू-हळू आयुष्यात पुढे जात असताना ही शिक्षिका रेड सिग्नलसारखीही वाटू लागते. पण कसं आहे ना, ही अशी एकमेव शाळा आणि शिक्षिका ती कोणतीही फी आकारत नाही.
झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘माझा होशील ना’ फेम आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णी. विराजस कुलकर्णी हा आपली लाडकी सोनपरी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. आज शिक्षक दिनाच्यानिमित्तानं त्याच्याशी केलेली ही बातचीत…
- आईनं दिलेला मोलाचा सल्ला कोणता?
जशी इतरांची आई सल्ले देते तशी माझी आईही मला सल्ले देत असते. आम्ही एकाच फिल्डमध्ये काम करतो. लहान असताना आईने मला एकदा ऋषी कपूर यांची मुलाखत वाचून दाखवली होती. त्यात ऋषी कपूर यांनी एक वक्तव्य केलं होतं, की मी ८ वीत असताना शाळा सोडली आणि अभिनय करायला लागलो. अभिनेता झालो नसतो तर माझं काही खरं नव्हतं. कारण मला दुसरं काही येत नव्हतं. त्यामुळे फक्त अभिनेता व्हायचं स्वप्न बघू नकोस. आयुष्यात स्वत: समोर नेहमी वेगवेगळे पर्याय ठेव असा सल्ला मला आईनं दिला होता.
- लेखन, दिग्दर्शनाकडे कसा वळलास?
आईने मला सुरुवातीलाच सांगितलं होतं की, तु काही हो. पण अभिनेता होऊ नकोस. कारण अभिनेता होण्यासाठी जेवढी मेहनत आवश्क आहे तेवढंच आपलं नशिब. कधीही काही होऊ शकतं. एक अभिनेता म्हणून प्रेक्षक आपल्याला पसंत करीतलच असं नाही किंवा आपला चेहरा लोकांना आवडेलच असं नाही. त्यामुळे आई मला लहाणपणी सुट्टी असली की लिखाण करायला लावायची. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेत. तेव्हा मला खूप कंटाळवाणं वाटायचं. सुट्टीत आई काम करायला लावते. त्यानंतर तीला तेव्हाच कुठेतरी कळालं होतं की मी उत्तम लिखाण करू शकतो. तीच्या लिखाणाच्या सवयीचा मला खूप चांगला फायदा झाला.
आईनं दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट ‘प्रेम म्हणजे प्रेम’. तीचा हा पहिला अनुभव होता. त्यामुळे घरातच ऑफिस सुरू झालं होतं. त्यावेळी मी नुकतंच दिग्दर्शन, चित्रपटांकडे वळलो होतो.
- शाळेच्या खासियतबद्दल काय सांगशील?
माझं शिक्षण पुण्यातील एस.पी.एम. इंग्लिश शाळेत झालं. ही एकमेव अशी शाळा होती तिथे नाटक हा स्वतंत्र विषय होता. त्याची परिक्षा असायची. याचा फायदा मला सध्या काम करताना होतो.
- शाळेतील शिक्षकांबद्दल काय सांगशील?
सध्या मराठी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी बजावत असलेले लेखक, दिग्दर्शक आम्हाला शिकवायचे. ‘फतेह शिकस्त’ आणि ‘फर्जंद’ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ‘धुराळा’ सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वंस अशी तगडी मंडळी मला शिकवायला होते. आजही मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन नेहमी घेत असतो.
- लेखन, दिग्दर्शन केलेली नाटकं?
पुण्यात नाटकसंस्था थिएटर ऑन एन्टरटेन्मेंट नावाची नाटकसंस्था मी चालवतो. या नाटकसंस्थेत २० हून अधिक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. ‘इडियट बॉक्स’ नावाची वेबसिरीज, ‘ती आणि ती’ या मराठी चित्रपटाचं मी लिखाण केलं आहे. ‘मिकी’ नावाचं नाटक सध्या खूप गाजतंय. या नाटकाला झी गौरवमध्ये ११ नॉमिनेशन होते.
- अभिनय केलेलं पहिलं नाटक कोणतं?
Anathema हे माझं पहिलं नाटक होतं.
- शाळेत फर्स्ट बेन्चर्स की लास्ट बेन्चर्स होतास?
मी फर्स्ट बेन्चर्स होतो. कारण मला चांगलं माहित होतं की, आपणहून पहिल्या बेन्चवर बसलो की शिक्षक काही लक्ष देत नाही. सगळ्यांना वाटायचं की खूप शांत आणि गुणी मुलगा आहे. पण असं काही नव्हतं. मी सुध्दा खूप मस्ती करायचो.
- शाळेतील एखादी खोडकर आठवण ?
शाळेत गुणी, शांत विद्यार्थी म्हणून मला सगळे समजायचे. त्यामुळे मित्र विराजस आलाय म्हणून माझ्या नावाखाली बाहेर फिरायचे.
- आईसोबत स्क्रिन शेअर करायला आवडेल का ?
आईसोबत स्क्रिन शेअर किंवा अभिनय करण्यापेक्षा तिला दिग्दर्शित करायला जास्त आवडेल. आणि ही तिची ही इच्छा आहे आणि माझी ही.
- ‘माझा होशील ना’चा पहिला एपिसोड बघितल्यानंतर आईची पहिली रिॲक्शन काय होती ?
खूप छान वाटलं. अभिमान वाटला आईला. तीच्या बिझी शेड्युलमुळे तीला टीव्ही फार कमी बघायला मिळायचा. सध्या लॉकडाऊनमुळे तीला वेळ मिळतो. आणि ती आवर्जून सिरअल बघते. खूश आहे ती. त्यामुळे तीला खूश बघून मलाही काम करण्याचा उत्साह येतो.
- आईसाठी कधी कोणती डिश बनवली आहेस का?
नाही. कमी बनवलेले पदार्थ मीच खातो. कारण ते कुणीही खाऊ शकत नाही. पण असे अधून-मधून तीला सरप्राईज गिफ्ट देत असतो.
- तुझ्या आयुष्यात आई नावाची ‘शिक्षिका’ काय आहे तुझ्यासाठी ?
आई माझ्यासाठी एक उत्तम अभिनेत्री असलेलं मूर्तिमंत उदाहरण आहे. कायम माझ्यासाठी प्रेरणा आहे. तीच्याकडे बघूनच मी अभिनय शिकलो. तीच्या उत्साही व्यक्तीमत्त्वाकडे बघितलं की मला उत्साह येतो. जगण्याला नवी उमेद मिळते.
प्रज्ञा आगळे.