
Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील; कारण…
“तात्या गोंधळ का म्हणून घालतेय रं?” असं एका चिमुरड्याचा आपल्या आजोबांना प्रश्न असतो. त्यावर आजोबा म्हणजेच तात्या त्याला सांगतात, “खंडेराया जागरण गोंधळाला येतो आणि नवरा-नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर घेऊन जातो!” गोंधळ… मराठीत आलेला एक नवीन प्रयोग! पुन्हा एकदा, लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळी रहस्य उलगडणारा हा चित्रपट बघून तुमच्या डोक्याच्या तारा अक्षरशः हलून जातील. काही छोटे SPOILER देणार आहे… ही गोष्ट एका लग्नाची आहे आणि हा संपूर्ण चित्रपट फक्त एका रात्रीचा आहे, म्हणजेच पहाटेपर्यंत! पण, या एका रात्रीत नात्यांची गुंतागुंत, गावातलं राजकारण, जागरण, गोंधळ आणि काही ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट तर, हा काही कमर्शिअल चित्रपट नाही; त्यामुळे मसाला, जबरदस्त डायलॉग्स, Action अशा कोणत्याही अपेक्षा घेऊन जाऊ नका.
संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित हा ‘गोंधळ’ कसा आहे, चला जाणून घेऊया.
तर, आधी थोडं प्लॉट सांगतो. सिनेमातील काळ जवळपास ७०-८०च्या दशकातला आहे. एक चिमुरडं आणि त्याचे आजोबा म्हणजेच किशोर कदम दोघं रात्री बोलत बोलत एका गोंधळाला निघालेले असतात. याच दरम्यान आपल्याला आजोबांची tragedy कळते. पुढे, ते ज्या जागरण गोंधळात पोहोचतात, ते असतं एका लग्नाचं! पुणे, नाशिकच्या भागातली लोकं लगेच कनेक्ट होतील, असा हा सगळा गावरान माहोल आहे. तर, ते ज्यांच्या लग्नासाठी पोहोचतात, ते लग्न असतं आनंद आणि सुमन यांचं! किशोर कदम येतात, पूजा घालतात, गोंधळ सुरु होतो. गावातले पाटील पण येणार असतात. हे लग्न सुमनच्या मनाविरुद्धच असतं, पण पर्याय नसतो. आनंद साधाभोळा असतो. या जागरण गोंधळात पाटलाचा पोरगा येतो आणि त्याच्यासोबत येतो एक नवीन ट्वीस्ट… सोबच जागरण गोंधळाच्या वेळी एक वाघ्या मुरळी येतो आणि चित्रपटाला मिळतो दुसरा ट्विस्ट… तिसरा ट्विस्ट चित्रपटाच्या शेवटी आहे, जे तुम्हाला चित्रपट पाहून कळेलच. यासोबतच येतं ते गावातलं घातक राजकारण, पाटलांची सावकारीसोबत असलेली दादागिरी! सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट फक्त एका रात्रीचा आहे, त्यामुळे जे घडतं ते एका रात्रीच! देवाच्या कार्यक्रमाचा गोंधळ एका वेगळ्या गोंधळात कसा रुपांतर करतो, हीच याची खरी स्टोरी आहे.

यात खास काय, तर एक म्हणजे जागरण-गोंधळ आणि वाघ्या मुरळी या महाराष्ट्राच्या लोकपरंपरा! आपण आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये गोंधळ फक्त गाण्यांमध्ये अनुभवले होते. पण, यामध्ये तुम्हाला पूर्ण गोंधळ तोही वाघ्या-मुरळीसोबत अनुभवता येतो. त्यासोबत ग्रामीण भाषा, गावाकडली संस्कृती, गावातली उत्साही मंडळी आणि गावातलं ते रांगड कॉस्च्युम… यामुळे आपण गावात असल्याचाच फील येतो आणि एकंदरीत गावातलं एखादं गोंधळ अटेंड केलंय की काय, असा अनुभव येतो. गावातले चहापाण्याचे कार्यक्रम, देवाची घातलेली पूजा, त्यासोबतच गावातली वेगळीच लफडी याचं डीटेलिंग तुम्हाला गोंधळमध्ये पाहायला मिळते. सध्या फोकलोरवर अनेक चित्रपट येत आहेत, त्यातच ‘दशावतार’सुद्धा आलेला जो, कोकणातल्या लोकपरंपरेवर आधारित होता, आता हा आलेला गोंधळसुद्धा तुम्हाला लोकपरंपरेचा कमालीचा एक्सपिरीयन्स देतो.
आता थोडी कास्टवर नजर टाकूया. किशोर कदम- नेहमीप्रमाणे ग्रामीण भागातली भूमिका असली, तरी त्यांची चित्रपटात एक वेगळीच छाप उमटलेली असते. आपण हे ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘देऊळ’ ‘फॅंड्री’, ‘दिठी’मधून अनुभवलच आहे. ‘गोंधळ’मध्येही किशोर कदम यांनी साकारलेल्या ‘भिवबा’ भूमिकेत तसाच दम दिसून येतो. याशिवाय, कैलास वाघमारेने गोंधळीच्या भूमिकेत जबरदस्त काम केलं आहे. एका इंटरव्यूमध्ये त्याने म्हटलं होतं की, “या भूमिकेसाठी मी २७ गोंधळ पाठ केले होते”, आणि तेच यामध्ये उत्तमरीत्या दिसून आलं आहे. ही पूर्ण गोष्ट ज्यांच्याभोवती फिरते, ते म्हणजे नवरी सुमन जिची भूमिका केलीये ‘इशिता देशमुख’ने आणि नवरा आनंद ज्याची भूमिका साकारली आहे ‘योगेश सोहोनी’ याने… खासकरून इशिता… एक मस्तमलंग पोरगी, पण आता नवरी झालेली आणि आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठीची तिची तडफड, पण तेसुद्धा कांड करून हे तिने योग्यरित्या वठवलं आहे. सोबत योगेश सोहोनी जो एक गरीब गाईसारखा वाटणारा मुलगा पुढे शर्यतीतल्या बैलाचं कसं रूप घेतो, हे त्याने आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. सोबतच निषाद भोईर, अंजू प्रभू, ध्रुव ठोके, हेमंत फरांदे, माधवी सुतार यांच्याही भूमिका उत्तम आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या भुमिकेला न्याय दिलाय. कुणाच्या बुडाखाली किती आंधार आहे, समद्या गावाला माहितीये… एकदम असाच सेम टच अभिनेते ‘सुरेश विश्वकर्मा’ यांनीही गोंधळमध्ये दिला आहे. जो तुम्ही चित्रपटात पाहालच.

‘गोंधळ’ला संगीत दिलं आहे, साउथचे लेजंड ‘इलैय्याराजा’ यांनी! महत्वाचं म्हणजे, पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाला त्यांनी म्युझिक दिलं आहे. तसं पाहायला गेलं तर, अख्खा चित्रपट जे मूळ गोंधळी सादर करतात, त्या गाण्यांवर अवलंबून आहे. फक्त एक ‘चांदण’ गाणं आहे ते इलैय्याराजा यांनी कंपोज केलेलं आहे. हे अजय गोगावले आणि आर्या आंबेकर यांनी गायलं आहे. आणि हे गाणं चित्रपटात खूप impactful आहे. त्यातच सेकंड हाफ संपूर्ण गोंधळाच्या म्युझिकवरच डिपेंड आहे. ग्रामीण संवाद आणि गोंधळी कलाकारांची गाणी यामुळे चित्रपट चांगली गती पकडतो. पण तरीही, कुठतरी असं वाटतं की थ्रिलर चित्रपट असताना थोडं इंटेन्स background स्कोरची गरज होती, ज्याचा अभाव दिसून येतो.
================================
हे देखील वाचा : Web Series Review Baai Tujhyapayi: वयात आलेल्या प्रत्येक मुलीची करुण कहाणी!
================================
तांत्रिकदृष्ट्या पहायचा झाला तर पूर्ण चित्रपटात असलेलं रात्रीचं शूट हा खूप challenging पार्ट होता. पण निर्मात्यांनी सगळ्या गोष्टी सांभाळल्या. या चित्रपटाची एक अशी खास गोष्टसुद्धा आहे जी कदाचित मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळाली, ते म्हणजे सुरुवातीपासून ते पुढच्या अर्ध्या तासापर्यंत हा चित्रपट वन टेक घेतलेला आहे. जवळपास अर्धा तास; त्यामुळे डिरेक्टर संतोष डावखर, त्यांची संपूर्ण टिम आणि कास्टची प्रशंसा झालीच पाहिजे. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि स्क्रीनप्लेची दाद दिलीच पाहिजे. कारण त्यांनीच चित्रपटात प्राण फुंकले आहेत. पण तरीही, सततची रात्र आणि डार्क थीम असल्यामुळे कुठेतरी चित्रपट थोडासा संथ वाटतो. पण तरीही दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून महाराष्ट्राच्या या लोकपरंपरेला आधुनिक रुप देऊन ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला आहे.
आपली संस्कृती, लोकपरंपरा, जागरण-गोंधळ गावकऱ्यांचा उत्साह, पण सोबत गावच्या बारा भानगडी, प्रेमप्रकरणातली लफडी, नाती-गोती, पाटीलकीचा माज आणि बदला… अशा सर्व गोष्टी तुम्हाला गोंधळमध्ये पाहायला मिळतील. जर गावात एखादा फेरफटका मारून यायचाय तर हा ‘गोंधळ’ नक्की बघा आणि थेटरात जाऊनच बघा!
‘कलाकृती मीडिया’ ‘गोंधळ’ला देत आहे पाच पैकी चार स्टार्स !
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi