ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
अकाली एक्झिट घेणारा गगनभेदी नटसम्राट- यशवंत दत्त
असाच कुणी एक तरुण असतो. घरची परिस्थिती हालाखीची असते. पडेल ते काम तो करतो आणि एकेदिवशी तो म़ोठा कलाकार होतो. ही कुठल्याही चित्रपटातील कहाणी नाही. ही रिअल लाईफ स्टोरी आहे सुप्रसिद्ध अभिनेते यशवंत दत्त यांची. आज त्यांचा स्मृतीदिन. वयाच्या केवळ ५२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेणा-या नटसम्राटाची ही कहाणी.
यशवंत दत्त यांचं मूळ नाव यशवंत महाडिक. वडिल दत्तात्रय महाडिक उर्फ मा.छोटू आणि आई वत्सलाबाई हे दोघंही नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. वडिलांनी ‘गरीबांचे राज्य’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात मोठं आर्थिक नुकसान या दांम्पत्याच्या वाट्याला आलं. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. या परिस्थितीत यशवंत दत्त यांना प्रसंगी उडपी हॉटेलात काम करावं लागलं. त्यानंतर त्यांना “फिलीप्स”कंपनीत नोकरी लागली. त्याआधीच्या काळात लहानपणापासून नकलांची आवड असणारे यशवंत दत्त ‘थंडर्स’ नामक ऑर्केस्ट्रात नकला आणि निवेदन करत. दरम्यान एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा यातून यशवंत दत्त यांचं अभिनेता म्हणून नाव होऊ लागलं. स्वत:ला आलेल्या कटु अनुभवामुळे यशवंत दत्त यांनी अभिनय क्षेत्राकडे वळू नये असं त्यांच्या वडिलांचं मत होतं पण अभिनयापासून दूर रहाणं यशवंत दत्त यांना निव्वळ अशक्य होतं.
‘नाथ हा माझा’ या व्यावसायिक नाटकातून यशवंत दत्त यांचं रंगभूमीवर पदार्पण झालं. त्यातील सुभानरावाची त्यांची भूमिका खूप गाजली. ‘वेडा वृंदावन’ या नाटकात यशवंत दत्त यांनी त्याकाळातील प्रसिद्ध रामन राघव साकारला होता. ऐन चाळीशीत यशवंत दत्त यांनी ‘नटसम्राट’ नाटकांचे शिवधनुष्य पेललं. या नाटकासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. श्वासावर नियंत्रण यावं यासाठी नाटकातील संवाद म्हणत पुण्यातील पर्वतीवर ते जात. कलाकार म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचं आयुष्य पाहिलं होतं. नटसम्राट उभा करताना त्यांनी आपल्या वडिलांच्या अनेक लकबी उचलल्या होत्या. सोनचाफा’, ‘वादळ माणसाळतंय’, ‘सुख पाहता’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘प्रेमाच्या गावा जावे’ आणि ‘सोनचाफा’ या दोन्ही नाटकांत त्यांनी आजोबाची भूमिका साकारली, तर बाबा आमटेंच्या जीवनावर आधारित ‘वादळ माणसाळतंय’ या नाटकात आमटेंची भूमिका जीवंत केली. ‘सुख पाहता’ या नाटकात तर त्यांनी सहा विविध भूमिका केल्या होत्या. आणि या सहाही भूमिका एकमेकांपासून वेगळ्या होत्या. ‘श्री तशी सौ’ या नाटकात गिरीश ओक आणि वंदना गुप्ते यांच्या जोडीने ते धमाल उडवत. ‘कालचक्र’ ह्या नाटकातील त्यांची वृद्धाची भूमिकाही ताकदीची होती.
हे हि वाचा : रायगडाला जेव्हा जाग येते नाटकाला ५८ वर्षं पूर्ण..
यशवंत दत्त यांना एक खास सवय होती. कोणताही रात्रीच्या प्रयोगाचा दौरा आटपून शिवाजी मंदिर जवळ नाटकाची बस उभी राहिली की ते आवर्जून बाजूच्या दुकानातून एक ग्लास गरम दूध आणि जिलबी खात. त्यामुळे जागरण आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही अशी त्यांची धारणा होती.
नाटकाप्रमाणेच यशवंत दत्त यांची चित्रपटातील इनिंगही गाजली. सुगंधी कट्टा’, ‘भैरु पैलवान की जय’, ‘पैजेचा विडा’, ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘फटाकडी’, ‘शापित’,’पुढचं पाऊल’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. ‘शापित’साठी यशवंत दत्त यांना राज्य सरकारचा पुरस्कारही प्राप्त झाला. ‘क्रोध’ या हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायक साकारला होता. त्यांच्या स्मरणात राहिलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘सरकारनामा’ चित्रपटातील त्यांची मुख्यमंत्र्यांची भूमिका. ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका ठरली. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान त्यांची तब्येत बिघडली होती. बरचसं शुटींग त्यांनी बसूनच केलं. चित्रपट पूर्ण झाला पण डबिंगसाठी यशवंत दत्त यांच्या आवाजाशी जुळणारा आवाज मिळत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या दिग्दर्शक श्रावणी देवधर यांना यशवंत दत्त आश्वस्त करत म्हणाले, “तुझा हा चित्रपट पूर्ण केल्याशिवाय काही मी मरणार नाही” आणि नियतीचा खेळ असा की चित्रपटाचं डबिंग पूर्ण झालं त्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी यशवंत दत्त यांचं अकाली निधन झालं.
काही कलाकार फार सतत प्रकाशझोतात नसतात पण त्यांची स्वत:ची अशी एक शैली ते अवश्य निर्माण करतात. यशवंत दत्त यांनी ती शैली निर्माण करत प्रेक्षकमनात निश्चितच स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. आज त्यांना आठवताना त्यांचं कमीत कमी शब्दांत डोळ्यांतून बोलणं आणि शांत खर्जातला स्वर आठवत रहातो.